6 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 डिसेंबर 2018)
देशातील सर्वात लांब जोडपूल लवकरच खुला होणार:
- ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांना जोडणाऱ्या देशातील सगळ्यात लांब अशा रेल्वे- रस्ते पुलाचे (रेल-रोड ब्रिज) पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबरला उद्घाटन करणार आहेत.
- 4.94 किलोमीटर लांबीचा हा बोगिबील पूल आसाम व अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात आहे. सुशासन दिन म्हणून साजऱ्या होणाऱ्या 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुलाचे उद्घाटन करतील, अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.
- माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी 1997 साली या बोगिबील पुलाचे भूमिपूजन केले होते, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर 2002 सालीच या पुलाचे काम सुरू झाले.
- गेल्या 16 वर्षांत या पुलाच्या बांधकामाची मुदत अनेकवेळा चुकल्यानंतर 3 डिसेंबरला या मार्गावर पहिली मालगाडी धावली. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत रसदपुरवठय़ात सुधारणा करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या पायभूत प्रकल्पांपैकी बोगिबील हा एक आहे.
करीमनगरचे नाव बदलून करीपुरम ठेवले जाणार:
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास भाजपा करीमनगरचे नामांतर करेल असे आश्वासन दिले आहे. करीमनगरचे नाव बदलून करीपुरम करु असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
- ‘तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास लोकांच्या भावनांचा आदर राखत करीमनगरचे नामांतर करीपुरम करण्याचा प्रयत्न करु’, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची नामांतरं केल्याने आधीच योगी आदित्यनाथ यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे.
- ट्विटरवर योगी आदित्यनाथ यांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र तरीही नावं बदलण्याचा सपाटा अद्याप सुरु आहे. नुकतंच एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपाला निवडून दिल्यास हैद्राबादचं नाव बदलून भाग्यनगर करु असं आश्वासन दिलं होतं.
- ‘जर हैद्राबादचं भाग्यनगर करायचं असेल तर तुम्ही भाजपाला तेलंगणात सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली पाहिजे’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. तेलंगणामधील माजी भाजपा नेता टी राजा सिंह लोध यांनीदेखील अनेक कार्यक्रमांमध्ये आपला पक्ष तेलंगणामधील शहरांची नावे बदलणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
म.सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर:
- भारतीय साहित्यविश्वातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कार 2018 ची घोषणा झाली. विविध 24 भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
- यंदा मराठी भाषेतील साहित्यासाठी प्रसिद्ध लेखक म.सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध‘ हा समीक्षा ग्रंथाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत तर ‘भाषा सन्मान‘ पुरस्कारासाठी पुण्याच्या लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे.
- 29 जानेवारी 2019 रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एक लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- डॉ. शैलजा बापट या पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे.
- तसेच, शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांतावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्स’ म्हणून निवड करण्यात आली होती.
- हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून चित्रा मुद्गल यांच्या ‘पोस्ट बॉक्स नं. 203 – नाला सोपारा’ या कादंबरीची निवड झाली आहे. तर उर्दू साहित्यासाठी रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ या कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
क्वालकॉमकडून नवा प्रोसेसर लाँच:
- सुपरफास्ट 5G इंटरनेटचे स्वप्न पाहणाऱ्या तंत्रज्ञान प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्वालकॉमने नुकताच स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर लाँच केला असून सर्वात आधी अमेरिकेमध्ये हे तंत्रज्ञान देण्यात येणार आहे.
- तसेच यानंतर आशिया आणि युरोपमध्ये 5G सेवा पुरवठादार तयार झाल्यानंतर या प्रोसेसरचे स्मार्टफोन आणले जाणार आहेत. 5G हे सध्याच्या 4 जी पेक्षा 50 ते 100 पटींनी जास्त वेगवान असणार आहे.
- क्वालकॉमने यंदाच्या मोबाईल कॉफ्रन्समध्ये 5G साठी प्रोसेसर आणण्याची घोषणा केली होती. तसेच हा प्रोसेसर पुढील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये उपलब्ध करण्याचे सांगितले होते. यावेळी मोबाईल निर्मात्या कंपन्यांनीही यास संमती दिली होती.
- 4 डिसेंबर रोजी हवाई येथील एका कार्यक्रमात क्वालकॉमने स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर लाँच केला. या प्रोसेसरमध्ये X50 हे मोडेम असणार आहे.
- क्वालकॉमचा हा अद्ययावर प्रोसेसर व्हेरिझोन कम्युनुकेशनच्या मदतीने सॅमसंग 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन अमेरिकेत 2019 च्या मध्यापर्यंत उपलब्ध होतील.
- सॅमसंग ही कंपनी अॅपलला अमेरिकेमध्ये कडवी टक्कर देत असून 5G च्या स्पर्धेत बाजी मारल्यास अॅपलला चांगलेच जड जाणार आहे.
- अॅपलला 5G असणाऱ्या आयफोनसाठी 2020 पर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. तसेच सॅमसंगनंतर वनप्लस ही प्रिमिअम बजेट स्मार्टफोन बनविणारी कंपनीही 5G चे फोन आणण्याची शक्यता आहे.
‘आरबीआय’कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कायम:
- रिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने 6.5 टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे.
- तसेच रिव्हर्स रेपो रेट 6.25 टक्के आणि बँक रेट 6.75 टक्के कायम ठेवला आहे. 2019-20 मध्ये जीडीपी 7.4 टक्के राहिल असा अंदाज आहे.
- 2018-19 च्या दुसऱ्या सत्रात महागाई दर 2.7 ते 3.2 टक्के राहिल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला. नुकतेच जीडीपीची आकडे समोर आले.
- तर त्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपीमध्ये 7.1 टक्क्यापर्यंत घसरण झाली. त्याआधीच्या तिमाहीत जीडीपी 8.2 टक्के होता.
- चालू वर्षात आरबीआयने आतापर्यंत दोनदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर सेन्सेक्समध्ये काही अंकांची घसरण झाली. अर्थतज्ञांनी आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दिनविशेष:
- 6 डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन‘ म्हणून पाळला जातो.
- भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म 6 डिसेंबर 1732 मध्ये झाला होता.
- संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म 6 डिसेंबर 1853 मध्ये झाला.
- पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म 6 डिसेंबर 1932 मध्ये झाला.
- सन 1971 मध्ये भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
- सन 1981 मध्ये डॉ.एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा