7 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 फेब्रुवारी 2019)
महाराष्ट्रातील कलाकरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान:
- प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबलावादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली.
- केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित करते. याच परंपरेत राष्ट्रपती भवनात होणाऱ्या एका शानदार कार्यक्रमात महाराष्ट्रातील 4 कलाकारांसह देशभरातील 42 कलाकारांना वर्ष 2017 चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांना सन्मानित करण्यात आले. अभिराम भडकमकर यांनी गेली दोन दशकं नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य केले आहे.
- तर नाट्य दिग्दर्शनातील योगदानासाठी सुनील शानबाग यांना सन्मानित करण्यात आले. सुनील शानबाग यांची नाट्य दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे.
- प्रसिद्ध तबलावादक पंडित योगेश सामसी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबत लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना लोककलेतील योगदानासाठी गौरविण्यात आले. 1 लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1952 पासून संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल:
- राज्य परीक्षा परिषदेमार्फत 24 फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार या परीक्षेचा पेपर एक हा दुपारी एक ते अडीच; तर पेपर दोन हा दुपारी 3.30 ते पाच या वेळेत होईल.
- अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश पुनर्परीक्षादेखील याच दिवशी आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे परिषदेच्या उपायुक्त स्मिता गौड यांनी सांगितले.
- शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर हे आधीच्या वेळापत्रकानुसार सकाळी अकरा वाजता आणि दुपारी दीड वाजता होणार होते; परंतु सकाळच्या वेळेत सैनिकी शाळेची पुनर्परीक्षा होईल. ती साडेबारा वाजता संपणार असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेचा पहिला पेपर एक वाजता सुरू होईल.
- तर या बदलामुळे सैनिकी शाळा प्रवेश आणि शिष्यवृत्ती या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांना देता येतील. जे विद्यार्थी दोन्ही परीक्षेला बसले आहेत, त्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची गरज नाही.
स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नीला विखे पाटील:
- भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे.
- जानेवारीत स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतलेले स्टीफन लोफवन यांच्यासोबत त्या काम करतील. 32 वर्षीय नीला या ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.
- नीला पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणीचे काम पाहतील, अशी माहिती अशोक विखे पाटील यांनी ‘पीटीआय’ला दिली.
- स्वीडन येथे जन्म झालेल्या नीला या स्टॉकहोम महापालिकेच्या निवडणूक समिती सदस्यही आहेत. नीला या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.
- नीला यांनी पदवीनंतर गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांसह एमबीए केले असून माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.
राज्य सरकारतर्फे कोतवालांच्या मानधनात वाढ:
- राज्यातील कोतवालांच्या मानधनात दरमहा अडीच हजार रुपये वाढ केल्याचा आदेश महसूल व वनविभागाने जारी केला.
- वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कोतवालांना दरमहा 15 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2019 पासून होणार आहे.
- राज्यातील कोतवाल आणि मानधनावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली होती.
- या समितीने शासनास सादर केलेल्या शिफारसी, कोतवालांच्या एकत्रित कामांचे स्वरूप, त्यांची शासकीय कामांशी पूर्णवेळ बांधिलकी लक्षात घेता ज्येष्ठतेनुसार त्यांच्या मानधनात वाढ करणे, राज्य शासकीय सामुहिक विमा योजना लागू करणे, अटल निवृत्ती योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देणे यासंदर्भात विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आला.
- शासनाच्या निर्णयानुसार, महसूल विभागांतर्गत ‘ड’ वर्गातील प्रथम नियुक्तीच्या पदापैकी 40 टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. जे कोतवाल ड वर्गाच्या पदोन्नतीस पात्र ठरतील. त्यांना दरमहा 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे.
- राज्य शासकीय सामुहिक विमा योजना लागू करणे, अटल निवृत्ती योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ ज्या-त्या योजनांतील अटीनुसार देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
दिल्ली हे स्वामीनाथन आयोग लागू करणारे पहिले राज्य:
- स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनले आहे. दिल्लीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केल्याचे मानले जात आहे.
- केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळणार आहे.
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी 6 फेब्रुवारी रोजी अधिकृत ट्विट करून ही माहिती दिली आहे. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार, शेतकऱ्यांना आता हमीभाव मिळेल.
- दिल्ली राज्यात शेतकऱ्यांची संख्या जवळपास 39000 इतकी छोटी असली तरी हा निर्णय मात्र मोठा असल्याचे बोलले जात आहे. या राज्यात एकूण 75000 ते 80000 एकर एवढी शेती आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळेल व उत्पादन वाढेल अशी शक्यता वर्वण्यात येत आहे.
दिनविशेष:
- आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अँन्ड्रयूज यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1873 रोजी झाला होता.
- बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट सन 1920 मध्ये पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
- सन 1974 मध्ये ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
- क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना सन 2003 या वर्षी श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा