7 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 मार्च 2019)
जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी 13व्या क्रमाकांवर:
- भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी हे जगातील 13 क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे 13व्या क्रमाकांवर आहेत.
- मागील वर्षी मुकेश अंबानी 19व्या स्थानी होते. ते आता 13व्या स्थानी आले आहेत 2017 मध्ये फोर्ब्सची जी यादी जाहीर झाली होती त्यात मुकेश अंबानी 33व्या क्रमांकावर होते. सध्या भारतात 106 श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यापैकी मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.
- 2018 मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती 40.1 अब्ज डॉलर एवढी होती ती आता 50 अब्ज इतकी झाली आहे. मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांचा क्रमांक 34 वा आहे. तर विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी हे 36व्या स्थानावर आहेत.
- तर एचसीएलचे सह संस्थापक हे 82व्या क्रमांकावर आहेत. तर लक्ष्मी मित्तल 91व्या क्रमांकावर आहेत. बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला 122व्या स्थानी आहेत. भारती एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल 244व्या क्रमांकावर आहेत. तर पतंजली आयुर्वेद चे सह संस्थापक आचार्य बाळकृष्ण हे 365व्या स्थानावर आहेत.
केप्लर दुर्बिणीने शोधलेल्या पहिल्या बाह्य़ग्रहावर शिक्कामोर्तब:
- दहा वर्षांपूर्वी सोडण्यात आलेल्या नासाच्या केप्लर दुर्बीणीने शोधलेला पहिला संभाव्य बाह्य़ग्रह हा आता खरोखर बाह्य़ग्रह ठरला आहे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. या बाह्य़ग्रहाचे नाव केप्लर 1658बी असून तो तप्त गुरू ग्रहासारखा आहे. तो त्याच्या मातृताऱ्याभोवती 3.85 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो, असे अमेरिकेतील हवाई विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.
- मातृताऱ्याचा व्यास पृथ्वीवरून सूर्य पाहताना असतो त्याच्या साठ पट जास्त आहे. केप्लर दुर्बीणीने अनेक संभाव्य बाह्य़ग्रहांचा शोध लावला होता. ही दुर्बीण 2009 मध्ये सोडण्यात आली होती. त्यात संक्रमण पद्धतीने ग्रहांचा शोध घेण्यात आला.
- ग्रह ताऱ्यासमोरून जाताना त्याचा प्रकाश किंचित कमी होतो त्यातून अप्रत्यक्ष पद्धतीने यात ग्रहाचे अस्तित्व शोधले जाते. यात इतर कारणामुळे संक्रमणात जसा ताऱ्याच्या प्रकाशात फरक पडतो तसा पडू शकतो त्यामुळे या संभाव्य बाह्य़ग्रहांचे अस्तित्व इतर पद्धतींनी निश्चित केले जाते असे अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नल या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे.
- केप्लर दुर्बीणीने 2011 मध्ये केप्लर 1658बी हा संभाव्य बाह्य़ग्रह शोधून काढला होता तो खडकाळ आहे. त्याच्या मातृताऱ्याचा त्यावेळी केलेला अंदाज चुकीचा ठरला असून तारा व केप्लर 1658बी ग्रह हे आकाराने मोठे आहेत.
- हवाई विद्यापीठाचे अॅशले चॉनटॉस यांनी सांगितले की, नवीन विश्लेषणानुसार ताऱ्यांच्या ध्वनिलहरी वापरू न या ग्रहाच्या व मातृताऱ्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केप्लर 1659बी हा गुरूसारखा तप्त ग्रह असून तो तीन पटींनी मोठा आहे.
देशातील सर्वांत स्वच्छ शहर इंदूर:
- मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले.
- भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-2019 पुरस्कार राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सुमारे 70 श्रेणीतील स्वच्छ शहरांच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
- देशातील सर्वांत स्वच्छ शहराच्या श्रेणीत इंदूरनंतर छत्तीसगडच्या अंबिकापूर शहराची निवड झाली. कर्नाटकातील म्हैसूर हे तिसऱ्या स्थानावर आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या श्रेणीत अहमदाबाद, तर पाच लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणारे उज्जैन स्वच्छ शहर म्हणून पहिल्या स्थानावर राहिले.
- छत्तीसगडचे नगरविकास मंत्री डॉ. शिवकुमार डहरिया यांनी राष्ट्रपतींकडून सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार प्राप्त केला. स्वच्छतेच्या दिशेने सर्वांत वेगाने आणि नियोजनबद्ध काम केल्याने छत्तीसगड राज्याला हा पुरस्कार देण्यात आला.
- छत्तीसगडच्या विविध नगरपालिकांनादेखील वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. रायपूर महानगरपालिकेचे महापौर प्रमोद दुबे यांनी छत्तीसगडसाठी ही मोठी गौरवाची बाब असल्याचे म्हटले आहे.
- 2019 च्या स्वच्छता सर्व्हेक्षण पुरस्कारासाठी दिल्लीतून गेलेल्या पथकाने छत्तीसगडमध्ये बराच काळ अभ्यास केला. आठवड्यापेक्षा अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण केले. शहर विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील वेगवेगळ्या राज्यांतील 4 हजार 237 शहरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या श्रेणीतील रॅकिंग जाहीर करण्यात आली.
राज्यात 10 मार्चला पोलिओ लसीकरण अभियान:
- राज्यात 10 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून, सुमारे 1 कोटी 22 लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 5 वर्षांपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
- दरवर्षी वर्षातून दोन वेळेस पोलिओची विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येते. यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत.
- दरम्यान, पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची स्थापना केली आहे. सुमारे 82 हजार 719 पोलिओ बुथ उभारण्यात येतील. त्यासाठी 2 लाख 19 हजार 313 कर्मचारी नियुक्त केले आहेत.
ग्रामीण भागात ऑनलाइन व्यवहारावर भर:
- नोटाबंदीनंतर नवीन नोटा आणि त्यांचा साठा पुरेशा प्रमाणात व्यवहारात उपलब्ध नव्हता. त्यामुळे ऑनलाइन व्यवहाराकडे सर्वसामान्य जनतेने वळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न होत होते.
- शहरांबरोबर ग्रामीण भागातही त्यासाठी ॲपची माहिती देण्यात आली. सुरवातीला प्रयोग करणाऱ्या नागरिकांना आता ऑनलाइनची सवय जडली आहे. त्यामुळे एटीएम तसेच बॅंकांमध्ये गर्दीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे.
- कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य द्यावे, यासाठी केंद्र सरकारसह विविध अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात होते. चलनी नोटा वापरण्याची सवय असल्याने कॅशलेस व्यवहार अंगवळणी पडण्यास बराच कालावधी गेला.
- सध्या ऑनलाइन व्यवहाराची सुलभता लक्षात आल्यानंतर अनेकांनी यालाच प्राधान्य दिले आहे. यासाठी गुगल पे, फोन पे, पेएटीएम यांसह इतर ॲप्सचा वापर केला जात आहे. ऑनलाइन व्यवहार केल्यास रिवॉर्ड म्हणून दहा ते पाचशे रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळत असल्याचेही ॲप वापरणाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
- तरुणांचा ओढा ऑनलाइन व्यवहाराकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. कॅशबॅक तर मिळतोच, पण थेट बॅंक खात्यावर रक्कम जमा होत असल्याने अनेकांना एटीएमवर जाऊन कॅश काढून व्यवहार करणे वेळखाऊपणाचे वाटत आहे.
दिनविशेष:
- ‘फोटोग्राफी’चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म 7 मार्च 1765 रोजी झाला.
- 7 मार्च 1849 मध्ये महान वनस्पतीतज्ञ ल्यूथर बरबँक यांचा जन्म झाला होता.
- ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म 7 मार्च 1911 रोजी झाला होता.
- 2009 या साली केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा