8 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 जानेवारी 2019)
PM नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक:
- बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे.
- या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी‘ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिकेत असणार आहे.
- गेल्याच आठवड्यात विवेकच्या नावाची अधिकृत घोषणा या चित्रपटासाठी करण्यात आली होती. विवेक हा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधल्या झगमगत्या दुनियेपासून लांब आहे त्यामुळे विवेकची निवड या भूमिकेसाठी कशी झाली याचे कुतूहल अनेकांना होते. त्यातूनच विवेकच्या नावाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर त्याच्या नावाची खिल्लीही उडवण्यात आली होती.
- मात्र नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पहिल्या वहिल्या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही. विवेकचा लूक हा मोदींच्या जवळपास जाणारा आहे असे म्हणत अनेकांनी कौतुक केले आहे.
भारताचा जीडीपी 7.2 टक्क्यांवर:
- देशाचा GDP (सकल राष्ट्रीय उत्पादन) 7.2 टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षीचा म्हणजेच 2017-18 चा जीडीपी हा 6.7 टक्के होता. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची म्हटली पाहिजे.
- नोटाबंदीचा निर्णय आणि घाईत राबवण्यात आलेला जीएसटी यामुळे मागील वर्षात जीडीपी घसरला होता. मात्र या वर्षाच्या सुरुवातीला तरी जीडीपी वधारलेला पाहायला मिळतो आहे.
- जीएसटी आणि नोटाबंदीचा परिणाम जीडीपीवर होणार नाही असे सरकारने जाहीर केले होते. मात्र त्या घोषणाच ठरल्या प्रत्यक्षात या दोन्हीचा परिणाण जीडीपीवर झालेला पाहायला मिळाला.
- आता वर्षाच्या सुरुवातीला तरी जीडीपी वाढला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि मोदी सरकारच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे असेच म्हटले पाहिजे.
‘ग्रीन बुक’ला सर्वाधिक गोल्डन ग्लोब पुरस्कार:
- प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात अनेक धक्कादायक निकाल लागले असून, ‘ग्रीन बुक‘ या कालनाटय़ाधारित चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात उत्तम चित्रपट, संगीत व विनोद या तीन प्रवर्गात या चित्रपटाने बाजी मारली आहे.
- राणी अॅनीच्या जीवनचरित्रावरील ‘बोहेमियन ऱ्हापसोडी‘ चित्रपटाने उत्तम नाटय़प्रकारात ‘अ स्टार इज बॉर्न‘ला मात दिली आहे. चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांच्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. अँडी सॅमबर्ग व सँड्रा ओह यांनी या हॉलिवूड पुरस्कार कार्यक्रमाचे संचालन केले.
- ग्रीन बुकला उत्तम नाटय़, उत्तम सहायक अभिनेता (महेरशाला अली), उत्तम पटकथा (लेखक पीटर, फॅरेली, ब्रायन क्युरी व निकल व्हॅलेलोंगा) हे तीन पुरस्कार मिळाले.
- बोहेमियन ऱ्हापसोडीने उत्तम नाटय़ गटात (संगीत चरित्रपट), अ स्टार इज बॉर्न, ब्लॅक पँथर, इफ बिएल स्ट्रीट कुड टॉक, ब्लॅक्सान्समन यांना मागे टाकले. निर्माते ग्रॅहॅम किंग यांनी सांगितले, की पुरस्काराची अपेक्षा नव्हती, पण अभिनेता रामी मलेक याचा पुरस्कार अपेक्षित होता.
बांगलादेशच्या पंतप्रधानपदी पुन्हा ‘शेख हसिना’ यांचा शपथविधी:
- बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शेख हसिना यांनी चौथ्यांदा शपथ घेतली. भीषण हिंसाचार आणि मतघोटाळ्याच्या आरोपांचे ग्रहण लागलेल्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या अवामी लीग या पक्षाने प्रचंड बहुमत मिळवले होते.
- बंगभवन येथे झालेल्या समारंभात अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांनी 71 वर्षांच्या हसिना यांना पदाची शपथ दिली. हसिना या चौथ्यांदा पंतप्रधान झाल्या असून, सलग तीन वेळा या पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
- सर्वप्रथम 1996 साली आणि त्यानंतर 2008, 2009 व 2014 साली त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. अध्यक्षांनी यावेळी नव्या मंत्र्यांनाही शपथ दिली. हसिना यांच्या मंत्रिमंडळात 24 कॅबिनेट मंत्री, 19 राज्यमंत्री आणि तीन उपमंत्री यांचा समावेश आहे.
- तसेच त्यांच्या मंत्रिमंडळात प्रामुख्याने नवे चेहरे आहेत. नव्या कॅबिनेटपैकी 31 मंत्री पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. संरक्षणासारखी महत्त्वाची खाती हसिना यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत.
मेंदूरोगांवर उपचारासाठी यंत्र विकसित:
- मेंदूतील पेशींना विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून उद्दीपन देऊन रुग्णांना फेफरे व पार्किन्सन (कंपवात) यात उपचार करण्यासाठी बिनतारी यंत्र विकसित करण्यात आले असून ते ब्रेन पेसमेकर वॉण्ड या नावाने ओळखले जाईल. हे यंत्र म्हणजे मेंदूउद्दीपक असून त्याचे काम मेंदूतील विद्युत घडामोडी तपासून काही वावगे आढळल्यास विद्युत उद्दीपन देणे हे आहे.
- अमेरिकेत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यामुळे मेंदूरोगातील उपचारात बदल होणार आहेत. कंपवात व फेफरे यात हे उपकरण उपयोगी असून मेंदूच्या इतर रोगातही ते साहाय्यक ठरणार आहे, असे नेचर बायोमेडिकल इंजिनीयरिंग या नियतकालिकात म्हटले आहे.
- मेंदूला धक्का किंवा इजा होण्यापूर्वीचे विद्युत संदेश त्यांची कंप्रता यात तपासली जाणार आहे. त्यानंतर किती विद्युत उद्दीपन गरजेचे आहे हे ठरवले जाईल. या उपकरणाचा पुरेपूर वापर करण्यासाठी अजून काही वर्षे जावी लागणार आहेत.
- वायरलेस आर्टिफॅक्ट फ्री न्यूरोमॉडय़ुलेशन डिव्हाइस म्हणजे वॉण्ड असे त्याचे नाव असून त्यात बिनतारी यंत्रणा वापरली आहे. यात विद्युत उद्दीपन देतानाच विद्युत संदेशांची नोंदणीही होणार असून त्याचा दुहेरी उपयोग आहे.
दिनविशेष:
- सन 1828 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ डेमोक्रॅटिक पार्टी सुरु झाली.
- ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म 8 जानेवारी 1909 मध्ये झाला होता.
- राजस्थान विद्यापीठाची स्थापना सन 1947 मध्ये झाली.
- सन 2000 मध्ये लता मंगेशकर यांची 1999 साठीच्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
- भारत व व्हिएतनाम दरम्यान सन 2001 मध्ये सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा