8 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 मार्च 2019)
बाजारात लवकरच येणार 20 रुपयांचे नाणे:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच 20 रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले. याशिवाय एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नव्या नाण्यांचेही अनावरण करण्यात आले. दिव्यांगांना सहजपणे ओळखता येईल अशी या नाण्यांची रचना केलेली आहे.
- या नाण्यांचा आकार 27 मि.मी. असेल. 20 रुपयांच्या नाण्याच्या कडांवर कोणतेही चिन्ह नसेल. नाण्याचे बाहेरील वर्तुळ 65 टक्के तांबे, 15 टक्के जस्त आणि 20 टक्के निकेल या धातूंचे असेल, तर आतील वर्तुळात 75 टक्के तांबे, 20 टक्के जस्त आणि 5 टक्के निकेल असेल.
- नाण्याच्या एका बाजूवर अशोक स्तंभाचे निशाण व खाली ‘सत्यमेव जयते’ लिहिलेले असेल. डाव्या बाजूला ‘भारत’ व उजव्या बाजूला इंग्रजीत ‘INDIA‘ असे लिहिलेले असेल. मागील बाजूला नाण्याचे मूल्य ’20’ असेल. तसेच, रुपया व पिकाचे चिन्ह असेल.
गुगलचे खास डुडल, नारी शक्तीला सलाम:
- गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असते. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असते.
- गुगलने 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकले आहे. गुगलने खास डुडलद्वारे स्त्री शक्तीला सलाम केला आहे.
- आज जगभरात महिला शक्ती आणि महिलांच्या सन्मानासाठी महिला दिन (International Womens Day) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे.
- गुगलनेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सशक्तीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत.
- जागतिक महिला दिनानिमित्त एअर इंडियाने हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे.
जगभरात आज महिला दिन (International Womens Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
शिक्षक भरतीसाठी ‘रोस्टर’ पद्धतीनेच आरक्षण:
- उच्च शिक्षण संस्थांमध्ये यापूर्वीची 200 बिंदू क्रम (रोस्टर) आधारित आरक्षण पद्धती लागू करण्यासाठीचा ‘केंद्रीय शैक्षणिक संस्था (शिक्षकांच्या संवर्गातील आरक्षण) अध्यादेश, 2019’ जारी करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
- यामुळे आरक्षणासाठी विद्यापीठ-महाविद्यालयाचा संबंधित विभाग किंवा विषय हे एकक धरण्याऐवजी ते संपूर्ण विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे एक एकक समजले जाणार आहे.
- याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘अनुसूचित जाती-जमातींच्या तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास वर्गाच्या उमेदवारांची केंद्रीय आणि संलग्न संस्थांत अध्यापकांच्या संवर्गात थेट भरती करताना आरक्षण देण्यासाठी हा अध्यादेश काढला जात आहे.’
- अलाहाबाद उच्च न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये दिलेल्या निर्णयानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने गेल्या मार्चमध्ये आरक्षणाबाबत नवी घोषणा केली होती. त्यानुसार, अध्यापकांच्या अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या जागा निश्चित करण्यासाठी विद्यापीठ किंवा महाविद्यालयाचा संबंधित विभाग हा पायाभूत एकक म्हणून ग्राह्य़ धरण्यास सांगितले होते. याविरोधात मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळून लावली होती.
- विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय रद्द करून जुनीच 200 बिंदू क्रमाधारित पद्धती सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी अनेक विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
पुरुषांच्या तुलनेत महिलांना 19 टक्के कमी वेतनमान:
- भारतात कर्मचाऱ्यांमध्ये लिंगभेद हा वेतनमानाबाबतही कायम असल्याचे जागतिक महिला दिनापूर्वी जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. देशात पुरुषांच्या तुलनेत काम करणाऱ्या महिलांना 19 टक्के कमी वेतन मिळते.
- ‘मॉन्स्टर’च्या वेतन निर्देशांकानुसार, पुरुष आणि महिलांमध्ये वेतनाबाबतची दरी विस्तारली आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना सरासरी 46.19 रुपये अधिक मिळतात.
- वर्ष 2018 मध्ये पुरुषांना ढोबळ ताशी पगार 242.49 रुपये मिळत होता. तर स्त्रियांच्या ताशी मेहनतान्याची रक्कम 196.30 रुपये होती. अधिकतर क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन आहे, असेही याबाबतचे निरीक्षण सांगते.
- ‘मॉन्स्टर’च्या म्हणण्यानुसार, माहिती तंत्रज्ञान तसेच संबंधित क्षेत्रात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना 29 टक्के तर निर्मिती क्षेत्रात 24 टक्के अधिक वेतन आहे. आरोग्यसेवासारख्या क्षेत्रात महिलांची संख्या अधिक असतानाही पुरुष 21 टक्के वेतन अधिक मिळवितात. तुलनेत वित्तीय सेवा, बँक, विमा क्षेत्रात वेतनभेद अवघा 2 टक्के आहे.
राष्ट्रीय हरित लवादाचा ‘फोक्सवॅगन’ला कोटींचा दंड:
- जर्मनची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनला (Volkswagen) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कंपनीला 500 कोटींचा दंड ठोठावला आहे.
- दंडाची ही रक्कम येत्या दोन महिन्यात भरण्याची ताकीद एनजीटीने फॉक्सवॅगनला दिली आहे. आपल्या कारमध्ये बेकायदारित्या चीप सेट लावल्याप्रकरणी एनजीटीने कंपनीला दंड केला आहे. या उपकरणामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्याऐवजी त्याच्या आकडेवारीत बदल केला जात होता.
- तत्पूर्वी, एनजीटीने जानेवारीतही फॉक्सवॅगनला 1010 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. पण त्यावर कंपनीने कोणतेच पाऊल उचलले नव्हते. फॉक्सवॅगनच्या कारमधून वायू प्रदूषण वाढत असल्याच्या कारणावरुन एनजीटीने हा निर्णय घेतला आहे.
- फॉक्सवॅगन कंपनीने आपल्या डिझेल कारमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्याऐवजी प्रदूषण तपासणीच्या आकड्यांमध्ये फेरफार होईल, अशा चीपचा वापर केल्याचा आरोप आहे. कंपनीने 2008 ते 2015 दरम्यान 1.11 कोटी कारमध्ये हे उपकरण लावल्याचे वर्ष 2015 मध्ये पहिल्यांदा मान्य केले होते. या सर्व कार्स जगभरातून विकली गेली होती.
दिनविशेष:
- 8 मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन‘ म्हणून पाळला जातो.
- न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना सन 1817 मध्ये झाली.
- सन 1911 या वर्षी पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
- 1948 मध्ये भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.
- तसेच सन 1948 मध्ये फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
- घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) सन 1957 मध्ये प्रवेश झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा