8 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
8 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2022)
मानवी हक्कांसाठी झगडणाऱ्यांना शांततेचे ‘नोबेल’जाहीर :
- शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार कैदेत असलेले बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बियालयात्स्की यांच्यासह मानवी हक्कांसाठी कार्यरत रशियन संघटना ‘मेमोरियल’ आणि युक्रेनची संस्था ‘सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज’ यांना संयुक्तरीत्या शुक्रवारी जाहीर झाला.
- रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संस्थांना शांततेचे नोबेल जाहीर होणे हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना मोठा धक्का असल्याचे मानले जाते.
- नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
- नॉर्वेच्या नोबेल समितीच्या अध्यक्ष बेरिट राइस-अँडरसन यांनी ही घोषणा करताना सांगितले, की बेलारूस, रशिया आणि युक्रेन या शेजारी राष्ट्रांमध्ये मानवी हक्क, लोकशाही आणि शांततापूर्ण साहचर्यासाठी झटणाऱ्या तीन उत्कृष्ट सेवाव्रतींचा समिती सन्मान करू इच्छिते.
- रशियाची ‘मेमोरियल’ तसेच युक्रेनची ‘सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज’या दोन संस्था आणि बेलारूसचे कार्यकर्ते अॅलेस बियालयात्स्की यांनी मानवी मूल्ये जपण्यासाठी लष्करी संघर्षांविरुद्ध आणि न्याय्य तत्त्वांच्या बाजूने सातत्यपूर्ण कार्य उभे केले आहे.
- या तिघांनी खऱ्या अर्थाने अल्फ्रेड नोबेल यांनी रुजवलेल्या शांतता आणि राष्ट्रांमधील बंधुभावाच्या मूल्यांना पुनरुज्जीवित केले आहे.
Must Read (नक्की वाचा):
‘यूपीएससी’तर्फे परीक्षा, भरतीची माहिती देणारे ‘अॅप’ कार्यान्वित :
- केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) परीक्षा, भरतीसंदर्भातील माहिती देणारे मोबाइल उपयोजन (अॅप) कार्यान्वित करण्यात आले आहे.
- हे ‘अँड्रॉइड मोबाइल उपयोजन’ असून, त्याद्वारे ही महत्त्वाची माहिती इच्छुकांना सहज मिळू शकेल, अशी माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
- ‘गुगल प्ले स्टोअर’वर ते उपलब्ध असेल.
- मात्र, याद्वारे कोणताही अर्ज भरता येणार नाही.
- हे ‘अॅप’ https://play.google.com/store/apps/details?id=com.upsc.upsc या ‘लिंक’वरून घेता येईल.
हरमनप्रीत सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम हॉकीपटू :
- भारतीय हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंगची सलग दुसऱ्या वर्षी ‘एफआयएच’ सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली.
- यावर्षी ‘एफआयएच’चा पुरस्कार मिळवणारा हरमनप्रीत तिसरा भारतीय खेळाडू ठरला.
- सलग दोन वर्षे सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार पटकावणारा हरमनप्रीत चौथा खेळाडू आहे.
- यापूर्वी टेऊन डी नूएर (नेदरलँड्स), जेमी डायर (ऑस्ट्रेलिया) आणि आर्थर व्हॅन डोरेन (बेल्जियम) यांनी सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळविला होता.
दिनविशेष:
- संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी.एन. रामचंद्रन यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1922 मध्ये झाला.
- इंडियन एअर फोर्स अॅक्ट व्दारे 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायूदलाची स्थापना झाली. तेव्हा पासून हा दिवस ‘भारतीय वायुसेना दिन’ म्हणून पाळला जातो.
- सन 1959 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
- 11 सप्टेंबरच्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सन 2001 मध्ये सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.