9 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 एप्रिल 2019)
भारतीय हवाई दलाने सादर केले एफ-16 विमानाचे पुरावे:
- 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीत एफ-16 विमान पाडले गेले नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने जबरदस्त चपराक दिली आहे.
- एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले गेल्याचे पुरावेच भारतीय हवाई दलाने प्रसिद्ध केले आहे. तसेच हे एफ-16 विमान मिग-21 बिसॉन या विमानानेच पाडल्याचेही हवाई दलाने अधोरेखित केले आहे.
- 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीदरम्यान दोन विमाने कोसळली. त्यातील एक भारतीय हवाई दलाचे मिग-21 बिसॉन होते. तर दुसरे विमान पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान होते.
- एअर व्हाइस मार्शल आरजीके कपूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये उडालेल्या चकमकीचा वृत्तांत पुराव्यांसहीत सादर केला. यावेळी त्यांनी चकमकीदरम्यानच्या रडार इमेजही प्रसिद्ध केल्या.
औरंगाबाद लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात:
- पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याठी तब्बल 22 उमेदवार रिंगणात आहेत. 42 उमेदवारांनी 62 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 12 उमेदवारांचे 17 अर्ज छाननीत बाद ठरले, तर सात जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
- एकूण 23 उमेदवारांपैकी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांबरोबरच काही अपक्ष उमेदवारही ताकदवान मानले जात आहेत. मतविभाजनातील उपद्रव मूल्य ज्यांच्याकडे अधिक त्यांची चर्चा निवडणुकीच्या रिंगणात अधिक होते. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अशी चर्चा सुरू झाली आहे.
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रदीप दत्त, भगवान साळवे, रविंद्र बोडखे, अब्दुल सत्तार, कल्याण पाटील, जिया उल शेख, सादिक बेग या सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 23 उमेदवारांमध्ये लढतीत असणारे प्रमुख उमेदवार स्वत:ची राजकीय मतजुळवणी कशी होईल याचे आडाखे बांधत आहेत.
- प्रशासनाने निवडणुका योग्य वातावरणात व्हाव्यात यासाठी विशेष तयारी सुरू केली असून उमेदवार वाढल्यामुळे दोन मतदान फलकाचे आणि एक मतदान नियंत्रक अशी रचनाअसणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांची एव्हरेस्ट मोहीम:
- उत्तुंग शिखर पार करण्यासाठी लागणारे विलक्षण धैर्य, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत अशा विविध कसोटय़ांवर यशस्वी ठरलेले राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांतील 11 आदिवासी विद्यार्थी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पथकात पालघरमधील एका विद्यार्थ्यांचा समावेश असून नुकतेच काठमांडू येथे हे पथक रवाना झाले.
- आदिवासी विकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन शौर्य 2019’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होत असून या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सहय़ाद्री अतिथिगृह येथे 5 एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- दुर्गम भागात राहून जगण्याच्या आव्हानांना पेलणारे आदिवासी विद्यार्थी मुळातच शारीरिक आणि मानसिकरीत्या खंबीर असतात.
- या आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी तयार करतानाच शिस्तबद्ध प्रशिक्षणाची जोड देत त्यांच्यात नेतृत्व कला रुजवावी, आयुष्याकडे सकारात्मकरीत्या बघण्याचा दृष्टिकोन द्यावा आणि भविष्यात देशासाठी आदर्श संघटक घडावेत या उद्देशाने आदिवासी विकास विभागातर्फे ‘मिशन शौर्य’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
- तसेच गेल्या वर्षी पाच आदिवासी विद्यर्थ्यांनी एव्हरेस्ट सर करीत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते.
चालुक्यकालीन कन्नड लिपीतील शिलालेखचा शोध:
- विटा तालुक्यातील भाळवणी येथे 950 वर्षांपूर्वीच चालुक्यकालीन हळळे कन्नड लिपीतील शिलालेख सापडला असून यामुळे प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडणार आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी या शिलालेखाचे संशोधन केले आहे.
- चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) उर्फ भुवनकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोध्दार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापाऱ्यांनी करुन या बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा हा लेख आहे.
- खानापूर तालुक्यातील भाळवणी हे प्राचीन काळापासून प्रसिध्द गाव आहे. कल्याणीहून राज्य करणाऱ्या चालुक्य राजांची भाळवणी ही उपराजधानी होती. हे गाव एक प्रमुख व्यापारी पेठ होते. अनेक प्रसिध्द व्यापारी या गावात रहात असत. गावातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी गावात मोठी मंदिरे बांधल्याचे उल्लेख आहेत.
- भाळवणी येथे यापूर्वी दोन कानडी आणि एक देवनागरी शिलालेख सापडले होते. त्यापकी दोन चालुक्यकालीन तर एक यादवनृपती दुसरा सिंघण याच्या काळातील आहेत. हे सर्व शिलालेख सध्या कराड येथे आहेत. मात्र, सध्या उपलब्ध झालेला शिलालेख त्याहून वेगळा आहे.
दिनविशेष:
- समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी झाला.
- पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म 9 एप्रिल 1887 मध्ये झाला.
- सन 1967 मध्ये बोइंग-767 या विमानाने पहिले उड्डाण केले होते.
- सन 1994 सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांना आर.डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- लता मंगेशकर यांना सन 1995 मध्ये अवधरत्न अनई साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा