9 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 मार्च 2019)
कृष्णा कोहली पाकिस्तान सभागृहाच्या अध्यक्षपदी:
- पाकिस्तान संसद सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी पहिल्यांदाच हिंदू महिलेला मिळाली आहे. कृष्णा कुमारी कोहली उर्फ किशू बाई असे त्यांचे नाव आहे.
- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. पाकिस्तानमधील श्रमिकांच्या अधिकारांसाठी कृष्णा कुमारी कोहली यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानंतर 2018 मध्ये त्या संसदेवर निवडून आल्या.
- पाकिस्तान संसदेमध्ये निवडून येणाऱ्या कृष्णा पहिल्या महिला हिंदू खासदार आहेत. पाकिस्तानच्या संसदेच्या सभागृहातील सदस्य फैजल जावेद यांनी यासंदर्भात ट्विट करत ही माहिती दिली आहे.
- ‘सभागृहातील सहकारी कृष्णा कुमारी कोहली यांना जागतिक महिला दिनानिमित्त सभागृहाच्या अध्यक्षपदाचा मान देण्याचे सदस्यांनी ठरविले आहे’, असे ट्विट फैजल जावेद यांनी केले आहे.
- ‘मी आज या आसनावर बसून स्वत:ला फार भाग्यवान मानते’, असे म्हणून 40 वर्षीय कृष्णा कुमारी कोहली यांनी अधिवेशनाची सुरूवात केली.
‘PSI’ परीक्षेत सुमित खोत राज्यात प्रथम:
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 2017 मध्ये 650 जागांसाठी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेचा रखडलेला निकाल जाहीर झाला. या परीक्षेत रत्नागिरीचा सुमित खोत राज्यात पहिला आला.
- बीड जिल्ह्यतील विष्णुपंत भगवान तिडके हे मागासवर्गवारीतून, तर महिला वर्गवारीतून धुळ्यातील अश्विनी सुभाष हिरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या परीक्षेचा निकाल आणि निवड झालेल्या उमेदवारांचे कटऑफ गुण एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
- एमपीएससीने 2017 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 650 जागांसाठी परीक्षा घेतली होती. मात्र, त्याचा निकाल प्रलंबित होता. त्यानंतर 2018 मध्ये झालेल्या परीक्षेचाही निकाल जाहीर झालेला नाही.
- त्यामुळे 24 मार्चला होणाऱ्या 2019च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यापूर्वीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची निवड होण्याची शक्यता असून, नव्या उमेदवारांना संधी मिळणार नाही.
मराठा, कुणबी उमेदवारांना मोफत ‘UPSC’चे प्रशिक्षण:
- मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगात (यूपीएससी) टक्केवारी वाढावी, यासाठी राज्य शासनाची छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) विद्यावेतन देणार आहे. दिल्ली येथे यूपीएससीच्या प्रशिक्षणासाठी होणारा खर्च शासन उचलणार आहे.
- राज्यात 225 मराठा, कुणबी उमेदवारांना यूपीएससी प्रशिक्षण निवडीसाठी सारथीकडून परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच दरमहा 13 हजार रूपये विद्यावेतन दिले जाईल. दिल्ली येथील नामांकित संस्थेत यूपीएससीचे प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.
- सन 2020 मध्ये होणाऱ्या यूपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी मराठा, कुणबी समाजातील उमेदवारांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. त्याकरिता ‘सारथी-दिल्ली यूपीएससी सीईटी परीक्षा 2019’ ही प्रवेश परीक्षा 31 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.
- तर यातील गुणवत्ता यादीनुसार 225 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या उमेदवारांना पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षेची माहिती देण्यासाठी पुणे येथे 15 दिवस निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- दिल्ली येथील यूपीएससी प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी भरणार आहे. यासह प्रशिक्षण संस्थेत जाण्यासाठी प्रवेश खर्च, राहण्याची व्यवस्था करण्यासाठी 15 हजार रुपये एकतर्फी अनुदान दिले जाणार आहे.
आधार पडताळणीसाठी आता शुल्क आकारणार:
- आधार सुविधेचा वापर करणाऱ्या खाजगी कंपन्यांना प्रत्येक व्यक्तीच्या आधार पडताळणीसाठी आता 20 रूपये मोजावे लागणार आहेत. मात्र, ‘प्रोसेसिंग ऑफ आधार ऑथेंटिकेशन सर्व्हिस रेग्युलेशन 2019‘ अंतर्गत सरकारी संस्थांना यामधून सूट देण्यात आली आहे.
- तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा सरकारी संस्थांना कोणत्याही कामांसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. याबाबतचे परिपत्रक ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ने (यूआयडीएआय) जारी केले आहे.
- तर या परिपत्रकानुसार, प्रत्येक E-KYC च्या व्यवहारासाठी 20 रूपये (करांसह) तर इतर पडताळणीसाठी 50 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. खासगी कंपन्यांना 15 दिवसांमध्ये ही रक्कम द्यावी लागणार आहे.
- जर 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असतील तर त्या पैशांवर व्याज आकारण्यात येणार आहे. जर संबंधितांनी पैसे किंवा व्याज न दिल्यास ऑथेटिंकेशन आणि E-KYC सर्व्हिस बंद केली जाण्याची शक्यता आहे.
बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी:
- फिनलँड येथे सुरू असलेल्या 38व्या आंतरराष्ट्रीय जीबी बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरीची नोंद केली आहे. बॉक्सर दिनेश डगर याने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या एवाल्डास पेट्रास्कास याला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
- गेल्या वर्षी इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या 23 वर्षीय दिनेशने रंगलेल्या पहिल्या फेरीत पेट्रास्कासला 3-2 असे पराभभूत केले.
- लिथुयानियाचा पेट्रास्कास हा माजी युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता तसेच 2017च्या युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बॉक्सर असल्यामुळे दिनेशसाठी हा विजय मोठा मानला जात आहे.
- आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता सुमित संगवान (91 किलो) आणि युवा गोविंद साहनी (49 किलो) यांना पुढे चाल मिळाल्याने भारताची दोन पदके निश्चित झाली आहेत.
- अंकित खटाना (64 किलो) याचे आव्हान मात्र पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. इंग्लंडच्या ल्युक मॅककॉरमॅक याने त्याला 5-0 असे सहज पराभूत केले. या स्पर्धेत 15 देशांमधील जवळपास 100 बॉक्सर्सनी सहभाग नोंदवला आहे.
दिनविशेष:
- पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म 9 मार्च 1934 मध्ये झाला होता.
- प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचाजन्म 9 मार्च 1951 मध्ये झाला.
- पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म 9 मार्च 1952 रोजी झाला.
- बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सन 1959 पासून सुरूवात झाली.
- सन 1992 या वर्षी कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के.के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
Very good work to mpscworld easy to get find it in the world dinvishesh and easy way to reading and learning thank you
Thank you so much, Poonam.
Keep visiting mpscworld.