संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन – राज्यात मध्यरात्रीपासून जमावबंदी कलम 144 लागू : मुख्यमंत्री
मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कलम 144 म्हणजेच जमावबंदी 31 मार्च पर्यंत लावण्यात आली असून पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरू शकणार नाही. कोरोना व्हायरसचा प्रभाव यापुढे अधिक तीव्रतेने वाढण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोन व्हायरस च्या रुग्णांची संख्या यापुढे गुणाकाराने वाढू शकते व त्यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.
कलम 144 हा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू असून त्याबरोबरच लोकल वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, खासगी बस सेवा बंद करण्यात आली आहे. लोकल वाहतूक हि फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहणार आहे. बँक, मेडिकल व जीवनावश्यक वस्तू पुरविणारे दुकाने म्हणजेच धान्य, किराणा, दूध, भाजी अशी दुकानं खुली राहतील व बाकी सर्व आस्थापणे बंद राहणार असून शक्यतो जमेल त्यांनी सर्वांनी “वर्क फ्रॉम होम” ची अंमलबजावणी करावी असेही खाजगी कार्यालयांना सूचित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –
- रेल्वे, खासगी बसेस, एसटी बसेस बंद राहणार आहेत.
- जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील.
- अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील व बँका आणि वित्तीय संस्था सुरूच राहतील.
- शासकीय कार्यालयात आता केवळ 5 टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
- आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून भारतात येणारी सर्व विमाने बंद होणार आहे.
- ज्यांचं घरीच विलगीकरण केलेले आहे, त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून 15 दिवस घराबाहेर पडू नका. घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
- लॉकडाऊन हा सध्या 31 मार्च पर्यंत असून, पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल.
- सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा सुरु राहील, पण भाविकांसाठी बंद राहतील.
- सर्वांनी माणुसकी बाळगून कामगार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे आवाहन करण्यात आले.