Current Affairs of 5 June 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (5 जून 2018)
मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नावात बदल :
- उत्तर प्रदेशात योगी सरकारने प्रसिद्ध मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलले असून त्याऐवजी या स्टेशनचे नाव आता पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन असे असणार आहे. याबाबत अधिसूचनाही सरकारने प्रसिद्ध केली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीही याबाबत ट्विट केले आहे.
- गोयल यांनी म्हटले की, जनतेच्या मागणीवरुन उत्तर प्रदेशातील मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय करण्यात आले आहे. योगी सरकारच्या मंत्रिमंडळाने गेल्याच वर्षी मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय करण्याचा निर्णय घेतला होता. 4 जून त्याची अधिकृत अधिसुचना जारी करण्यात आली.
- दरम्यान, योगी सरकारच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून विरोध व्हाऊ लागल्याने काही काळ त्यांनी हा निर्णय लांबणीवर टाकला होता. काही लोकांनी मुगलसराय जंक्शनला देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नाव देण्याची मागणी केली होती.
- रा.स्व. संघाच्या विचारसरणीचे आणि भाजपाचे नेते असलेले दीनदयाल उपाध्याय आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री या दोघांचाही मुगलसराय शहराशी जवळचा संबंध आहे. मुगरसराय हे शास्त्रींचे जन्मस्थळ आहे. तर 1968 मध्ये दीनदयाल उपाध्याय यांचा मुगलसराय जंक्शन येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर बऱ्याच काळापासून भाजपा या रेल्वे स्टेशनला त्यांचे नाव देण्याची मागणी करीत होती.
Must Read (नक्की वाचा):
नील ध्वज मानक प्रकल्पात राज्यातील बंदरांचा समावेश :
- देशातील तेरा बंदरे नील ध्वज प्रमाणन मानकानुसार (ब्लू फ्लॅग स्टँडर्डस) नुसार विकसित केली जाणार असून त्यामुळे पर्यटकांना जास्त आनंददायी अनुभव घेता येणार आहे. या तेरा बंदरात महाराष्ट्रातील चिवला व भोगवे या दोन बंदरांचा समावेश करण्यात आला आहे.
- या शिवाय गोवा, पुडुचेरी,दमण व दीव, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार येथील प्रत्येकी एकेका बेटाचा ब्लू फ्लॅग बीच म्हणून विकास केला जाणार आहे. ओदिशातील कोणार्क किनाऱ्यावरील चंद्रभागा बंदराला 5 जूनला पर्यावरण दिनी गौरवण्यात येणार आहे. या बंदराने ब्लू फ्लॅग बीच निकष पूर्ण केले आहेत. ही सगळी बंदरे भारतातच नव्हे तर आशियातील पहिली असणार आहेत.
- सोसायटी फॉर इंटिग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेच्यावतीने भारतीय बंदरे विकसित केली जातात. या प्रकल्पाचे प्रमुख अरविंद नौटियाल यांनी सांगितले की, ही बंदरे पर्यटक स्नेही केली जाणार असून तेथे स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती यावर भर दिला जाणार आहे. तेथे कचरा व्यवस्थापन प्रणालीही बसवण्यात येणार आहे. या बंदरांना पर्यावरण व पर्यटन विषयक तेहतीस निकष पूर्ण करावे लागणार आहेत.
- ब्लू फ्लॅग बीच मानके 1985 मध्ये कोपनहेगनच्या फाऊंडेशन फॉर एनव्हरॉनमेंटल एज्युकेशन या संस्थेने त्यार केली आहेत. यात मत्स्य अधिवास सुरक्षित करतानाच प्रदूषणाला आळा घालणे, पर्यटक सुविधांना प्राधान्य देणे हे निकष महत्त्वाचे आहेत.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-5 चे यशस्वी प्रक्षेपण :
- ओदिशातील बालासोर येथून स्वदेशी क्षेपणास्त्र अग्नि 5 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. लांब पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावरून अणवस्त्रे वाहून नेता येऊ शकतात. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5 हजार किमी इतकी असून ते डॉ. अब्दुल कलाम बेटावरून लाँच करण्यात आले. हे आतापर्यंतचे सर्वाधिक आधुनिक क्षेपणास्त्र आहे.
- हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवरून मारा करू शकते. संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत असलेल्या कलाम बेटाच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या पॅड 4 वरून हे क्षेपणास्त्र लाँच करण्यात आले. अग्नि 5 ची ही सहावी चाचणी ठरली. चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राने अपेक्षित अंतर गाठले.
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या अग्नि 5 च्या तुलनेत सर्वाधिक आधुनिक आहे. हे नेव्हिगेशन आणि दिशा दर्शक, वॉरहेड आणि इंजिनसंबंधी नवीन तंत्रज्ञानांनी युक्त आहे. हायस्पीड कॉम्प्युटर आणि कोणतीही कमतरता सहन करण्याची क्षमता असलेले सॉफ्टवेअरबरोबर रोबस्टच्या साहाय्याने क्षेपणास्त्राचे यशस्वी लाँचिंग होण्यास मदत झाली.
उत्कृष्ठ जलसिंचनाबद्दल पांडुरंग शेलार यांचा गौरव :
- खडकवासला धरणातील उपलब्ध पाण्याचे शहरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून वर्षभरात ग्रामीण भागातील चार तालुक्यात नियोजन करून सहा आवर्तन दिले. तर त्यातील दोन आवर्तने ही उन्हाळ्यात दिली आहे. त्याबाबद्दल, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांचा जलसंपदा विभागामार्फत खात्याचे सचिव सी.ए.बिराजदार यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
- खडकवासला कालव्याच्या निर्मीतीनंतर प्रथमच 2017-18 या पावसाळी वर्षात पुणे शहराच्या 40 लाख लोकसंख्येला व्यवस्थित मुबलक पाणी पुरवठा दिला. त्याचबरोबर, ग्रामीण भागात शेतीसाठी व पिण्यासाठी हवेली, दौड, इंदापूर, बारामती या चार तालुक्यांमध्ये एकूण सहा सिंचन आवर्तने दिली.
- सिंचनाचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे या वर्षात कालव्यातून उन्हाळी दोन आवर्तने शेतक-यांसाठी दिली गेली. तसेच, उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन, व पाणीपट्टी वसूलीमध्ये सन 2017-18 मध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल शेलार यांचा सत्कार करण्यात आला आहे.
दिनविशेष :
- 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे.
- भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म 5 जून 1879 रोजी झाला.
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म 5 जून 1908 रोजी झाला.
- भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ 5 जून 1980 रोजी टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.