14 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
14 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 ऑक्टोबर 2021)
गतिशक्ती पायाभूत सुविधा योजनेसाठी 100 लाख कोटींची तरतूद :
- विविध वाहतूक मार्गानी काही ठिकाणे एकमेकांशी दळणवळणाने जोडण्याची गतिशक्ती योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यान्वित केली असून त्यासाठी 100 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
- तर मालवाहतूक खर्चात कपात, माल हाताळण्याची क्षमता वाढ, मालवाहतुकीस लागणाऱ्या वेळात कपात ही या योजनेची वैशिष्टय़े असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
- भारतात रसद पुरवठा व मालवाहतुकीसाठी एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 13 टक्के खर्च होतो. गतिशक्ती योजनेमुळे हा खर्च कमी होणार आहे. त्यातून भारतात गुंतवणुकीस चालना मिळेल.
Must Read (नक्की वाचा):
2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसवापराची तज्ज्ञ समितीची शिफारस :
- देशातील 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या वयोगटासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली आहे.
- भारत बायोटेकने 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या चाचण्या देशभरात घेण्यात आल्या होत्या.
- भारत बायोटेकने दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा तपशील केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेकडे सादर केला होता.
- यासंदर्भातील तज्ज्ञ समितीने सोमवारी चाचण्यांच्या निष्कर्षांची पडताळणी केली. त्यानंतर काही अटींच्या अधीन राहून 2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याचा निर्णय समितीने घेतला.
- तसेच आता त्यास अंतिम मंजुरी देण्याची शिफारस औषध महानियंत्रकांना करण्यात आली आहे.
- याआधी भारताच्या औषध महानियंत्रकांनी 12 ते 18 वर्षे वयोगटासाठी झायडस कॅडिलाच्या लशीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी दिली होती.
- तसेच 1 सप्टेंबरला हैदराबादच्या बायोलॉजिकल ई-लिमिटेड कंपनीला 5 ते 18 वयोगटातील मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लसचाचण्या करण्यास औषध महानियंत्रकांनी परवानी दिली होती.
विश्वचषकासाठी मुंबईचा शार्दूल भारतीय संघात :
- संयुक्त अरब अमिरातीमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
- ‘आयपीएल’मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या 29 वर्षीय शार्दूलने एकूण 18 बळी घेत लक्ष वेधले.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 15 सदस्यीय अंतिम संघांमध्ये बदलासाठी 15 ऑक्टोबपर्यंत मुदत दिली होती.
- तसेच आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे बुधवारी अनावरण करण्यात आले.
राज्यात राष्ट्रीय कृती योजना राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता :
- मादक पदार्थांचे सेवन व गैरवर्तन करणे ही समस्या दररोज वाढत जात आहे. या समस्येच्या मुख्य कारणांमध्ये मुख्यतः मानसिक तणाव, जीवनशैलीतील बदल, सामाजिक व आर्थिक कारणे इत्यादी महत्वाचे आहेत.
- तर त्यासाठी योजना तयार करुन त्यास प्रतिबंध घालणे ही काळाची गरज आहे.
- तसेच यासंबंधीच्या संवैधानिक तरतूदी लक्षात घेवून, नागरिकांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मद्यपान, दारू आणि अंमली पदार्थांचे सेवन टाळण्यासाठीच्या मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजनेच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली,
- मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजनेच्या प्रस्तावासह ही योजना राबविण्यासाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता येणाऱ्या एकूण रु. 2 कोटी 74 लाख व पुढील पाच वर्षासाठीचा एकूण 13 कोटी 70 लाख रुपये रकमेचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्तावित करण्यात येत आहे.
- तर यासाठी येणाऱ्या 13 कोटी 70 लाख रुपये वार्षिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
दिनविशेष :
- 14 ऑक्टोबर – जागतिक मानक दिन
- भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ 14 ऑक्टोबर 1882 मध्ये सुरु झाले.
- ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास 14 ऑक्टोबर 1920 मध्ये स्त्रियांना प्रवेश दिला.
- 14 ऑक्टोबर 1924 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म.