2 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
2 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2018)
रिझर्व्ह बँकेची व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ:
- रिझर्व्ह बँकेने 1 ऑगस्ट रोजी पतधोरण जाहीर केले असून वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.
- रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. रेपोरेटमध्ये वाढ झाल्याने कर्जदारांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गृह, वाहन तसेच वैयक्तिक कर्ज महागण्याची शक्यता आहे.
- रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक 30 जुलैपासून सुरू झाली. समितीचा व्याजदर बदलाबाबतचा निर्णय 1 ऑगस्ट रोजी जाहीर केला. 2018-19 मधील हे तिसरे व्दिमासिक पतधोरण आहे. यापूर्वीच्या पतधोरणात जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने पाव टक्का रेपो दर वाढवित 6.25 टक्के
- केला होता. मात्र, यंदा वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. अपेक्षेनुसार रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली. या वाढीनंतर रेपो दर 6.50 टक्के इतका झाला आहे.
राज्यातील ‘मिनी आयटीआय’ बंद होणार:
- ग्रामीण भागातील दारिद्रय़रेषेखालील युवकांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरू केलेली 27 ट्रायसेम प्रशिक्षण केंद्रे व 30 लघु औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मिनी आयटीआय) सध्या सुरू असलेले प्रशिक्षण संपल्यावर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्रात व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या कंत्राटी प्रशिक्षकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
- पारंपरिक शेतीवर अवलंबून असणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांच्या हाताला काम मिळावे व त्याने नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार करावा म्हणून 1990 मध्ये केंद्र शासनाने स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यात 29 जिल्ह्य़ात ट्रायसेम प्रशिक्षण केंद्र व 27 जिल्ह्य़ात 30 लघु औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मिनी आयटीआय) सुरू केल्या होत्या. त्यात दारिद्रय़रेषेखालील 18 ते 35 वयोगटातील युवकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येत होते.
- यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी 50 टक्के वाटा केंद्र सरकार उचलत होते, तर 50 टक्के रक्कम राज्य सरकार खर्च करीत होते. 9 वर्षे या योजनेतून बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर 1 एप्रिल 1999 पासून केंद्र शासनाने स्वर्ण जयंती ग्राम स्वराज्य योजना सुरू केली. त्यामुळे ट्रायसेम प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दिला जाणारा निधी त्यांनी बंद केला. त्यामुळे या केंद्रावरील खर्चाचा सर्व भार राज्य सरकारवर आला, पण राज्य सरकारने हे केंद्र बंद न करता फेब्रुवारी 2000 मध्ये जिल्हा परिरषदेच्या सहभागातून पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात या केंद्राला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, पण कालांतराने लालफितीचा फटका या केंद्राना बसू लागल्याने युवकांनी केंद्राकडे पाठ फिरवणे सुरू केले.
Must Read (नक्की वाचा):
कुणीही आधार क्रमांक शेअर करु नका:
- आधार क्रमांक सार्वजनिक करुन सोशल मीडियावर हॅकर्सना आव्हान देणे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय(Trai) चे चेअरमन आर.एस. शर्मा यांच्या अंगलट आल्यानंतर UIDAI सतर्क झाली आहे. कारण, कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर सार्वजनिक करु नका, असे आवाहन UIDAI कडून करण्यात आले आहे.
- UIDAI कडून नागरिकांनी आपला 12 अंकी आधार क्रमांक इंटरनेट किंवा सोशल मीडियावर शेअर करू नका असा सल्ला देण्यात आला आहे.
- तसेच आधारक्रमांक शेअर करणे चुकीचे आहे, असे करणे कायदेशीरही नाहीये. नागरिकांनी स्वतःही आधार क्रमांक शेअर करु नका आणि इतरांनाही करु देऊ नका. याशिवाय आधार क्रमांकाबाबत कुणाला चॅलेंजही करु नका असे UIDAI ने म्हटले आहे.
देशात 277 अभियांत्रिकी महाविद्यालये बोगस:
- देशात एकूण 277 बनावट व बोगस अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यांतील 66 दिल्लीत आहेत, अशी माहिती मनुष्यबळ विकासमंत्री सत्यपाल सिंह यांनी लोकसभेत दिली. त्यांनी सांगितले की, तेलंगण, पश्चिम बंगाल या राज्यांत अनुक्रमे 35 व 27 बनावट अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.
- कर्नाटक 23, उत्तर प्रदेश 22, हरयाणा 18, महाराष्ट्र 16 व तमिळनाडू 11, दिल्ली 66, हिमाचल प्रदेश 18, बिहार 17, गुजरात 8, आंध्र 7, चंडीगड 7, पंजाब 5, राजस्थान 3, उत्तराखंड 3 याप्रमाणे बनावट अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या आहे. अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण मंडळ म्हणजे एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय या संस्था चालवल्या जात असून त्या बेकायदेशीर व बनावट आहेत.
- लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सिंह यांनी म्हटले आहे की, या संस्थांना एक तर एआयसीटीईची परवानगी घ्यावी किंवा महाविद्यालये बंद करावीत असे दोनच पर्याय देण्यात आले आहेत. बनावट शिक्षण संस्थांविरोधात कारवाई करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने याप्रकरणी दिले असून आयोगाच्या संकेतस्थळावर 24 बोगस विद्यापीठांची यादी आहे.
आता ‘आयडीबीआय’वर ‘एलआयसी’चा अधिकार:
- भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) आयडीबीआय बँकेमधील हिस्सेदारी 51 टक्क्यांवर नेण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे आयडीबीआय बँकेवर एलआयसीची मालकी प्रस्थापित होणार आहे. याशिवाय, तीन खतनिर्मिती प्रकल्पांना व्याजमुक्त कर्ज देणे, यात महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणीसह देशभरात 13 नवी केंद्रीय विद्यालये सुरू करणे या निर्णयांवरही मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.
- अर्थमंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना या निर्णयाची माहिती दिली. आयडीबीआयच्या बळकटीसाठी सरकार आपला हिस्सा कमी करण्यास तयार असल्याचे अर्थमंत्र्यांनी 2016 मध्ये स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर आयडीबीआय बॅंकेवर ताबा मिळविण्यासाठी एलआयसीचे भागभांडवल सहा टक्क्यांवरून 51 टक्क्यांपर्यंत वाढविण्याला सरकारने मंजुरी दिली आहे. यातून बँकेची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शिवाय एलआयसीच्या 11 लाख एजंटांना याचा फायदा मिळेल, तर बँकेचे दोन हजारांहून अधिक कर्मचारी एलआयसीच्या व्यवयायवृद्धीसाठी उपयोगाला येतील.
दिनविशेष:
- सन 1870 मध्ये जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवेची लंडन मध्ये सुरवात झाली.
- आध्यात्मिक गुरू ‘जे.पी. वासवानी’ यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 मध्ये झाला.
- 2 ऑगस्ट 1954 मध्ये दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
- सन 2001 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा