Current Affairs of 12 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (12 सप्टेंबर 2016)
‘तेलंगण वॉटर ग्रीड’ योजना :
- भीषण दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याच्या टंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता करण्यासाठी गावे व शहरांना बंद पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करणारी तेलंगणच्या धर्तीवर ‘मिशन भगीरथ’ ही वॉटर ग्रीड योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी तेलंगणा राज्याचा दौरा करून साधारण 42 हजार कोटी रुपयांच्या खर्चातून आकाराला येत असलेल्या मिशन भगीरथ या ‘तेलंगणा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाची पाहणी केली.
- तसेच या प्रकल्पांतर्गत येत असलेल्या काही धरणांना भेटी देऊन, बांधकाम सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांना भेटी देऊन त्यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली.
- बबनराव लोणीकर म्हणाले, की मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या कामाला मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली असून, सहा महिन्यांत डीपीआर तयार करून कामाला सुरवात केली जाणार आहे.
- चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.
- संपूर्ण पाण्याचे स्रोत आटले गेल्याने 4 हजारपेक्षा अधिक टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. लातूरला रेल्वेने पाणी पुरविले. या वर्षी पाणीपुरवठ्यासाठी 700 कोटींची तरतूद करावी लागली.
- तसेच त्यामुळे मराठवाड्याला टॅंकरवाड्यातून मुक्त करण्यासाठी शहरे व गावांच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व मंत्रिमंडळाने यास तत्त्वत: मान्यता दिल्याचे लोणीकर यांनी स्पष्ट केले.
- मिशन भगीरथ (तेलंगण वॉटर ग्रीड योजना) ही तेलंगणा राज्याची पाणीपुरवठा योजना आहे.
Must Read (नक्की वाचा):
स्पॅनिश टॅल्गोची तिसरी चाचणी यशस्वी :
- सध्याच्या वेगवान राजधानी एक्स्प्रेसपेक्षाही वेगाने धावणाऱ्या स्पॅनिश बनावटीच्या टॅल्गो रेल्वेगाडीची दिल्ली-मुंबई मार्गावरील तिसरी चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वेतर्फे (दि.11) सांगण्यात आले.
- नवी दिल्ली स्थानकावरून दुपारी पावणेतीनला सोडण्यात आलेली टॅल्गो मुंबईत मध्यरात्री दोन वाजून 33 मिनिटांनी म्हणजे 11 तास 48 मिनिटांनी पोचली.
- ‘राजधानी’ला सध्या हे अंतर कापण्यासाठी 16 तास लागतात. टॅल्गोमुळे तो वेळ 12 तासांवर येईल, असा रेल्वेचा दावा आहे.
- सध्याच्या लोहमार्गांवर व काही तांत्रिक सुधारणा करून ही नवी गाडी चालविली जाणार आहे.
- नऊ डब्ब्यांच्या टॅल्गो गाडीत एक्झिक्युटिव्ह वर्गाचे दोन डबे, चार चेअर कार, एक जनरेटर कार व एक कर्मचाऱ्यांसाठीचा डबा, असे वर्गीकरण राहणार आहे.
यूएस ओपन टेनिस स्पर्धेत एंजेलिक केर्बरला विजेतेपद :
- जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने 2016 मधील यशाची वाटचाल कायम राखताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आणि जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू ठरल्याचा मान ही प्राप्त केला.
- यंदा वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जेतेपद पटकाविणाऱ्या दुसऱ्या मानांकित कर्बरने अंतिम लढतीत 10वे मानांकनप्राप्त झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना पिलिस्कोव्हाची झुंज 6-3, 4-6, 6-4 ने मोडून काढली.
- जर्मनीच्या एंजेलिक केर्बरचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे.
- तसेच मागील स्पर्धेत एंजेलिक हिने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सेरेनाला हरवून विजेतेपद मिळविले होते.
रिलायन्स जिओला दूरसंचार मंत्र्यांकडून समर्थन :
- रिलायन्स जिओच्या जाहिरातींमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समावेशाचे समर्थन केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी केले.
- पंतप्रधानांचे ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी’चे स्वप्न कोणी पूर्ण करीत असेल तर त्यात काही गैर नाही, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले.
- मागील मंत्रिमंडळ विस्तारात रविशंकर प्रसाद यांच्या जागी सिन्हा यांची दूरसंचारमंत्री म्हणून निवड करण्यात आली.
- ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सिन्हा म्हणाले, ‘रिलायन्स जिओने मोफत कॉल आणि कमी दरात डेटा उपलब्ध करून दिला असून आहे.’ हे निकोप स्पर्धेसाठी आवश्यक असून, याचा फायदा शेवटी ग्राहकांनाच होणार आहे.
- पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया मोहिमेत डिजिटल दरी दूर करण्याचा प्रयत्न करून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढविण्याचा हेतू आहे.
- एखादी कंपनी मोठ्या प्रमाणात ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी’ देत असेल तर एकप्रकारे ती डिजिटल योजनाचे स्वप्न पूर्ण करीत आहे.
दिनविशेष :
- 1890 : सॅलिसबरी, र्होडेशिया शहराची स्थापना.
- 1952 : सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर पुण्यतिथी.
- 2002 : ‘मेटसॅट’ या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
- 2005 : डिझनीलँड हाँगकाँग येथे सुरू करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा