Current Affairs of 31 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 जानेवारी 2017)
विनोद राय बीसीसीआयचे नवे अध्यक्ष :
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी महालेखापाल (कॅग) विनोद राय यांची 30 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केली. अनुराग ठाकुर यांची हकालपट्टी केल्यापासून ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद रिक्त होते.
- सर्वोच्च न्यायालयाने विनोद राय यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली असून, इतिहासकार रामचंद्र गुहा व विक्रम लिमये यांची प्रशासकीय पॅनलवर नियुक्ती केली आहे.
- भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी यांनाही प्रशासकीय पॅनलमध्ये स्थान देण्यात आले आहे.
- ‘बीसीसीआय’मधील नियुक्त्या करताना क्रीडामंत्रालयाच्या सचिवांना प्रशासकीय पॅनलमध्ये स्थान देण्याची केंद्र सरकारने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीला ‘बीसीसीआय’कडून अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी व विक्रम लिमये उपस्थित राहणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
पहिली महिला मेजर सुदानमध्ये शांती सेनेत कार्यरत :
- कोकणातील पहिली मेजर बनण्याचा बहुमान मिळवणारी दापोलीतील मेदिनी चव्हाण ही वीरांगना विश्व शांतीचा झेंडा डौलाने फडकावत आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय शांती सैन्यामध्ये त्या सध्या सुदानमध्ये शांती दूताची भूमिका बजावत आहेत. हा बहुमान मिळवणारी ती कोकणातील पहिलीच महिला आहे.
- भारत हा युनोचा संस्थापक सभासद आहे. निरनिराळ्या प्रदेशात उद्भवणा-या तंट्याचे निराकरण करण्याच्या युनोच्या योजनेचा भारत खंदा समर्थक आहे.
- स्वातंत्र्यप्राप्तीनंतर युनोच्या शांततेच्या मोहिमेमध्ये आपले मोठे सैन्य पाठवणारे भारत जगातले दुस-या क्रमांकाचे राष्ट्र आहे.
- युनोच्या शांतता राखण्याच्या योजनेमध्ये सैनिकी अधिका-यांना फक्त बळाचा वापर करून शांतता राखावयाची नसते, तर आपली सम्यक वृत्ती, शिस्त, जबाबदारी, मानवी जीवनासाठी आदर आणि त्याचा मानसन्मान या गुणांचा वापर करावा लागतो.
‘तारिणी’ हे प्रशिक्षण जहाज विश्वसंचारासाठी सज्ज :
- भारतीय नौदलाचे 56 फुटी असलेले ‘आयएनएसव्ही तारिणी’ हे दुसरे प्रशिक्षण जहाज विश्वसंचारासाठी सज्ज झाले आहे.
- फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते संपूर्ण विश्वाला गवसणी घालण्याच्या मोहिमेवर निघणार आहे.
- उल्लेखनीय म्हणजे, या जहाजाची धुरा नौदलातील सहा महिलांकडे असेल. सर्व महिलांना कॅप्टन दिलीप दोंदे यांनी प्रशिक्षित केले असून भारतीय नौदलासाठी ही मोहीम प्रेरणादायी मानली जात आहे.
- तसेच कॅप्टन वर्तिका जोशी ह्या महिला टीमचे नेतृत्व करणार आहे. सध्या पणजी येथील कॅप्टन ऑफ पोटर्स येथे हे प्रशिक्षण जहाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
- ‘आयएनएसव्ही तारिणी’बाबत नौदलाचे निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे म्हणाले की, विश्वसंचारासाठी निघालेले हे दुसरे जहाज आहे. यापूर्वी आयएनएस म्हादईने अशी मोहीम पूर्ण केली होती. त्यातही महिलांची टीम होती. नौदलातील हे एक प्रतिष्ठेचे जहाज आहे.
फ्रेंच सौंदर्यवती ईरिस मित्तेनेर ठरली ‘मिस युनिव्हर्स’ :
- सौंदर्य आणि प्रतिभेच्या कसोटीवर निवडल्या जाणाऱ्या, संपूर्ण जगात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ किताबाची यावर्षीची मानकरी ठरलीय फ्रेंच सौंदर्यवती ईरिस मित्तेनेर.
- तसेच यापूर्वी ‘मिस फ्रान्स’ बनलेल्या 24 वर्षीय फ्रेंच मॉडेल ईरिस हिने इतर 85 स्पर्धक युवतींचा पराभव करीत हा किताब पटकावला.
- उपविजेतेपद 25 वर्षीय मिस हैती रॅक्वेल पेलिसिअरला मिळाले, तर 23 वर्षीय मिस कोलंबिया आंद्रिया तोवर ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
- फ्रान्सला तब्बल 44 वर्षांनी हा मान मिळाला आहे. मागील वर्षी पिया वुर्त्सबाख हिच्या रुपाने फिलिपिन्सला 40 वर्षांनी ‘मिस युनिव्हर्स’चा मान मिळाला होता.
- मिस युनिव्हर्स हा किताब 1952 मध्ये सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1953 मध्ये फ्रेंच सुंदरी ख्रिस्तियान मार्टेल हिने हा किताब पटकावला होता. मात्र, त्यानंतर फ्रेंच चाहत्यांना 44 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. ईरिसने यंदा हा मान मिळवला.
दिनविशेष :
- 31 जानेवारी 1896 हा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते सुप्रसिध्द कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे यांचा जन्मदिन आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात 31 जानेवारी 1920 रोजी केली.
- बडोदा व कोल्हापूर ही दोन्ही संस्थाने 31 जानेवारी 1949 रोजी मुंबई राज्यात विलीन झाली.
- 31 जानेवारी 1992 रोजी 65 वे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा