Current Affairs of 16 October 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2017)
सरकारव्दारे 20 विद्यापीठांसाठी 10 हजार कोटीचा निधी :
- जगातील टॉप 100 विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. म्हणून आम्ही पुढील पाच वर्षात देशातील 20 विद्यापीठांना 10 हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
- 20 पैकी 10 विद्यापीठ हे सरकारी तर 10 विद्यापीठ हे खासगी असतील, कामगिरीच्या आधारे विद्यापीठांना हा निधी दिला जाईल. पुढील पाच वर्षात या 20 विद्यापीठांना जागतिक दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
- पाटणा विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पाटण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एकाच मंचावर आले.
- तसेच नितीशकुमार यांनी पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणी केली. यावर मोदींनी नवी घोषणाच केली. ‘मी पाटणा विद्यापीठाला आणखी एक पाऊल पुढे नेऊ इच्छितो.’
Must Read (नक्की वाचा):
यकृत प्रत्यारोपणासाठी पाक महिलेला व्हिसा :
- यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याकरिता भारतात येण्यासाठी एका पाकिस्तानी महिलेला व्हिसा देण्यात येणार असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 15 ऑक्टोबर रोजी जाहीर केले.
- ‘फरझाना इजाज यांना यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याकरिता आम्ही व्हिसा देत आहोत,’ असे स्वराज यांनी ट्विटरवर लिहिले.
- आपल्या काकूला उपचारांसाठी भारताचा व्हिसा मिळावा, याकरिता स्वराज यांनी मदत करावी, असे आवाहन पाकिस्तानातील फैसलाबाद येथील एम. मोहसीन यांनी स्वराज यांना ट्विटरद्वारे केले होते.
- ‘सुषमा स्वराज मॅडम, माझ्या काकूची प्रकृती गंभीर आहे. तिला यकृत प्रत्यारोपणाची गरज असून, त्यासाठी कृपया मेडिकल व्हिसा द्यावा, ही विनंती,’ असे ट्विट मोहसीन यांनी केले होते.
- जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीमुळे भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी नागरिकांच्या मेडिकल व्हिसा अर्जांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला आहे.
- भारतात वैद्यकीय उपचार घेऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा दिला जाईल, असे स्वराज यांनी जाहीर केले होते.
विकासदर घटण्याचा जागतिक बँकेचा अंदाज :
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा आर्थिक विकासदर 2017 या वर्षांत 6.7 टक्के इतका घसरेल, असा अंदाज नोंदवल्याच्या दुसऱ्याच दिवशी, जागतिक बँकेनेही तसाच सूर लावत, विकासदर 7 टक्क्यांवर येईल, असे भाकित वर्तविले.
- नोटाबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम विकासदरावर होणार आहे.
- 2015 मध्ये हा दर 8.6 टक्के होता. तो आता आणखी कमी होईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. हा दर 2018 पर्यंत 7.3 टक्के होण्याचा अंदाज आहे.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.
- भारताच्या आर्थिक विकासदरात झालेली घसरण ही ओघानेच दक्षिण आशियाच्या विकासदरातील घसरण असल्याचेही जागतिक बँकेचे म्हणणे आहे.
- नोटाबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी यातून बाहेर पडण्याखेरीच दारिद्र्य निर्मूलन, रोजगारांची निर्मिती यासारखे अनेक आव्हाने भारतीय अर्थव्यवस्थेपुढे आहेत, असेही जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे.
कोल्हापुरी चप्पलचे लेदर पेटंट रजिस्टर :
- देशविदेशांत प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी चप्पलचा दर्जा टिकविण्यासाठी त्याचे पेटंट रजिस्टर केले आहे.
- चप्पलवर केल्या जाणाऱ्या रासायनिक कोटिंगमुळे ती पावसाळ्यासह सर्व ऋतूंत वापरता येईल. शिवाय विविध रंगांत उपलब्ध होणार आहे.
- ‘कोल्हापूर’ नावाने पेटंट मिळू शकत नाही; म्हणून ‘सुपरहाड्रोफोबिक लेदर फुटवेअर’ अशा नावाने कोल्हापुरी चप्पलचे पेटंट घेतले आहे,’ अशी माहिती संशोधक दिग्विजय राजेश पाटील यांनी दिली.
- शिवाजी विद्यापीठातील नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी विभागात दिग्विजय पाटील हा सध्या बी.एस्सी. 2 वर्गात शिकत आहे. गेली दोन वर्षे त्याने कोल्हापुरी चप्पलवर संशोधन केले आहे. त्यातून त्याने टिकाऊ आणि दर्जेदार कोल्हापुरी चप्पलसाठी कोटिंग तयार केले आहे. दिग्विजय म्हणाला, ‘लेदरमध्ये कोल्हापूर चप्पल जगप्रसिद्ध आहे. त्याला गालबोट लागू नये, कारण बनावट व खोट्या कोल्हापुरी चपलांची आज बाजारात विक्री होत आहे.
- चप्पल पावसाळ्यात घातली, तर तिला बुरशी चढते, ती मऊ पडते. नेमके यावरच लक्ष केंद्रित करू, दीड वर्ष अभ्यास केला. त्यानंतर संशोधन केले. त्यानंतर एक रसायन शोधले; ज्यामुळे कोल्हापुरी चप्पलला बुरशी पकडणार नाही. कोणत्याही रंगात ते तयार करता येईल. मूळ रंगालाही रासायनिक कोटिंग करून, आहे तोच रंग ठेवता येतो. भविष्यात इतर चप्पलप्रमाणेच कोल्हापुरी चप्पल मार्केटमध्ये बाराही महिने विक्रीस असेल, ती वापरता येईल. हे संशोधन कोल्हापुरी चप्पलचे आयुष्यमान वाढविणारे आहे.