Current Affairs of 3 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (3 नोव्हेंबर 2017)
राज्यातील जिल्ह्यांना प्रादेशिक विकास योजना मंजूर :
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 नोव्हेंबर रोजी आठ जिल्ह्यांच्या प्रादेशिक विकास योजनांचे आराखडे मंजूर करत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
- पुढील 40 वर्षांच्या सूत्रबद्ध व नियोजित विकासाच्या योजना राबविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाकांक्षी असल्याचे मानले जात आहे. कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, जालना, ठाणे, पालघर व रायगड या आठ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
- या जिल्ह्याच्या समग्र व सुनियोजित विकासाच्या दृष्टीने हा प्रादेशिक विकास योजनांना मिळालेली मान्यता महत्त्वपूर्ण आहे. या जिल्ह्यात उद्योग, दळणवळण, शैक्षणिक संकुले व इतर तत्सम पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.
- या प्रादेशिक विकास योजना आराखड्यानुसार या जिल्ह्यांची व्यावसायिक व औद्योगिक प्रगतीची दिशा स्पष्ट राहणार असून, प्रारूपानुसारच विकासाच्या योजनांना गती मिळणार आहे.
- तसेच याबाबत फडणवीस यांनी या शहरांना पहिल्यांदाच सूत्रबद्ध व नियोजित विकासाची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):
मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक करणे बंधनकारक :
- मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारकडून 6 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याबद्दल केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश द्यावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.
- सर्व मोबाईल वापरकर्त्यांनी ई-केवायसी पडताळणी अंतर्गत त्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करावा, असे केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. यासोबतच नवे बँक खाते उघडण्यासाठीही आधार कार्ड अनिवार्य असेल.
- मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड जोडण्याबद्दल केंद्र सरकारने 113 पानांचे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. वकील जोहेब हुसेन यांनी यावेळी सरकारची बाजू मांडली. ‘याच वर्षी 6 फेब्रुवारीला लोकनिती फाऊंडेशन प्रकरणाच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने सर्व मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक करण्यासाठी एका वर्षाची मुदत दिली होती,’ असा संदर्भ यावेळी सरकारकडून देण्यात आला.
मोहम्मद अली जीना यांच्या कन्या दिना वाडिया कालवश :
- कैद-ए-आझम आणि पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांच्या एकुलत्या एक कन्या दिना वाडिया यांचे 2 नोव्हेंबर रोजी न्युयॉर्क येथे निधन झाले, त्या 98 वर्षांच्या होत्या. ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने वाडिया यांच्या कुटुंबियांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
- दिना या 17व्या वर्षी पारशी व्यावसायिक नेविल वाडिया यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर दिना मुंबईत राहिल्या त्यांना दोन मुले झाली त्यानंतर ते वाडियांपासून विभक्त झाले.
- त्यानंतर त्या युकेमध्ये स्थायिक झाल्या. जीना यांच्या मृत्यूनंतर त्यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यानंतर पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांच्या कार्यकाळात 2004 मध्ये त्यांनी पाकिस्तानला शेवटची भेट दिली.
- दिना यांचा जन्म 14 आणि 15 ऑगस्ट 1919 रोजी मध्यरात्री झाला होता. त्यांच्या जन्माची कथाही खूप नाट्यमय आहे. त्यांचे आई-वडिल लंडन येथील एका थिएटरमध्ये सिनेमा पाहत असताना त्याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर, बरोबर 28 वर्षांनंतर त्याचदिवशी आणि त्याचवेळी जीना यांनी आणखी एकाला जन्म दिला होता. त्याचे नाव होते पाकिस्तान.
अतिविशाल ग्रहाच्या शोधामुळे उत्पत्ती सिध्दांताला आव्हान :
- ‘एनजीटीएस-1बी’ या ग्रहाने कोणताही महाकाय ग्रहाची निर्मिती लहान मातृताऱ्यांभोवती होऊ शकत नाही अशा खगोलशास्त्रज्ञांच्या निर्मिती सिद्धांताला आव्हान दिले आहे. हा अतिविशाल ग्रह आकाराने आपल्या सौरमालेतील गुरु ग्रहाएवढा मोठा असून तो एका लाल बाहय़ ताऱ्याभोवती फिरत असून हा तारा या ग्रहमालेतील सूर्याच्या निम्म्याच आकाराचा आहे.
- अशा प्रकारचा महाकाय ग्रह एवढय़ा लहान आकाराच्या मातृताऱ्याभोवती फिरू शकतो अशा प्रकारचे भाकीत कोणत्याही शास्त्रज्ञाने केले नव्हते. यामुळे ग्रहनिर्मितीच्या काही सिद्धांताचे ‘एनजीटीएस-1बी’ने खंडन केले आहे.
- नव्याने आढळलेली ही सूर्यमाला पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्षे लांब आहे. या ग्रहाचे आणि त्याच्या मातृताऱ्याचे गुणोत्तर आत्तापर्यंत शोध लावण्यात आलेल्या ग्रहांच्या तुलनेने सर्वात वेगळे आहे.
- एनजीटीएस-1बी ग्रहाचा शोध हा आमच्यासाठी एक आश्चर्याचा धक्काच होता. इतक्या मोठय़ा आकारमानाचा ग्रह इतक्या लहान ताऱ्याजवळ असू शकत नाही अशा प्रकारची आमची धारणा असल्याचे वॉरविक विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. डॅनिअल बेल्लिस यांनी सांगितले.
- तसेच ग्रहांची निर्मिती कशी होते याबाबतच्या माहितीला आपण आव्हान करीत असून आकाशगंगेत अशा प्रकारचे अजून किती ग्रह आहेत हे आता शोधावे लागणार आहे.
दिनविशेष :
- सन 1838 मध्ये 3 ऑक्टोबर रोजी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ ची ‘द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने स्थापना झाली.
- 3 नोव्हेंबर 1933 मध्ये अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचा जन्म झाला. हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी इ.स. 1998 वर्षीचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा