चालू घडामोडी (1 डिसेंबर 2016)
महात्मा गाधींचा चरखा ठरला जगात प्रभावशाली :
- महात्मा गांधी चरख्यावर सूतकताई करत असलेल्या 1946 मधील छायाचित्राचा समावेश कायम प्रभावशाली ठरणाऱ्या जगातील 100 छायाचित्रांत झाला आहे.
- ‘टाइम‘ मासिकाने ‘जगात बदल घडविणारी चित्रे’ या नावाखाली छायाचित्रांचा संग्रह केला आहे. त्यात गांधीजींच्या या छायाचित्राचा समावेश आहे.
- चष्मा घातलेले गांधीजी जमिनीवर एका सतरंजीवर बसून सूतकताई करत आहेत. त्याचबरोबर वाचनासाठी त्यांची मान खाली झुकल्याचे या कृष्णधवल छायाचित्रात दिसत आहे.
- भारतीय नेत्यांवरील एका लेखासाठी मार्गारेट बोर्क-व्हाईट यांनी हे छायाचित्र काढले होते; मात्र त्यानंतर दोन वर्षांच्या अवधीतच गांधीजींची हत्या झाली. त्या वेळी त्यांना श्रद्धांजलीपर लेखात या छायाचित्राचा वापर करण्यात आला होता.
- ‘शांतीदूत‘ म्हणून गांधीजींचे नाव जगात अजरामर करण्यात या छायाचित्राचा हातभार लागला व या चित्राची नोंदही कायमस्वरूपी कोरली गेली, असे टाइम्सने म्हटले आहे.
- तसेच टाइमच्या संग्रहात 1820 ते 2015 या कालावधीतील 100 ऐतिहासिक छायाचित्रे आहेत.
मध्य रेल्वे देणार ‘विशेष सेवा’ :
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून दादरमधील चैत्यभूमी येथे मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने राज्यातून मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या अनुयायांसाठी 11 विशेष ट्रेनची सोय केली आहे.
- तसेच या सर्व ट्रेन अनारक्षित असतील. त्याचप्रमाणे, मध्य रेल्वेवर बारा विशेष लोकल फेऱ्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मेन लाइन आणि हार्बरवरील लोकलचा समावेश आहे.
- मेन लाइनवरील लोकल दादर ते ठाणे, कल्याण, कुलादरम्यान धावतील, तर हार्बरवरील लोकल या वाशी, पनवेल, मानखुर्द ते कुर्लादरम्यान धावतील.
सर्व चित्रपटगृहांत राष्ट्रगीत लावणे बंधनकारक :
- देशभरातील चित्रपटगृहांनी चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावलेच पाहिजे आणि लोकांनीही आदर म्हणून उभे राहिलेच पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 30 नोव्हेंबर रोजी दिले.
- राष्ट्रगीत वाजवले जात असताना पडद्यावर राष्ट्रध्वज दाखविला पाहिजे, अशीही सूचना न्यायाधीश दीपक मिश्रा आणि अमित्वा रॉय यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
- तसेच या आदेशाची आठवडाभरात अंमलबजावणी करावी आणि याविषयी मुख्य सचिवांच्या मार्फत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती द्यावी, असे निर्देशही खंडपीठाने केंद्र सरकारला दिले.
- राष्ट्रगीतासाठी जे नियम आहेत, त्याच्या मुळात राष्ट्रीय ओळख, अखंडत्व आणि घटनात्मक राष्ट्रभक्ती आहे.
‘ओबीसीं’ आरक्षणमध्ये नव्या जातींचा समावेश :
- केंद्रीय ओबीसी यादीमध्ये महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील 15 नव्या जातींचा समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. त्याचबरोबर मुंबई वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली.
- तसेच याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमधील निर्वासितांसाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय झाले.
- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय ओबीसी यादीमध्ये समावेशांसाठी 2479 जातींबद्दलची अधिसूचना केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये केली होती. यामध्ये नामसाधर्म्य असलेल्या जाती, उपजातीदेखील आहेत.
- परंतु, यादरम्यान महाराष्ट्रासोबतच आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच उत्तराखंड या राज्यांकडून जवळपास 28 बदल करण्याची मागणी झाली. या यादीमध्ये 15 नव्या जाती, नऊ नामसाधर्म्य असलेल्या जाती, उपजाती आणि चार दुरुस्त्यांचा समावेश आहे.
- केंद्राच्या सुधारित अधिसूचनेनंतर या जातींना शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचे लाभ मिळतील.
दिनविशेष :
- 1 डिसेंबर हा भारतीय लोकशिक्षण दिन म्हणून साजरा करतात.
- 1 डिसेंबर हा एड्स प्रतिबंधक दिन आहे.
- 1 डिसेंबर 1963 मध्ये नागालँड हे भारताचे 16वे राज्य म्हणून घोषित करण्यात आले.
- भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा