चालू घडामोडी (1 जुलै 2017)
1 जुलै पासून ऐतिहासिक जीएसटी पर्व सुरू :
- देशभरात बहुप्रतीक्षित जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर अखेर लागू झाला आहे.
- 30 जून रोजी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली.
- जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.
- तसेच त्या बरोबरीने मध्यरात्रीच्या ठोक्याला संसदेच्या सेंट्रल हॉलमधील ऐतिहासिक सोहळ्याद्वारे जीएसटी अर्थात गुड्स अॅड सर्व्हिस टॅक्स ही नवी कररचना देशभरात लागू झाली.
राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल :
- राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपाचे नेते, माजी आमदार पाशा पटेल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केली.
- शेतमालाचा उत्पादन खर्च काढणे, त्या संदर्भात केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला शिफारशी करण्याचे काम राज्य आयोग करीत असतो.
- राज्य शेतमाल समिती आतापर्यंत राज्यात अस्तित्वात होती. आयोगाची स्थापना पहिल्यांदाच करण्यात आली आहे.
- शरद जोशी यांच्या नेतृत्वात अनेक वर्षे शेतकरी संघटनेचे बिनीचे शिलेदार राहिलेले पाशा पटेल हे शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने आग्रही राहिले आहेत.
- तसेच या मागणीसाठी 2011 मध्ये त्यांनी लातूर ते नागपूर अशी 24 दिवसांची पदयात्रा काढली होती. ते विधान परिषदेचे माजी सदस्य असून भाजपाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
भारतीय ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड :
- भारताचा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविड याने देशाला अधिक महत्त्व देताना भारताच्या ‘अ’ आणि अंडर-19 संघ प्रशिक्षकपदासाठी आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्स संघाच्या प्रशिक्षक पदावरुन राजीनामा दिला.
- पुढील दोन वर्षांपर्यंत द्रविड भारत ‘अ’ आणि 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कार्यरत राहिल.
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) द्रविडची भारत ‘अ’ व 19 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याची घोषणा केली. यानंतर द्रविडने भारतीय क्रिकेटला महत्त्व देताना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातून आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- तसेच याआधी 2015 मध्ये द्रविडला या दोन्ही संघांच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात आले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंनी मायदेशात व विदेशामध्ये चमकदार कामगिरी केली होती.
जागतिक स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची अभिमानास्पद कामगिरी :
- प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी उत्तुंग कामगिरी भारतीय विद्यार्थ्यांनी केली आहे.
- अमेरिकन अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी (AAS) आणि अमेरिकन इन्स्टिट्युट ऑफ एअरोनॉटिक्स अॅण्ड अॅस्ट्रोनॉटिक्स (AIAA)तर्फे घेण्यात आलेल्या CanSat 2017 या जागतिक स्पर्धेत उत्तराखंडमधील पेट्रोलियम आणि ऊर्जा अध्ययन विद्यापीठातील (UPES) विद्यार्थ्यांच्या चमूने अव्वल स्थान मिळवले आहे.
- अमेरिकेतील टेक्सासमध्ये ही जागतिक स्पर्धा आयोजित केली होती. त्यात जगभरातील विद्यार्थ्यांचे 39 चमू सहभागी झाले होते. त्यांना मागे टाकत भारतीय विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली आहे.
- अमेरिकन अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी (AAS) आणि अमेरिकन इन्स्टिट्युट ऑफ एअरोनॉटिक्स अॅण्ड अॅस्ट्रोनॉटिक्स (AIAA)तर्फे घेण्यात आलेल्या या जागतिक स्पर्धेत भाग घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना प्राध्यापक उगर गुवेन आणि जोजिमस लबाना यांनी मार्गदर्शन केले.
दिनविशेष :
- 1 जुलै हा महाराष्ट्र कृषी दिन म्हणून पाळला जातो.
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ‘वसंतराव नाईक’ यांचा जन्म 1 जुलै 1913 मध्ये झाला.
- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना 1 जुलै 1961 मध्ये झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा