चालू घडामोडी (1 मार्च 2017)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समितीतर्फे श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर :
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा यंदाचा श्रीगुरुजी पुरस्कार ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर व डॉ. एच.आर. नागेंद्र यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा 5 मार्चला सायंकाळी 5.30 वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार आहे.
- समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना जनकल्याण समितीतर्फे संघाचे द्वितीय सरसंघचालक स्व. माधव सदाशिव गोळवलकर तथा प.पू. श्री गुरुजी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
- पुरस्काराचे यंदाचे बाविसावे वर्ष आहे. 21 वर्षांत 60 व्यक्ती अथवा संस्थांना सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी समाजजीवनाची 10 क्षेत्रे निश्चित करण्यात आली असून त्यांची पाच गटांत विभागणी केली आहे.
- प्रतिवर्ष एकेका गटातील दोन क्षेत्रांसाठी पुरस्कार दिला जातो. वाङ्मय व सेवा गट, क्रीडा व कृषी, कला व समाजप्रबोधन, धर्म-संस्कृती व अनुसंधान, पर्यावरण व महिला सक्षमीकरण या पाच गटांतील दोन क्षेत्रे निवडली जातात.
- तसेच या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख रुपयांचा धनादेश, असे आहे.
एक जुलैपासून सर्व राज्यात लागू होणार GST :
- बर्याच दिवसांपासून रखडलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होण्याचा अडथळा आता दूर झाला आहे. येत्या एक जुलैपासून सर्व राज्यांमध्ये जीएसटी लागू केला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिली. नुकतीच जीएसटी कायद्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारची बैठक झाली. बैठकीनंतर दास बोलत होते.
- एक जुलैपासून हा कायदा लागू करण्यासाठी सर्व राज्यांनी तयारी दर्शवली असल्याचे दास यांनी सांगितले.
दीर्घकाळापासून जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत सर्व राज्यांचे एकमत होत नव्हते. त्यामुळे जीएसटी - कायदा पुढे ढकलला जाण्याची शक्यता होती. मात्र आता एक जुलैपासून हा कायदा लागू करण्यास सर्व राज्ये तयार झाली आहेत.
- जीएसटी कायद्याबाबतमहत्वाचे –
- कराचे दोन प्रकार. प्रत्यक्ष कर म्हणजे जो करदाता स्वतःच्या खिशातून भरतो. उदा. आयकर, मालमत्ता कर. आपल्या देशातील फक्त 2-3% इतकेच लोक प्रत्यक्ष कर भरतात.
- अप्रत्यक्ष कर हा करदाता दुसऱ्याकडून वसूल करून सरकारला भरतो. उदा. विक्रीकर, उत्पादन शुल्क. अर्थ व्यवस्थेतील प्रत्येकजण या ना त्या मार्गाने अप्रत्यक्ष कर भरत असतो.
- उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यात हा कर वसुलला जातो. जीएसटी कायदा हा संपूर्ण देशातील सर्व राज्यातील अप्रत्यक्ष कर वसूल करण्याची पद्धती पूर्णपणे बदलणार आहे.
- देशभर सर्व उत्पादक, विक्रेते आणि उपभोक्ता हे सर्वजण फक्त हा एकच कर वसूल करतील आणि भरतील. प्रस्तावित कायद्याच्या देश व्यापी स्वरूपामुळे त्याला इतके महत्व मिळालेले आहे.
दिल्लीत पहिल्या हेलिपोर्टचे उद्घाटन :
- नागरी उड्डयन मंत्री ए. गजपथी राजू यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी रोजी देशातील पहिल्या एकात्मिक हेलिपोर्टचे उद्घाटन झाले.
- दक्षिण अशियात अशा स्वप्नाची सेवा प्रथमच उपलब्ध झाली असल्याचे राजू यांनी यावेळी सांगितले.
- या हेलिपोर्टची निर्मिती सरकारी मालकीच्या पवन हंस लिमिटेडने केली आहे. हेलिपोर्टवर 150 प्रवासी क्षमतेची टर्मिनल इमारत, 16 हेलिकॉप्टर्सची पार्किंग करता येईल, असे चार हँगर्स आणि नऊ पार्किंग बेज आहेत. उत्तर दिल्लीतील रोहिणी भागात हे हेलिपोर्ट आहे.
- तसेच या हेलिपोर्टवर पवनहंसकडील तसेच इतरही हेलिकॉप्टर्सची देखभाल, दुरुस्ती आणि पूर्ण तपासणी करण्याची सोय आहे.
- देशात आजही हेलिकॉप्टर आणि जहाजातून माल वाहतूक अतिशय कमी प्रमाणात आहे.
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत ‘रेड अलर्ट’ लागू :
- मार्च ते मे या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये वाघांची शिकार होण्याची भीती केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून वनकर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाघांना धोका निर्माण झाल्याचे केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या आठवड्यात कळविले आहेत.
- तसेच त्यानुसार केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने देशातील सर्वच व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांना वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
- मेळघाटसह ताडोबा, पेंच, बोर, नवेगाव बांध व नागझिरा या सहा व्याघ्र प्रकल्पांत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आले आहेत. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मार्च ते मे या तीन महिन्यांत सतत गस्त, सीमेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिनविशेष :
- 1 मार्च हा जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो.
- 1 मार्च 1907 रोजी टाटा आर्यन अॅन्ड स्टील कंपनीची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा