चालू घडामोडी (1 नोव्हेंबर 2017)
देशातील आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक :
- देशातील आठ राज्यांमध्ये हिंदू समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
- भाजप नेत्या अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेद्वारे ही मागणी केली. त्यांनी याचिकेत लक्षद्वीप, जम्मू-काश्मीर, मिझोरम, नागालँड, मेघालय, अरूणाचल प्रदेश, मणिपूर आणि पंजाब या राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा असे म्हटले आहे. या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे त्यांना अल्पसंख्याक समाजाला देण्यात येणारे अधिकार मिळायला पाहिजेत, असे अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे.
- तसेच 1993 साली केंद्र सरकारकडून यासंदर्भात जारी करण्यात आलेली अधिसूचना घटनाबाह्य घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली.
- 23 ऑक्टोबर 1993 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे देशातील मुस्लिम आणि अन्य समुदायाच्या लोकांना अल्पसंख्याक घोषित करण्यात आले होते. मात्र, 2011 च्या जनगणनेनुसार लक्षद्वीप, जम्मू-काश्मीर, मिझोरम, नागालँड, मेघालय, अरूणाचल प्रदेश, मणिपूर आणि पंजाब या राज्यांमध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे.
- मात्र, अजूनही त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा मिळालेला नाही, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. कोणत्याही समुदायाला अल्पसंख्यांकांचा दर्जा देताना तो त्याच्या लोकसंख्येच्या आधारेच दिला पाहिजे, असा युक्तिवादही उपाध्याय यांनी केला आहे.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत ओबीसींना आरक्षण :
- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा 31 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटद्वारे केली.
- या योजनेचे महत्वाचे मुद्दे जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहेत. या परीक्षेमध्ये एससी, एसटी आणि अपंग व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद आहे. यामध्ये आता ओबीसींचाही समावेश करण्यात येईल.
- 2018 च्या शैक्षणिक वर्षासाठी ओबीसींच्या जागांवर प्रवेश देणे सुरु झाले आहे. त्यानंतर 2019 साठी ओबीसींचा नवा कोटा लागू होणार आहे. त्याचबरोबर सरकारने एनटीएससी शिष्यवृत्तीतही दुप्पट वाढ करण्याचे ठरवले आहे. ही शिष्यवृत्तीची रक्कम 1000 रुपयांवरुन 2000 रुपये होणार आहे. त्याचबरोबर पीएचडीसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत युजीसीच्या नियमांप्रमाणे बदल होईल, असेही जावडेकर यांनी सांगितले आहे.
राष्ट्रगीताचे अवमान केल्यास चीनमध्ये तुरुंगवास :
- एकीकडे भारतामधील चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीतादरम्यान उभे राहण्याच्या वादामुळे या गीताची सक्ती करता येऊ शकत नाही, ही टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाला करावी लागत असतानाच भारताचा शेजारी असलेल्या चीनमध्ये मात्र राष्ट्रगीताचा अनादर किंवा ध्वज अपमान यांसाठी मोठय़ा तुरुंगवासाची शिक्षा देण्याचे घाटत आहे.
- राष्ट्रगीत तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांना सध्याच्या 15 दिवसांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेऐवजी आता तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा विचार चीनने सुरू केला आहे.
- मसुद्यानुसार, आता या प्रकरणामध्ये कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. राष्ट्रगीताचे विडंबन करणे, राष्ट्रगीताचा अनादर करणे, ते चुकीच्या पद्धतीने वाजवणे, त्यामध्ये जाणीवपूर्वक बदल करणे यासह ध्वज जाळणे, नुकसान पोहोचवणे आणि ध्वज तुडविल्यास ही शिक्षा होऊ शकते. यापूर्वी या प्रकरणांमध्ये 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा होती. ही दुरुस्ती येत्या आठवडय़ामध्ये होण्याची शक्यता आहे.
- 2015 साली फुटबॉल चाहत्यांनी चिनी राष्ट्रगीताचा अनादर केल्याप्रकरणी त्या प्रांतातील फुटबॉल संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये हाँगकाँगमध्ये मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रगीत अनादराच्या घटना घडल्या. त्यामुळे तेथे याबाबत कायदा करण्याची गरज निर्माण झाली होती.
नौदलासाठी हेलिकॉप्टरच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी :
- भारतीय नौदलाच्या सामर्थ्यामध्ये भर पडणार असून संरक्षण मंत्रालयाने 111 हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
- 21 हजार 738 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असून यातील 95 हेलिकॉप्टर्सची निर्मिती भारतात होणार आहे. त्यामुळे मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ मोहीमेलाही चालना मिळाली आहे.
- चेतक हेलिकॉप्टर 1960 च्या दशकात नौदलात रुजू झाले होते. यानंतर 1970 च्या सुमारास नौदलाच्या अनेक युद्धनौकांवर चेतक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. मात्र आता चेतक हेलिकॉप्टरची संख्या झपाट्याने कमी झाली असून सिंगल इंजिन असलेल्या या हेलिकॉप्टरऐवजी नौदलाला डबल इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरची आवश्यकता होती. गेल्या अनेक वर्षांमध्ये नौदलाच्या ताफ्यात नवीन हेलिकॉप्टर दाखल न झाल्याने जुन्या हेलिकॉप्टरवरच नौदल अवलंबून होते.
- 31 ऑक्टोबर रोजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली डिफेन्स अॅक्विझिशन काऊन्सिलच्या बैठकीत नवीन हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली.
- परदेशी कंपन्या आणि भारतातील कंपन्या यांच्या संयुक्त प्रकल्पातून या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जाईल. 95 हेलिकॉप्टर्सची निर्मिती भारतात होईल, तर उर्वरित हेलिकॉप्टर खरेदी केले जातील.
लष्कर एल्फिन्स्टनचा नवा पूल बांधणार :
- चेंगराचेंगरीची दुर्घटना झालेल्या एल्फिन्स्टन रोड तसेच करी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील नवे पादचारी पूल लष्कर बांधणार आहे.
- रेल्वेमंत्री पीयूष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर रोजी एल्फिन्स्टन पुलाची पाहणी केली. त्यानंतर ही त्यांनी घोषणा केली.
- 31 जानेवारीपूर्वी हे तीनही पूल उभारण्याचे काम लष्कराचा अभियांत्रिकी विभाग करेल. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीला रविवारी एक महिना पूर्ण झाला. या दुर्घटनेत 23 प्रवाशांचा बळी गेला.
- करी रोड, आंबिवलीतील वाढत्या गर्दीमुळे तेथेही नवा पूल बांधण्यात येणार आहे. निविदा मागविण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. लष्कराची यंत्रणा वेळेत काम करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- जलद काम होण्यासाठी रेल्वे आणि लष्कराच्या अभियंत्यांनी संयुक्त जबाबदारी घेण्याची मागणी मुंबईचे भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी केली होती. विरोधी पक्षांनी मात्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली असून, यातून सरकारचे अपयश दिसून येत आहे.
- तसेच एल्फिन्स्टन पूल बांधण्याचे काम 5 नोव्हेंबरपासून सुरू होईल. 31 डिसेंबरला पायाभरणी होईल. 31 जानेवारीपर्यंत सर्व कामे संपवून पूल प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा