चालू घडामोडी (1 सप्टेंबर 2016)
नाशिक जिल्हा सरकारी वकीलपदी अजय मिसर :
- दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांची राज्य शासनाने दोन वर्षांसाठी जिल्हा सरकारी वकीलपदी तर अॅड. विनयराज तळेकर यांची अतिरिक्त सरकारी अभियोक्तापदी नियुक्ती केली आहे.
- राज्य शासनाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश (दि़.31 ऑगस्ट) काढले असून जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती झालेले अॅड. मिसर हे दहावे जिल्हा सरकारी वकील आहेत.
- निफाड तालुक्यातील पिंपळगाव (बसवंत) येथील मूळ रहिवासी असलेले अॅड. अजय मिसर हे 1994 पासून जिल्हा न्यायालयात वकिली करतात़.
- अॅड़ मिसर यांनी दाऊद इब्राहिम, अबु जुंदाल, छोटा राजन, मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट गोळीबार, इगतपुरी रेशन धान्य घोटाळा याबरोबरच दहशतवादविरोधी खटले चालविले आहेत.
- राज्य शासनाने यावर्षी प्रथमच जिल्हा सरकारी वकिलांच्या साहाय्यासाठी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता हे नवीन पद निर्माण केले असून त्यावर अॅड. विनयराज तळेकर यांची नियुक्ती केली आहे.
- दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा सरकारी वकील अॅड़ राजेंद्र घुमरे यांच्याकडून अॅड. मिसर हे सूत्रे स्वीकारतील.
पनवेल नगरपालिकेचा महापालिकेत समावेश :
- पनवेल नगरपालिकेचा महापालिकेत समावेश करण्यात आल्याने राज्यातील महापालिकांची संख्या आता 27 झाली आहे.
- पनवेल महापालिकेची अधिसूचना काही दिवसांतच निघणार आहे.
- प्रस्तावित विमानतळ म्हणजेच ‘नैना’ क्षेत्रातील जवळपास 36 गावे महापालिकेतून वगळण्यात आली आहेत.
- नवीन महापालिकेच्या हद्दीत सिडकोच्या जमिनी असलेल्या ठिकाणी किंवा विकास प्रकल्प सुरू असलेल्या जागी नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे जबाबदारी असेल.
- उर्वरित क्षेत्रात पनवेल महापालिका जबाबदारी पार पाडणार असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली.
- सध्याची पनवेल नगरपालिका आणि परिसरातील तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, बोनशेत, पळस्पे, नेवाळी आदी गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली पनवेल महापालिका स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतची अधिसूचना मेमध्ये प्रसिद्ध झाली होती.
- तसेच यासंदर्भातील कोकण विभागीय आयुक्तांचा अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे. विभागीय आयुक्तांनी सादर केलेला अहवाल नगरविकास विभागाने स्वीकारला आहे.
- तसेच पनवेल नगरपालिकेच्या हद्दीबाहेरच्या 68 गावांचा समावेश करून नवी महापालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही होणार आहे. यासाठी सिडकोने ‘दि न्यू मुंबई एअरपोर्ट इन्फ्लूएन्स नोटिफाईड एरिया’ (नैना) जाहीर केला असून त्यात काही गावांचा समावेश आहे.
‘नॅशनल हेरल्ड’ व ‘नवजीवन’ हे दैनिक लवकरच वाचकांच्या भेटीस :
- कॉंग्रेस पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे इंग्रजीतील ‘नॅशनल हेरल्ड’ आणि हिंदीतील ‘नवजीवन’ ही दैनिके पुन्हा एकदा वाचकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (एजेएल) च्या वतीने करण्यात आली.
- माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1937 मध्ये ‘एजेएल’ या कंपनीची स्थापना केली होती.
- तसेच या दोन्ही वर्तमानपत्रांच्या मुख्य संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार नीलभ मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे.
- मिश्रा यांच्याकडे वर्तमानपत्राच्या संपादकपदाबरोबरच डिजिटल माध्यमाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- मिश्रा यांनी यापूर्वी ‘आउटलूक’ या नियतकालिकाचे संपादकपद भूषविले असून ‘नॅशनल हेरल्ड’ आणि ‘नवजीवन’साठी संपादकीय टीम उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
- अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे खजिनदार मोतीलाल व्होरा हे ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’चे अध्यक्ष आहेत.
- त्याच बरोबर उर्दूमधून ‘कौमी आझाद’ हे वर्तमानपत्रदेखील सुरू होणार आहे.
इतिहास संशोधक डॉ. दळवी यांचे निधन :
- प्रख्यात इतिहास संशोधक तथा माजी प्राचार्य डॉ. दाऊद दळवी यांचे (दि.31 ऑगस्ट) रोजी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
- डॉ. दाऊद दळवी हे गेले काही दिवस किडणीच्या विकाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक जीवनातूनही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता.
- कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते सध्या काम करीत होते.
- कोईपची स्थापना करण्यापूर्वी ते ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते.
- 1998 साली ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी ठाणे जिह्यासह कोकणच्या इतिहास संशोधनावर लक्ष केंद्रीत केले होते.
- कोकणातील लेणींवर त्यांचा विशेष अभ्यास होता. इतिहासाच्या संशोधनावरील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
- तसेच ठाणे शहराचा इतिहास त्यांना मुखोद्गत होता.
ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांना पदावरून हटविले :
- ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ (68) यांना (दि. 31 ऑगस्ट) पदावरून हटविण्यात आले.
- राष्ट्रीय अर्थसंकल्पात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
- राष्ट्रपतींना हटविण्यासाठी दोनतृतीयांश मतांची गरज असते. झालेल्या महाभियोगात 81 पैकी 61 सिनेटर्सनी त्यांना दोषी ठरविले.
- त्यानंतर त्यांना तात्काळ पदावरून हटविण्यात आले. यामुळे डाव्या विचारांच्या 13 वर्षांच्या शासनाचा अंत झाला आहे.
- तसेच मायकेल टेमर हे आता ब्राझीलचे नवे राष्ट्रपती असतील.
दिनविशेष :
- रशिया ज्ञान दिन.
- सिंगापुर शिक्षक दिन.
- इ.स.पूर्व 5509 : बायझेन्टाईन साम्राज्यातील समाजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
- 1947 : भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
- 1964 : इंडियन ऑइल रिफायनरीझ आणि इंडियन ऑइल कंपनी यांनी एकत्र येउन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली.
- 1991 : उझबेकिस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा