चालू घडामोडी (1 सप्टेंबर 2017)
सीबीआय युनिटचे नवे अधीक्षक विजयेंद्र बिद्री :
- चंबळच्या खोर्यात डाकूंची (दरोडेखोरांची) दाणादाण उडवून देणारे विजयेंद्र बिद्री यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) च्या नागपूर युनिटचे अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आहे.
- बिद्री हे तामिळनाडू कॅडरचे आयपीएस अधिकारी असून प्रतिनियुक्तीवर त्यांना नागपुरात नियुक्त करण्यात आले आहे.
- 2005 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले विजयेंद्र बिद्री यांची राजस्थान कॅडर साठी निवड झाली होती. मात्र, लग्नानंतर त्यांनी केलेल्या विनंतीला मंजुरी देत त्यांना तामिळनाडू कॅडरमध्ये स्थानांतरित करण्यात आले, हे विशेष!
- सर्वप्रथम त्यांना राजस्थानातील दऊसा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी राजस्थानमध्ये गुजर आंदोलनाने तीव्र रूप घेतले होते. बिद्री यांनी प्रसंगावधान राखत येथील परिस्थिती हाताळली. त्यानंतर स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी या पदावर असताना अमली पदार्थाचा देशातील सर्वात मोठा साठा जप्त करण्यात यश मिळवले.
- तसेच त्यांची कार्यशैली बघून त्यांना चंबळच्या खोर्यात नियुक्त करण्यात आले. त्यांनी अनेक कुख्यात डाकूंचे एन्काऊंटर करून चंबळमध्ये डाकूंची दाणादाण उडवून दिली होती.
राज्यातील महिला उद्योजकांना राष्ट्रीय पुरस्कार :
- संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार व नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या कमल कुंभार (उस्मानाबाद), हर्षिनी कन्हेकर (नागपूर) व संगीता कांबळे (सातारा) या तीन महिलांना ट्रान्सफॉर्मिंग वूमन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
- केंद्रीय वस्त्रोद्योग व माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत, विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी बाजवणार्या 12 महिलांना पदक व प्रमाणपत्रासह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- उस्मानाबाद जिल्ह्याच्या हिंगलजवाडी येथील ग्रामीण महिला उद्योजक कमल कुंभार यांनी स्वयम् शिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेमार्फत उद्योगविषयक प्रशिक्षण घेतल्यावर अवघ्या दोन हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून बांगड्यांचा व्यवसाय सुरू केला. आपल्या प्रशिक्षणाचा लाभ त्यांनी आसपासच्या 4 हजार ग्रामीण महिलांना दिला आणि त्यांनाही उद्योजक बनवले. ऊर्जा सखी म्हणूनही त्या कार्यरत आहेत. ग्रामीण भारतातील विशेष कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.
- नागपूरच्या हर्षिनी कन्हेकर या देशातील पहिल्या महिला फायर फायटर आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय फायर सर्व्हिस महाविद्यालयाच्या 46 वर्षांच्या इतिहासात त्या पहिल्या महिला विद्यार्थिनी आहेत. आयुष्यात करिअरसाठी वेगळे क्षेत्र निवडून अन्य महिलांसमोर त्यांनी आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे. श्रीमती कन्हेकर फायर फायटिंग क्षेत्रात अत्यंत उत्साहाने काम करीत असल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली.
- सातारा जिल्ह्यातील संगीता कांबळे या देशातल्या शेळ्यांच्या पहिल्या डॉक्टर आहेत. माणदेशी फाउंडेशनतर्फे प्रशिक्षण घेतल्यानंतर जिल्ह्यात त्यांनी शेळीसमूहाची सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणेमुळे आज शेळी डॉक्टर म्हणून अनेक महिला काम करीत आहेत. या वेगळ्या प्रयोगाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
एकनाथ खडसे यांना जामीन मंजूर :
- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जाफराबाद न्यायालयाने 31 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला.
- शेतकर्यांकडे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत; परंतु वीज बिल भरणा करण्यासाठी नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे शेतकर्यांचा अवमान झाला म्हणून त्यांच्या विरोधात जाफराबाद येथील काँग्रेस कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- जाफराबाद न्यायालयाने एक महिन्यापूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना न्यायालयात हजर राहण्याविषयी समन्स बाजवले होते. त्यानुसार एकनाथ खडसे हे जाफराबाद न्यायालयात हजर राहिले. अॅड. रामेश्वर अंभोरे यांच्यामार्फत जामीनअर्ज दाखल केला. पंधरा हजारांच्या जमानत रकमेवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
- जामीन मिळाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खडसे म्हणाले की, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. एक वेळ शेतकर्यांनी आपला मोबाईल रिचार्ज नाही केला तरी चालेल; परंतु त्यांनी वीज बिल पहिले भरावे. तेव्हाच आपण चांगले पीक घेऊन उत्पादन घेऊ शकू, असा माझा म्हणण्याचा उद्देश होता.
भारताच्या नियंत्रक महालेखापरीक्षकपदी राजीव महर्षी :
- केंद्र सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले असून माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक-महालेखापरीक्षकपदी (कॅग) नियुक्ती केली आहे. तर सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
- गृह सचिव पदाचा 31 ऑगस्ट रोजी राजीनामा देणारे राजीव महर्षी आता कॅगचे प्रमुख राहतील. ते शशिकांत शर्मा यांची जागा घेतील. ते 1978च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्याचबरोबर डेप्यूटी कॅगपदी रंजनकुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- तसेच आयएएस अधिकारी सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्तीपदी नेमण्यात आले आहे. तर अनिता करवाल यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- राजीवकुमार यांना अर्थ सेवा विभागाचे सचिव तर आशा राम सिहाग यांना अवजड उद्योग विभागाचे सचिव म्हणून नेमले आहे.
दिनविशेष :
- गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांनी पुणे येथे 1 सप्टेंबर 1911 मध्ये ‘भारत गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली.
- भारताची प्रमाणवेळ 1 सप्टेंबर 1947 रोजी निश्चित करण्यात आली.
- 1 सप्टेंबर 1964 मध्ये इंडियन ऑइल रिफायनरीझ आणि इंडियन ऑइल कंपनी यांनी एकत्र येउन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा