चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2017)
विश्व पोलीस फायर क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण :
- अमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. त्यात कोल्हापूरच्या जयश्री बोरगी, मुंबईची सोनिया मोकल यांनी अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर मुंबईच्याच रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटकाविले.
- लॉस एंजिल्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने 5 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठोपाठ सोनिया मोकल हिने 800 मीटर धावणे स्पर्धेत देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.
- तसेच 71 किलोगटात ग्रीको रोमन प्रकारात मुंबईच्या रवींद्र जगतापने रौप्यपदक मिळवून दिले.
- सन 2015 मध्ये अमेरिकेतील फेअर फॅक्स राज्यातील व्हर्जिनिया येथे झालेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्यासह तिने भारतीय पोलीस दलातील धावपटू रहमान याने नोंदविलेला 11.31.29 ही विक्रमी वेळही मोडत 11.03.21 अशी वेळ नोंदवत 5000 मीटर व 10000 मीटर धावण्यात सुवर्ण, तर 5000 मीटर चालण्यात रौप्यपदकाची कमाई केली होती.
- अशाप्रकारची कामगिरी करणारी ती पोलीस दलातील एकमेव महिला धावपटू ठरली आहे.
दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश होणार :
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. कायदा व न्याय मंत्रालयाने अधिकृतरित्या ही घोषणा केली. विद्यमान सरन्यायाधीश जे.एस. खेहर हे 27 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर दीपक मिश्रा हे त्यांची जागा घेतील.
- दीपक मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना याच वर्षी मे महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणानंतर ते प्रकाशझोतात आले होते.
- तसेच 63 वर्षीय दीपक मिश्रा यांची सर्वसामान्यांमध्ये ‘प्रो सिटीझन जज’ अशी ओळख आहे.
- निर्भया प्रकरणाबरोबरच जुलै 2013च्या मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ऐतिहासिक असा निकाल देत दहशतवादी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते.
- मेमनचा 1993 मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सहभाग होता. या स्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणात दीपक मिश्रा यांनी पहाटे 5 वाजता निकाल देत त्याच्या फाशीविरोधातील याचिका निकाली काढत पुढील दोन तासांत मेमनला फाशी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
नामविस्तारास सोलापूर विद्यापीठाचा विरोध :
- सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठास दिले होते.
- मात्र, विद्यापीठाने तसा प्रस्ताव पाठवला तर नाहीच; उलट, नामविस्तार केल्यास विद्यापीठाच्या विकासात अडथळा होईल. त्यामुळे विद्यापीठाचे सध्याचे नाव आहे तसेच ठेवावे, असे राज्य सरकारला कळवले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली.
- नाशिकचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयवंत जाधव यांनी या संदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मे 2017 मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यावर सोलापूर विद्यापीठाने कळवले की, विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत विविध संघटना व राजकीय पक्षांनी दिलेली निवेदने विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आली होती.
- तसेच जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सोलापूर विद्यापीठाचे नाव सोलापूर विद्यापीठ राहील, असा सर्वानुमते घेण्यात आलेला निर्णय कायम ठेवावा, असे विद्यापीठाने राज्य सरकारला कळवले आहे, अशी माहिती तावडे यांनी लेखी उत्तरात दिली.
गणेशोत्सवात डिजे वाजविण्यास बंदी :
- गणेशोत्सवा दरम्यान डिजेच्या दणदणाटाला आवर घालण्यासाठी रायगड पोलिसांनी पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे.
- गणेशोत्सव मंडळांना तसेच नागरिकांना गणपती मिरवणुकी दरम्यान डिजेचा वापर टाळण्याचे आवाहन केले जात आहे.
- अलिबाग पोलिसांनी नुकतेच याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. गणेशोत्सव मंडळांना तसेच नागिरकांना हे परिपत्रक वाटले जाणार आहे.
- गणपती मिरवणुका काढताना ध्वनी प्रदुषण होणार नाही. याची खबरदारी घेण्याचे, डिजेचा वापर टाळण्याचे, आणि पारंपिरक वाद्यांचा वापर करून मिरवणुका काढण्याचे आवाहन केले जाणार आहे.
- राज्यात ध्वनीप्रदुषण अधिनियम 2000 अस्तित्वात आला आहे. यानुसार ध्वनिप्रदुषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतुद करण्यात आली आहे.
- ध्वनीप्रदुषणाचे नियम मोडणाऱ्यांवर 1 लाख रुपये दंड आणि 5 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतुद आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा