चालू घडामोडी (10 मे 2018)
टॉप 10 शक्तीशाली व्यक्तींच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी :
- जगभरातील सर्वात शक्तीशाली अशा व्यक्तींची नावे असलेली यादी ‘फोर्ब्स’ने जारी केली आहे. या जारी केलेल्या नव्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील सर्वांत शक्तीशाली नेत्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
- ‘फोर्ब्स’च्या यादीत मोदींनी पहिल्या दहा नेत्यांच्या क्रमवारीत नववे स्थान प्राप्त केले आहे. तसेच या यादीमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्या क्रमांकावर आहेत.
- ‘फोर्ब्स’कडून अशा प्रकारची यादी जारी करण्यात येते. ज्या लोकांनी देशासह जगाला बदलण्याचा प्रयत्न केला आणि विशेष कामगिरी केली, अशा लोकांना या यादीत स्थान दिले जाते. या यादीमध्ये पंतप्रधान मोदींनाही स्थान देण्यात आले आहे.
- तसेच यातील विशेष बाब म्हणजे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग (13 वा क्रमांक), ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे (14 वा) आणि अॅपलचे सीइओ टीम कूक (24 वा क्रमांक) असून, त्यांच्यापेक्षाही पुढे पंतप्रधान मोदी आहेत.
महाराष्ट्रात एलईडी मासेमारीला बंदी :
- देशाच्या सागरी किनारपट्टी भागात केंद्राने प्रकाशझोतातील (एलइडी) मासेमारीस बंदी घातली आहे. आता या पाठोपाठ राज्यानेही राज्याच्या 12 सागरी मैल या राज्याच्या हद्दीत प्रकाशझोताचा वापर करून मासेमारीस तसेच बुलट्रॉलिंग व पेअर पद्धतीच्या मासेमारीस बंदी घातली आहे. ही माहिती सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांनी दिली.
- या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौका व त्यांना साहाय्य करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात येईल अशी अधिसूचना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने जारी केली आहे.
- राज्याने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 याच्या कलम 3 नुसार गठित करण्यात आलेल्या सल्लागार समित्यांशी विचार विनिमय करून राज्याच्या सागरी जलधि क्षेत्रात म्हणजेच 12 सागरी मैल क्षेत्रात ट्रॉलिंग किंवा पर्ससीन किंवा गिलनेट किंवा डोलनेट यांचा वापर करणाऱ्या यांत्रिक तसेच यंत्रचलित मासेमारी नौकांना जनरेटरवर अथवा जनरेटर शिवाय चालणारे बुडीत, पाण्याखाली अथवा
- पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते कृत्रिम एलईडी लाइट, दिवे, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतीही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी कृत्रिम उपकरणे यांचा वापर करणे किंवा ती बसविणे याला प्रतिबंध घातला आहे.
इराणबरोबर केलेला अणूकरार अमिरिकेने रद्द केला :
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 मे रोजी इराणबरोबर केलेला अणूकरार रद्द करत असल्याची घोषणा केली.
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात 2015 साली अमेरिकेने इराणबरोबर हा करार केला होता. या करारामुळे इराणवर असलेले आर्थिक निर्बंध संपुष्टात आले होते.
- तसेच अनेक देशांचा इराणबरोबर व्यापार करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भारतानेही तेहरानबरोबर व्यापारी संबंध विकसित करण्यावर भर दिला होता. पण आता अमेरिकेने करार मोडल्यामुळे पुन्हा निर्बंध लागू होणार असून भारतासमोरील अडचणी वाढू शकतात.
आता फ्लिपकार्टचा 77 टक्के हिस्सा वॉलमार्टचा :
- भारतातली ई-कॉमर्समधली सगळ्यात मोठी कंपनी फ्लिपकार्ट अमेरिकी जायंट कंपनी वॉलमार्ट हिला 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलर्सना (सुमारे एक लाख कोटी रुपये) विकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- भारतामध्ये असलेल्या संधीचा विचार करता ही बाजारपेठ जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. भारतातल्या ई-कॉमर्सच्या बाजारपेठेमध्ये आमूलाग्र परीवर्तन घडवणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये भागीदारी मिळण्याची संधी आमच्यासाठी महत्त्वाची आहे, अशी भावना वॉलमार्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी व्यक्त केली आहे.
- तसेच हे मेगाडील करण्यासाठी मॅकमिलन सध्या भारतात आले आहेत. फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांबरोबरच मॅकमिलन सरकारी अधिकाऱ्यांच्याही भेटीगाठी घेणार असून भारतामधल्या व्यवसायवृद्धीच्या संधींचा अंदाज घेणार आहेत.
- फ्लिपकार्टचे सहसंस्थापक व ग्रुप सीईओ बिन्नी बन्सल यांनी सांगितले की, ‘भारतामध्ये गुंतवणूक येणं प्रचंड महत्त्वाचं आहे. रिटेल क्षेत्रामधल्या पुढील काळात येऊ घातलेल्या लाटेमध्ये स्वार होण्यासाठी मोठ्या प्रमणावर येणाऱ्या गुंतवणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’
MPSC परीक्षेच्या नोंदणीसाठी आधार क्रमांक अनिवार्य :
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासनातील विविध पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी आधार क्रमांक नोंदवला नसेल तर अशा उमेदवारांची नोंदणी जूनपासून रद्द करण्यात येणार आहे. आतापर्यंत साधारण नऊ लाख उमेदवारांनी त्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी केली आहे.
- आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज भरताना आधी आयोगाच्या संकेतस्थळावर आधी नोंदणी (प्रोफाईल) करावी लागते. उमेदवारांनी दिलेली माहिती अद्ययावत करून आधार क्रमांक देण्याचे बंधन आयोगाने घातले होते. यापूर्वी सूचना देऊनही अद्याप अनेक उमेदवारांनी आधार क्रमांकाची नोंदणी केलेली नाही.
- तसेच आयोगाकडे जवळपास 18 लाख उमेदवारांची माहिती आहे. मात्र त्यातील साधारण 9 लाख उमेदवारांचीच आधार नोंदणी झाली आहे. ज्या उमेदवारांनी आधार क्रमांक नोंदवलेला नाही अशा उमेदवारांची नोंदणी 1 जून पासून रद्द करून त्यांची संकेतस्थळावरील खाती बंद करण्यात येणार आहेत. उमेदवार 31 मेपर्यंत माहिती अद्ययावत करू शकतील.
ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया कठीण होणार :
- ड्रायव्हिंग लायसन्स ही सध्या काळाची गरज झाली आहे. दुचाकी चालवणे आणि त्याचा परवाना असणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. मात्र आता हे काहीसे कठीण झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. कायम वाहन परवान्याची परीक्षा देणाऱ्यांपैकी 10 टक्के लोक या परीक्षेत नापास होतात.
- तसेच वाहन चालविण्याचे पुरेसे प्रशिक्षण नसल्याने आणि नियमांबाबतचे योग्य ते ज्ञान नसल्याने असे घडत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. तर 25 टक्के लोक हे शिकाऊ वाहन परवान्याच्या परीक्षेत नापास होतात. आम्ही कोणत्याही परीक्षार्थीला वाहन परवानाच्या बाबतीत सौम्यतेची वागणूक देत नसल्याचेही यामध्ये नोंदविण्यात आले आहे. जे योग्य पद्धतीने गाडी चालवतात त्यांनाच आम्ही वाहन परवाना देतो असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिनविशेष :
- लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी 10 मे 1824 मध्ये खुली करण्यात आली.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव 10 मे 1907 रोजी लंडनमधे साजरा केला.
- रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म 10 मे 1918 रोजी झाला होता.
- 10 मे 1993 रोजी संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा