चालू घडामोडी (11 जून 2018)
‘यूपीएससी’ न देताही होता येणार सरकारी अधिकारी :
- केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळते. मात्र, यापुढे वरिष्ठ अधिकारी बनण्यासाठी ‘यूपीएससी‘ची सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे नसल्याची अधिसूचना मोदी सरकारकडून जारी करण्यात आली. त्यामुळे आता यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण न होताही सरकारी अधिकारी बनता येणार आहे.
- यापूर्वी केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यासाठी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे होते. मात्र, आता ही परीक्षा उत्तीर्ण न होता वरिष्ठ पदाची नोकरी मिळणार आहे. याबाबत मार्गदर्शिकेसह अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारला आता सेवा नियमातही बदल करावा लागणार आहे.
- पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. जितेंद्रसिंह म्हणाले, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गुणवंत आणि कुशल उमेदवारांना योग्य संधी मिळणार असून, भारतीय नागरिकांना स्वतःची प्रतिभा आणि क्षमता दाखवता यावी, यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी आणि पाकीस्तानचे अध्यक्ष हुसेन यांची भेट :
- शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकीस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांची आनंदी वातावरणात भेट झाली. दोन्ही नेत्यांनी भेटल्यावर हस्तांदोलनही केले. 18 व्या शांघाय सहकार्य परिषदेच्या नंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते उपस्थित होते.
- 2016 मध्ये पाकीस्तानकडून भारतीय लष्कराच्या उरी येथील छावणीवर झालेल्या हल्ल्यामुळे आणि गेल्या वर्षीच्या कुलभुषण जाधव यांच्या प्रकरणाने भारत आणि पाकीस्तान यांच्यातील संबध आणखीनच ताणले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये झालेली ही भेट सकारत्मकता दर्शवत आहे.
- उरी हल्ल्याच्या वेळीही भारताने सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला होता. भारताने या परिषदेवर बहिष्कार टाकला म्हणून बांग्लादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनीही इस्लामाबाद येथे होणाऱया या परिषदेवर बहिष्कार टाकला होता.
रविवारची साप्ताहिक सुटीला 128 वर्षे पूर्ण :
- सत्यशोधक विचारांच्या मुशीतून घडलेले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हक्क आणि न्यायासाठी सातत्याने लढे उभारून त्यांना न्याय मिळवून दिला.
- रविवारची सुटी देण्यास त्यांनी ब्रिटिश सरकार आणि गिरणीमालकांना भाग पाडले. 10 जून 1890 पासून रविवारची साप्ताहिक सुटी सुरू झाली. त्याला 10 जून रोजी 128 वर्षे पूर्ण झाले आहेत.
- विशेष म्हणजे आजच्या लोकशाही पद्धतीचा मार्ग लोखंडेंनी त्या काळात अवलंबून कामगारांना न्याय मिळवून दिला होता.
- अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा केवळ धार्मिकच नव्हे सर्वच प्रकारच्या शोषणाला विरोध होता. त्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या अनिर्बंध शोषणाविरोधात आवाज उठवत त्यांचे हक्क, न्यायासाठी लढा उभारला.
- अनेक दाखले देत लोखंडेंनी रविवार हा दिवस साप्ताहिक सुटीसाठी कसा योग्य आहे, हे सरकारला पटवून दिले. लोखंडे यांच्या मागणीला कामगारांचा वाढता पाठिंबा पाहून अखेर 10 जून 1890 मध्ये गिरणीमालकांनी रविवारच्या साप्ताहिक सुटीचा ठराव पास केला आणि कामगारांना साप्ताहिक सुटी लागू झाली.
जेईई अॅडव्हान्स परीक्षेत प्रणव गोयल प्रथम :
- JEE Advanced Result 2018 देशभरात आयआयटी, एनआयटी आणि तत्सम संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई अॅडव्हान्स‘ परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर झाला आहे.
- तसेच या परीक्षेत हरियाणाच्या प्रणव गोयलने 360 पैकी 337 गुण मिळवत देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर महाराष्ट्रातून ऋषी अग्रवाल हा पहिला आला आहे. ऋषी अग्रवाल हा मुंबईच्या पेस इन्स्टिस्टूटचा विद्यार्थी आहे.
- आयआयटी कानपूरने हे निकाल घोषीत केले आहेत. 20 मे रोजी आयआयटी कानपूरच्या वतीने देशभरातील विविध केंद्रांवर हा परीक्षा घेण्यात आली होती.
- कोटा येथील साहिल जैन देशातून दुसरा आला असून दिल्लीच्या कलश शहाने तिसरा क्रमांक पटकावला. तर मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख पहिली आली, देशातून ती सहावी आली आहे. तिला 360 पैकी 318 गुण मिळाले आहेत.
- अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in यावर जाऊन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. देशभरातून यावर्षी जवळपास एक लाख 60 हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले होते.
- निकाल जाहीर झाल्यानंतर आता 15 जूनपासून जागा वाटपाचा प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या वर्षी आयआयटी मद्रासकडून देशभरातील विविध केंद्रांवर हा परीक्षा घेण्यात आली होती.
भारत-चीनदरम्यानचे व्दिपक्षीय संबंध बळकट होतील :
- शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय आणि जागतिक समस्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर द्विपक्षीय संबंधांना बळकटी येणार असल्याचे म्हटले आहे.
- दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये वुहान बैठकीनंतर सहा आठवडय़ांत दुसऱ्यांदा बैठक होत असून डोकलाम मुद्दय़ावर दोन्ही देशांतील संबंध तणावाचे बनले होते. मोदी यांचे दोन दिवसांच्या भेटीसाठी येथे आगमन झाले, दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले, त्याची छायाचित्रेही घेण्यात आली.
- भारत व चीन यांच्यातील मजबूत व स्थिर संबंध हे शांततामय व स्थिर जगासाठी महत्त्वाचे आहेत, असे मोदी यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांनी वुहान बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीवर भर देण्याचे ठरवले आहे. दरम्यान एससीओचे सरचिटणीस राशीद अलिमोव व उझ्बेकचे अध्यक्ष शौकत मिरीयायेव यांच्याशीही मोदी यांनी चर्चा केली.
- अनेक जागतिक प्रश्नांवर ते चर्चा करणार असून त्यात इराणचा अमेरिकेने रद्द केलेला अणुकरार, इंडो-पॅसिफिक भागातील परिस्थिती या मुद्दय़ांचा समावेश आहे. मोदी यांची ही पाच आठवडय़ांत चीनला दुसरी भेट आहे.
मानसिक आजारांना विमा संरक्षण नाही :
- मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या उपचारासाठी लागणारा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असतानाही गेल्या आठवडय़ात जारी करण्यात आलेल्या विधेयकातही विमा संरक्षणाबाबत संदिग्धता आहे.
- सहा महिन्यानंतर मानसिक आरोग्य विधेयक जारी करण्यात आले असून त्यात फक्त एका वाक्यात उल्लेख असून त्यामुळे विमा कंपन्या कितपत उत्सुकता दाखवतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये प्रामुख्याने नैराश्य, चिंता आदी विकार आढळत आहेत. स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी या विकारग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्महत्येचे विचार सतत घोळत असणाऱ्या रुग्णांवर इलेक्ट्रो कन्वल्सिव्ह थेरपी (ईसीटी) म्हणजेच शॉक ट्रीटमेंट प्रभावी असल्याचा मानसोपरतज्ज्ञांचा दावा आहे.
- तसेच याशिवाय रिपिटिटिव्ह ट्रान्सक्रॅनिअल मॅग्नेटिक (आरटीएमएस) तसेच थीटा बर्स्ट आदी उपचार उपलब्ध आहेत. मात्र हे उपचार महागडे असतानाही हा सर्व खर्च मानसिक आजारांसाठी असल्याचे कारण पुढे करून विमा कंपन्या दावा अमान्य करतात.
दिनविशेष :
- मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात सन 1665 मध्ये 11 जून रोजी पुरंदरचा तह झाला.
- 11 जून 1895 मध्ये पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
- एडविन आर्मस्ट्राँग यांनी 11 जून 1935 रोजी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा