चालू घडामोडी (11 मे 2018)
पदव्युत्तर ‘नीट’मध्ये भूषण श्रीखंडे राज्यात प्रथम :
- नागपूर शहरातील भूषण श्रीखंडेने पदव्युत्तर नीट परीक्षेत बाजी मारत राज्यातून पहिला येण्याचा मान पटकावला. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या पदव्युत्तर ‘नीट‘ परीक्षेत भूषणने 902 गुणांसह 99.99 टक्क्यांनी देशातूनही चौथा येण्याचा लौकिक मिळविला. पहिल्याच प्रयत्नात त्याने ही नेत्रदीपक कामगिरी केली.
- भूषण उत्तम तबलावादक असून, तबला विशारद आहे. अभ्यासातही त्याने म्युझिक थेरपीचा अवलंब करीत अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. त्यामुळेच हे यश मिळविता आल्याचे त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
- तसेच यापूर्वी रॉयल कॉलेज लंडन येथील एमआरसीओसी भाग-1 ही परीक्षा त्याने उत्तीर्ण केली. याशिवाय एमबीबीएसचे अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना विदर्भ व राज्यस्तरीय प्रश्नमंजूषेत विजय मिळविला. अभ्यासासोबत खेळामध्येही आवड असल्याचे यावेळी भूषणने सांगितले.
नृत्यसम्राज्ञी ‘मृणालिनी साराभाई’ यांचा जन्मदिन :
- आपल्या मुद्राभिनयासह पदलालित्याने जगाला मोहिनी घालणाऱ्या नृत्यांगणा मृणालिनी साराभाई यांना 11 मे रोजी गुगलने डूडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. गुगलने साराभाई यांच्या 100 व्या जयंती निमित्त खास डूडल साकारले आहे.
- ‘अम्मा‘या नावाने साराभाई या सुपरिचित होत्या. त्यांनी 18 हजारांहून आधिक शिष्यांना नृत्यकलेत पारंगत केले. या व्यासंगी कलायात्रीचा भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मान केला. कोलकात्याच्या रवींद्र भारती विद्यापीठाने डी.लिट. तर 1996 मध्ये मध्य प्रदेश सरकारने कालिदास सन्मान देऊन त्यांचा गौरव केला आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या एक हजार महिलांच्या यादीत मृणालिनी साराभाई यांचा समावेश आहे.
- साराभाई या टागोरांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमध्ये शिकल्या. त्यांनी भरतनाट्यम आणि कथकली नृत्यप्रकारांना जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. वयाच्या 12-13 व्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी बॅलेचेही धडे गिरवले.
15 मे पासून बांधकामाचे परवाने ऑनलाईन :
- नगरपालिका हद्दीत या पुढील काळात आता बांधकामाचे परवाने ऑनलाईन दिले जाणार आहेत. लोकांचे हेलपाटे कमी करुन मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा हा प्रयत्न असून 15 मे पासून ऑनलाईन बांधकाम परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- महावास्तू पोर्टलच्या माध्यमातून हे परवाने दिले जाणार आहेत. नवीन घर किंवा इमारत उभी करायची असेल तर सर्वच कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची आहेत. अनिवार्य कागदपत्रे अपलोड केल्यानंतर नगर अभियंता संबंधित ठिकाणी भेट देणार आहेत. त्यांच्या अहवालानंतर लगेचच परवाना दिला जाणार असून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देखील ऑनलाईनच मिळणार आहे.
- तसेच या पूर्वी परवान्यासाठी कागदी प्लॅन सादर करावे लागत होते, आता मात्र ऑनलाईन प्लॅन अपलोड करायचे असल्याने ते ऑटोकॅड मध्ये करुनच अपलोड करावे लागतील. ही नवीन यंत्रणा असल्याने यात काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास नगरपालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- परवाना मागणी साठी तसेच बांधकाम पूर्णत्वासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यात अनिवार्य असल्याने कागदपत्रांची तयारी करुनच नागरिकांना ऑनलाईन अर्जासाठी जावे लागणार आहे, यात नागरिक व नगरपालिका दोघांच्याही वेळ व श्रमाची बचत होणार आहे.
शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांचा देहत्याग :
- ऑस्ट्रेलियातील 104 वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी 10 मे रोजी स्वित्झर्लंडमध्ये देहत्याग केला. त्या रात्री गुडॉल यांनी अखेरचा श्वास घेतला. जगण्याला आता कंटाळलोय, असे सांगत गुडॉल हे इच्छामरणासाठी ऑस्ट्रेलियाहून स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. जगणे परिपूर्ण झाले, असे त्यांनी मृत्यूपूर्वी म्हटले होते.
- भारतात स्वेच्छामरणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावरुन अजूनही वाद सुरु असतानाच स्वित्झर्लंडमध्ये शास्त्रज्ञ डेव्हिड गु़डॉल यांनी स्वेच्छामरणाचा निर्णय जाहीर केला होता.
- तसेच स्वेच्छामरणासाठीच ते ऑस्ट्रेलियावरुन स्वित्झर्लंडमध्ये आले. स्वित्झर्लंडमध्ये 1940 पासून वैद्यकीय साह्याने इच्छा मरणाचा अधिकार आहे.
दिनविशेष :
- 11 मे 1857 रोजी 1857चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
- मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना 11 मे सन 1888 रोजी रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
- 11 मे 1949 रोजी सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा