चालू घडामोडी (11 ऑक्टोबर 2017)
ऑलिम्पियन वीरधवलने पटकाविले सुवर्णपदक :
- महाराष्ट्राचा स्टार जलतरणपटू वीरधवल खाडे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना 71व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 50 मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले. त्याचवेळी, महाराष्ट्राचा युवा नील रॉय याला 400 मी. वैयक्तिक मेडले प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
- भोपाळ येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 50 मीटर बटरफ्लाय गटाची शर्यत अत्यंत चुरशीची रंगली.
- आशियाई स्पर्धेतील कांस्य पदक विजेता असलेल्या वीरधवलने सुवर्ण मिळवले खरे, मात्र त्याला एस.पी. नायरकडून कडवी टक्कर मिळाली.
- वीरधवलने 0.13 सेकंदाच्या फरकाने सुवर्ण निश्चित करताना 24.78 सेकंदाची वेळ नोंदवली. नायरने 24.80 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य निश्चित केले.
- तसेच 400 मीटर वैयक्तिक मेडलेची शर्यत महाराष्ट्राचा युवा नील रॉयने गाजवली. भले त्याने रौप्य मिळवले, पण आपल्याहून सरस असलेल्या प्रतिस्पर्ध्यांना त्याने चकीत केले.
- तामिळनाडूच्या अनुभवी एमिल रॉबिन सिंग याने सुरुवातीपासून आघाडी घेत बाजी मारताना 4 मिनिट 33 सेकंद 96 अशी विजयी वेळ नोंदवली. नीलने 4:39:02 अशा वेळेसह रौप्य पदकावर नाव कोरले, तर भोपाळच्याच अद्वैत पागे याने 4:39:94 वेळेसह कांस्य पदक जिंकले.
अब्दुल टुंडाला सोनीपत बॉम्बस्फोटाप्रकरणी जन्मठेप :
- हरयाणातील सोनीपतमधील बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने टुंडाला दीड लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
- सोनीपतमध्ये 28 सप्टेंबर 1996 रोजी दोन बॉम्बस्फोट झाल्याने संपूर्ण देश हादरला होता. या स्फोटांमध्ये 12 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटामागे अब्दुल करीम टुंडाचा हात असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सोनीपतमधील न्यायालयाने टुंडाला दोषी ठरवले होते. न्यायालयाने टुंडाच्या शिक्षेवर निकाला दिला. टुंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
- टुंडा हा ‘लष्कर- ए- तोयबा’ या संघटनेचा दहशतवादी असून 1994 ते 1998 या कालावधीत दिल्लीसह भारतातील विविध शहरांमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये टुंडा सहभागी झाला होता.
- टुंडाचा एकूण 33 दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता. त्याच्याविरोधात दिल्लीत 22 तर पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात 11 खटले प्रलंबित आहेत.
- तसेच दिल्लीत 1997 साली झालेल्या दोन वेगवेगळ्या बाँबस्फोटांप्रकरणी अब्दुल करीम टुंडाला दोन वर्षांपूर्वी दोषमुक्त करण्यात आले होते.
राज्यातील 3 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान :
- सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, देशातल्या 11 विविध श्रेणीतील 22 जणांना वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यात सातारा जिल्ह्यातील मंगला बनसोडे, नागपूर जिल्ह्यातील डॉ. महादेवराव मेश्राम आणि कोल्हापूरच्या मनोरमा कुलकर्णींचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आहे.
- पुण्याच्या जुन्नर तालुक्यात लोकनाट्य व लावणीला समर्पित कुटुंबात जन्मलेल्या मंगला बनसोडे यांच्या कुटुंबाची पाचवी पिढी या क्षेत्रात आहे.
- श्रीमती बनसोडे लावणी व तमाशा या लोककला माध्यमातून सातव्या वर्षापासून लोकजागृती व सामाजिक संदेश पोहोचवण्याचे काम केले आहे.
- नागपूरच्या उमरेड तालुक्यातील डॉ. महादेवराव मेश्राम यांना आरोग्य सेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- श्रीमती मनोरमा कुलकर्णी सध्या 71 वर्षांच्या असून क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य व विशेष कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
नोव्हेंबरपासून खतांची ऑनलाइन विक्री सक्तीची :
- रासायनिक खतांची ऑनलाइन विक्री 1 जूनपासूनच करण्याचे ठरले असताना, जिल्हय़ात अद्यापही शंभर टक्के सुरू झालेली नाही. त्याची दखल घेत केंद्र शासनाचे अधिकारी दलबीरसिंह यांनी बैठक घेत येत्या 1 नोव्हेंबरपासून खतांची ऑनलाइन विक्री बंधनकारक केली आहे. त्यासाठी शेतकर्यांना आता आधार कार्ड आणि अंगठा द्यावाच लागणार आहे.
- खतांचा काळाबाजार करणे, टंचाईच्या काळात ठरावीक शेतकर्यांनाच पुरवठा होणे, या बाबीही आता पॉस मशीन थांबविणार आहे.
- खत खरेदीसाठी आलेल्या शेतकर्यांच्या आधार कार्डची ऑनलाइन पडताळणी होणार आहे, तसेच त्याच व्यक्तीने खत घेतल्याचा पुरावा म्हणून त्याचा अंगठाही घेतला जाणार आहे.
- खतांची विक्री ऑनलाइन करण्यासाठी जिल्हय़ातील कृषी केंद्रांमध्ये 431 पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशीन आवश्यक आहेत.
- तसेच केंद्र शासनाने संबंधित खत उत्पादक कंपन्यांना पॉस मशीन उपलब्ध करण्याचे आदेश दिले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा