चालू घडामोडी (12 डिसेंबर 2016)
विजय चौधरी तिसर्यांदा महाराष्ट्र केसरी विजेता :
- ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा प्रबळ दावेदार असलेल्या जळगावच्या विजय चौधरीने अनुभव आणि तांत्रिकदृष्ट्या सरस खेळाच्या जोरावर पुण्याचा प्रतिभावा युवा मल्ल अभिजित कटके याचे आव्हान परतवून लावत प्रतिष्ठेच्या गदेवर आपले नाव कोरले.
- डबल महाराष्ट्र केसरी विजयने सलग तिसऱ्यांदा कुस्ती क्षेत्रातील ही सर्वोच्च स्पर्धा जिंकण्याची किमया साधली.
- मुंबईच्या नरसिंग यादवनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसराच मल्ल ठरला.
- वारजे येथील दिवंगत आमदार रमेश वांजळे क्रीडानगरीत ही 60 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली.
- गादी विभागात अभिजित कटकेने लातूरच्या सागर बिराजदारवर मात करून अंतिम फेरी गाठली होती, तर माती विभागात विजय चौधरीने विलास डोईफोडेचे आव्हान परतवून लावत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली होती.
- प्रत्यक्षात एकतर्फी ठरलेल्या या लढतीत दोन्ही फेरींमध्ये प्रत्येकी 1 गुण कमवत विजयने 2-0 ने सहजपणे बाजी मारली.
- कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी मानाची चांदीची गदा विजयला देण्यात आली.
राज्य सरकारकडून महावितरणाची नवप्रकाश योजना :
- थकीत वीजबिलांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकबाकीतून मुक्त करण्यासाठी महावितरणने नवप्रकाश योजना सुरू केली आहे.
- तसेच या योजनेत कृषिपंपधारक व सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळता, उर्वरित सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांचा समावेश आहे.
- योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमध्ये पूर्णत: सूट देण्यात आली असून, ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. वीजजोडणीचा अर्जही ग्राहकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- नवप्रकाश योजनेचा कालावधी 6 महिन्यांचा असून योजनेच्या पहिल्या 3 महिन्यांत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम 100 टक्के माफ होणार आहे.
एक दिवासीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज :
- कर्णधार विराट कोहलीने या वर्षातील चौथे आणि कारकीर्दीतील पंधरावे शतक 10 डिसेंबर रोजी वानखेडेच्या मैदानावर झळकवले आणि त्याचवेळी भारताला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यात आघाडीही मिळवून दिली.
- तसेच या शतकासोबत कोहली या वर्षात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडच्याच जो रूट याला मागे टाकले आहे.
- कोहलीने एकूण 36 सामन्यांमध्ये 40 डावांत तब्बल 2,467 धावा या वर्षात केल्या आहेत. रूटने 40 सामन्यांतील 52 डावांत 2,399 धावा केल्या आहेत. कोहलीची धावांची सरासरी तब्बल 88.10 असून रूटची 49.97 आहे.
ईद-ए-मिलादनिमित्त ‘अमन दिन’ साजरा :
- इस्लामचे प्रेषित म्हणून हजरत मुहम्मद पैगंबर हे मानव जातीसाठी कृपावंत म्हणून ओळखले जातात.
- तसेच त्यांची जयंती (ईद-ए-मिलाद) 12 डिसेंबर रोजी सर्व ‘अमन दिन’ म्हणून साजरी केली जाणार आहे.
- ‘ईद-ए-मिलाद’ दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच पैगंबर यांच्या मदिना येथील ‘मस्जिद-ए-नबवी’च्या छायाचित्रांचे आकर्षक होर्डिंग उभारू न त्याभोवती विविध रोपट्यांच्या कुंड्यांनी सजावट करण्यात आली आहे.
गुजरातमध्ये होणार जगातील सर्वांत मोठे क्रिकेट मैदान :
- गुजरातमध्ये सरदार पटेल क्रिकेट स्टेडियममध्ये काही बदल करण्यात येणार असून या स्टेडिअमला जगातील सर्वांत मोठे क्रिकेटचे मैदान बनविण्यात येणार आहे.
- तसेच एक लाख दहा हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्थाही तयार करण्यात येत आहे, याबाबत गुजरात क्रिकेट असोसिएशन महामंडळाने माहिती दिली आहे.
- या भव्य-दिव्य मैदानाच्या उभारणीसाठी लार्सन ऍण्ड टर्बो (एल ऍण्ड टी) ही कंपनी पुढाकार घेणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जाणार आहे.
- सध्या या मैदानाची क्षमता 54 हजार प्रेक्षक बसतील एवढी आहे. मैदानाचा कायापालट करण्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा