चालू घडामोडी (12 डिसेंबर 2017)
रेल्वेकडून कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी नोकरीची योजना बंद :
- रेल्वेच्या वयस्क कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांच्या तरुण मुलांना नोकरी देण्याची 2004 पासून सुरू असलेली योजना रेल्वेने गेल्या महिन्यात बंद केली असून ही योजना घटनात्मकदृष्टय़ा योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- ‘द लिबरलाइज्ड अॅक्टिव्ह रिटायरमेंट स्किम फॉर गॅरंटीड एम्प्लॉयमेंट फॉर सेफ्टी स्टाफ’ (एलएआरएसजीईएसएस) असे या योजनेचे अधिकृत नाव असून ती तत्कालीन रेल्वेमंत्री नितिश कुमार यांच्या कार्यकाळात 2004 साली सुरू करण्यात आली होती. ठराविक प्रकारचे काम करण्यास आवश्यक असणारी शारीरिक क्षमता आणि लवचिकता वयस्क कर्मचाऱ्यांमध्ये नसते. त्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास त्यांच्या जागी त्यांच्या मुलांना नोकरी मिळत असे.
- मात्र या योजनेसंबंधी एका खटल्यात जुलै महिन्यात सुनावणी करताना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने ही योजना घटनेतील सर्वांना समान संधीच्या तत्त्वाविरोधात असल्याचे मत नोंदवले. या योजनेत कर्मचाऱ्यांच्या मुलांनाच नोकरी दिली जात असल्याने अन्य उमेदवारांवर अन्याय होतो आणि घटनेच्या 14 आणि 16 व्या कलमांचे उल्लंघन होते, असे न्यायालयाने म्हटले.
आयन ग्रिलॉटला ‘टाइम’ चा सन्मान :
- यंदाच्या वर्षी ह्य़ूस्टन येथे वर्णविद्वेषातून गोळीबारात श्रीनिवास कुचीभोटला या भारतीय तंत्रज्ञाचा गोळीबारात मृत्यू झाला. त्या वेळी हल्लेखोराच्या काही गोळ्या अंगावर झेलणारा अमेरिकी नागरिक आयन ग्रिलॉट याचा ‘टाइम’ नियतकालिकाने गौरव केला आहे. या घटनेत कुचीभोटला याचा सहकारी आलोक मदासानी हा जखमी होऊन वाचला होता.
- 2017 मध्ये आशेचा किरण ठरलेले नायक म्हणून ज्या पाच जणांची नावे टाइम नियतकालिकाने घेतली आहेत त्यात ग्रिलॉट याचे नाव आहे. नौदलाचा माजी अधिकारी असलेल्या अॅडम प्युरींटन याने फेब्रुवारीत कन्सासमधील ओलाठ येथे एका बारमध्ये कुचीभोटला व त्याच्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात गोळीबार सुरू असताना अमेरिकी नागरिक ग्रिलॉट हा मदतीसाठी धावून गेला व त्याने काही गोळ्या अंगावर झेलल्या, त्यात तो जखमी झाला होता.
- ‘टाइम’ नियतकालिकाने कन्सास येथील ग्रिलॉट याचा सन्मान करताना त्याला ‘खरा अमेरिकी नायक’ अशा शब्दात गौरवले असून भारतीय अमेरिकी समुदायाने त्याला कन्सास येथे त्याच्या मूळ गावी घर घेण्यासाठी 1 लाख डॉलर्सची मदत केली होती.
देवस्थान समितीच्या लोगोचे अनावरण :
- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे आयोजित लोगो (बोधचिन्ह) स्पर्धेत पाचगाव येथील गौरीश सोनारने 34.6 गुणांनी प्रथम तर अजित पाटील (येळवडे, ता. राधानगरी) यांनी 33 गुणांनी द्वितीय, श्रीमती रश्मी कोरे (रा. कोथरुड, पुणे) यांनी 31.7 गुणांनी तृतीय क्रमांक मिळविला.
- देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी तयार केलेला हा लोगो आहे. लोगोचे अनावरण आज देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य संगीता खाडे, शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते झाले.
- अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात कार्यक्रम झाला. श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी प्रमुख उपस्थित होते.
- प्रथम विजेत्या गौरीशला श्री अंबाबाईची मूर्ती, प्रमाणपत्र, 21 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ देऊन गौरविले. अन्य विजेत्यांना तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान केले.
- देवस्थान व्यवस्थापन समितीने कार्यालयाचा लोगो तयार करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. याकरिता कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यांतून 91 लोगो प्राप्त झाले.
10वी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा :
- सौरभ चौधरी आणि मनु भाकर यांनी जपान (वाको सिटी) येथे पार पडलेल्या 10व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई करत आगामी 2018 मध्ये होत असलेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी कोटाही मिळवला.
- विशेष म्हणजे स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारताने चार पदकांची कमाई करताना 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य अशी स्पर्धेत एकूण 21 पदकांची लयलूट केली.
- सौरभने अंतिम दिवशी पुरुषांच्या 10 मीटर पिस्तुल युवा स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदक जिंकले. तसेच मनुने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात रौप्यपदकावर नाव कोरले.
- तसेच अंतिम दिवसाच्या सुरुवातीलाच ज्युनिअर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात ज्युनिअर विश्व चॅम्पियन यशस्विनी सिंग देसवाल आणि महिमा अग्रवाल यांनी अंतिम फेरी गाठली.
काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी :
- 132 वर्षांची परंपरा असलेला देशातील सर्वात जूना पक्ष काँग्रेसला 11 डिसेंबर रोजी 47 वर्षीय राहुल गांधी यांच्या रूपाने नवे नेतृत्व मिळाले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राहुल यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत केली.
- राहुल यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवणारे 89 अर्ज आले होते. छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले असून अध्यक्षपदासाठी राहुल हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जात आहे, असे रामचंद्रन यांनी नमूद केले.
- विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 16 डिसेंबर रोजी सकाळी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर त्याचदिवशी सकाळी 11 वाजता सोनिया तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची अधिकृतपणे सूत्रे स्वीकारतील अशीही माहिती देण्यात आली.
दिनविशेष :
- सन 1755 मध्ये 12 डिसेंबर रोजी डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन.
- 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
- 12 डिसेंबर 1940 हा दिवस राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष ‘शरद पवार’ यांचा जन्मदिन आहे.
- प्रियांका चोप्रा यांना 12 डिसेंबर 2016 रोजी युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ
{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/Ljn8VX7xs9I?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}