Current Affairs of 12 June 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (12 जून 2018)
दहावी-बारावीची फेरपरीक्षा 17 जुलै पासून :
- दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने घेण्यात येणारी फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे.
- 17 जुलैपासून या फेरपरीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard. maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 14 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरता येतील.
- दहावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. बारावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होईल. बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान होईल. दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा 9 जुलै ते 16 जुलैदरम्यान होणार आहे.
- मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे छापील स्वरूपात उपलब्ध असलेले वेळापत्रकच अंतिम असेल.
- विद्यार्थ्यांनी या छापील वेळापत्रकानुसारच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. व्हॉट्सऍप आणि इतर संकेतस्थळांवर प्रसारित होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी केले आहे.
- तसेच या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 ते 23 जूनदरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येईल; तर विलंब शुल्कासह 24 ते 27 जूनदरम्यान अर्ज करता येईल.
Must Read (नक्की वाचा):
सुनील पोरवाल गृह विभागाचे अपर मुख्य सचिव :
- राज्य सरकारने 11 जून रोजी 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांची नेमणूक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. तर उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या बदली श्रीवास्तव यांच्या जागी करण्यात आली आहे.
- पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांची उद्योग विभागात, तर वित्त विभागाच्या (सुधारणा) अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांची शालेय शिक्षण खात्यात बदली झाली आहे.
- शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची सामान्य प्रशासन विभागात (राजशिष्टाचार) नेमणूक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष प्रकल्पासाठी म्हणून नेमणूक करण्यात आलेले प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांची बदली पर्यावरण विभागात झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांची बदली वंदना कृष्णा यांच्या जागी वित्त विभागात करण्यात आली आहे.
सुहासिनीदेवी घाटगे यांना कोरगावकर पुरस्कार जाहीर :
- कोल्हापूर येथील स्वयंसिध्दा संस्थेचा 26 वा वर्धापनदिन 15 जून रोजी विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यंदाचा (कै) स्मिता कोरगावकर पुरस्कार श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांना दिला जाणार आहे.
- कागल परिसरातील महिला सक्षमीकरण आणि दिव्यांगांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचा गौरव होणार आहे. दरम्यान, शाहू स्मारक भवनात दुपारी तीन वाजता पुरस्कार वितरण सोहळा होईल.
- डॉ. शोभना तावडे-मेहता आरोग्यम् धनसंपदा पुरस्कार डॉ. विनोद घोटगे यांना दिला जाणार आहे. डॉ. घोटगे यांनी आरोग्य सेवा बजावताना विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
- लेखक डॉ. सागर देशपांडे यांना मधुकर सरनाईक परिवर्तन दूत तर रजनी आणि अप्पासाहेब पाटील यांना (कै) माई तेंडूलकर यांच्या स्मरणार्थ मातृपितृ देवोभव पुरस्कार दिला जाईल. जन्मतःच अपंग असलेल्या मीनाक्षी पाटील यांचे हे आई-वडिल असून मीनाक्षी यांना पाटील दांपत्यांने पदवीधर बनवून स्वेटर उद्योगात उभे केले आहे.
- मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार महेश सुतार यांना दिला जाणार असून महेश कर्णबधीर, मतीमंद, गतीमंद मुलांना पंक्चर व सर्व्हिसिंगची कामे शिकवून स्वावलंबी बनवत आहेत.
जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला :
- एमबीए/एमएमएस, औषधनिर्माणशास्त्र आणि अभियांत्रिकी पदवीसह विविध व्यासायिक अभ्यासक्रमांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यात अडचणी येत असून राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
- अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस 7 जून पासून सुरुवात झाली. दरवर्षी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत देण्यात येत असे; मात्र यंदापासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
- तसेच ऑनलाईन अर्ज भरताना जाती संदर्भातील रकाना पूर्ण होत नाही. त्यामुळे अर्ज स्वीकारला जात नसल्याने हे प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली किम जोंग यांची भेट :
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 जून रोजी सकाळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली असून उत्तर कोरियाने अण्वस्त्र नष्ट करावी यासाठीची ही शिखर बैठक कोरियन युद्धाचा शेवट करणारी ठरणार आहे.
- हस्तांदोलन करत या नेत्यांनी बैठकीला सुरुवात केली. दक्षिण कोरियाचे अमेरिकेतील माजी राजदूत सुंग किम हे अमेरिकेच्या बाजूने चर्चेची सूत्रे सांभाळणार आहेत. तर उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चो सन हुई हे उत्तर कोरियाची सूत्रे सांभाळणार आहेत. सुरुवातीला ट्रम्प व किम हे आमनेसामने भेटतील व नंतर चर्चा पुढे जाईल.
- सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर सकाळी नऊ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहा वाजता) डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात शिखर परिषदेला सुरुवात झाली.
दिनविशेष :
- 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो.
- भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म इ.स. 499 मध्ये 12 जून रोजी झाला.
- गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
- 12 जून 1975 मध्ये अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना 6 वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा