चालू घडामोडी (12 मे 2018)
भारतीय लष्करांसाठी फोर्सच्या विशेष गाड्या :
- भारतीय लष्कराला अधिक बळकट करण्यासाठी नेहमीच विविध स्तरावर प्रयत्न सुरु असतात. त्यातच आणखी एक भर पडली असून त्यासाठी फोर्स मोटार्स कंपनीने पुढाकार घेतला आहे. गाड्यांच्या निर्मितीत नामवंत म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी आता लष्करासाठी विशेष गाड्या तयार केल्या आहेत.
- समाजातील विविध घटकांच्या गरजांनुसार गाडी तयार करण्याचे काम कंपनीकडून कायमच प्राधान्याने करण्यात येते. त्यानुसारच हे आणखी एक पुढचे आणि महत्त्वाचे पाऊल ठरेल असे म्हणता येईल. या गाड्या हलक्या वजनाच्या असून त्या लष्करामध्ये विशिष्ट कामांसाठी वापरण्यात येतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या गाड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
- लष्कराच्या कामाचा वेग आणि नेमकेपणा वाढावा यादृष्टीने या गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. लष्कराच्या गरजेप्रमाणे ही वाहने मजबूत असून कोणत्याही कठिण प्रसंगाला तोंड द्यायला सज्ज असतील.
- तसेच या गाड्यांची चाचणी अतिशय कठोर पद्धतीने करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. या गाडीच्या सातत्याने दोन वर्ष राजस्थानमध्ये 50 अंश सेल्सिअसमध्ये तसेच हिमालयासारख्या उणे 30 अंश सेल्सिअसमध्ये चाचण्या करण्यात आल्या. या गाड्यांची मोठी ऑर्डर कंपनीला लष्कराने दिली आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट म्हणजे गुन्हाच :
- सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करणे किंवा तशा पोस्ट लिहिणे हा गुन्हाच ठरणार आहे, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे. 20 एप्रिल रोजी भाजपा नेता एस.व्ही. शेखर यांनी महिला पत्रकारांबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक पेजवर लिहिली होती. या प्रकरणी एस.व्ही. शेखरना जामीन नाकारत मद्रास हायकोर्टाने फेसबुक असो किंवा इतर सोशल मीडिया त्यावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे किंवा फॉरवर्ड करणे गुन्हाच आहे असे म्हटले आहे.
- एकाही माणसाला महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य पोस्ट करण्याचा हक्क नाही. जर त्या माणासाने असे केले किंवा कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट केली तर तो गुन्हाच ठरणार आहे. असंसदीय शब्द वापरुन महिलांची बदनामी करणे हे जास्त खटकणारे आहे असेही कोर्टाने म्हटले आहे.
- एखाद्या कृतीपेक्षा शब्द जास्त परिणामकारक ठरतात. जेव्हा एखादी व्यक्ती राजकीय किंवा समाजातील महत्त्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती असते तेव्हा त्याने केलेल्या पोस्टवर लोक विश्वास ठेवू लागतात.
- काय म्हटले गेले आहे हे महत्त्वाचे आहे, मात्र त्याचसोबत ते कोणी म्हटले आहे ते पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असेही कोर्टाने म्हटले आहे. जर पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या सेलिब्रिटीने आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्या तर त्यातून समाजात चुकीचा संदेश जातो असेही कोर्टाने म्हटले आहे.
लसीकरण इबोलावर उपाय नाही :
- सामुदायिक लसीकरणाच्या मोहिमेतून इबोलाच्या संसर्गाला आळा घालण्यास मदत होऊ शकणार नसल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील केंट विद्यापीठातील संशोधकांनी इबोला विषाणूला आळा घालण्यासाठी लसीकरणाच्या संभावनांचे विश्लेषण केले. यातून येणाऱ्या काही काळापर्यंत इबोला विषाणूच्या उपद्रवाला आळा घालणे हे अशा प्रकरणांचे पर्यवेक्षण आणि त्यांना वेगळे करणे यावर अवलंबून असणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेने काँगोमध्ये नव्या इबोला विषाणूचा उद्रेक झाल्याची माहिती दिली आहे. सामुदायिक रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात इबोलाची लागण होण्याची संभावना असणाऱ्या लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार आहे.
- उद्रेकादरम्यान इबोला संसर्ग झालेल्या व्यक्तीमुळे सरासरी चार किंवा त्याहून अधिक लोकांना संसर्ग होतो यामुळे हा रोग वेगाने पसरतो. यामुळे रोगाची लागण होण्यास आळा घालण्यासाठी 80 टक्के लोकसंख्येला लसीकरणाची गरज आहे.
- एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लसीकरण करणे सद्य:स्थितीत अशक्य असून पश्चिम आफ्रिकेच्या इबोलाची साथ पसरली असताना इबोलाशी संपर्क आलेल्यांपैकी केवळ 49 टक्के लोकांचेच लसीकरण करण्यात आले होते. रोगाची लागण झाली असूनदेखील 34 टक्के लोकांनी लस घेण्यास नकार दिला.
- लसीकरणामुळे दीर्घकाळ इबोलापासून संरक्षण मिळते का नाही हे अदय़ाप अस्पष्ट आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणात लसीकरणाची मोहीम ही खर्चीक आणि अव्यवहार्य असल्याची नोंद या अभ्यासात करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौर्यावर :
- मागचे दहा दिवस कर्नाटकात जोरदार प्रचार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नेपाळमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी भारत-नेपाळ बस सेवेचे उद्धाटन केले.
- नेपाळमधले जनकपूर हे सीतेचे जन्मगाव ते उत्तर प्रदेशातील अयोध्या या मार्गावर बससेवेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या उपस्थितीत झाले.
- रामायण सर्किट या नावानं ओळखल्या जाणाऱ्या स्थळांना जोडणारी धार्मिक पर्यटन अशी ही कल्पना असून तिचं उद्घाटन मोदींनी केलं आहे. अयोध्या, नंदीग्राम, श्रींगवेरपूर आणि चित्रकूटसारख्या 15 ऐतिहासिक स्थळांचा समावेश या रामायण सर्किटमध्ये असेल अशी माहिती आहे.
- दोन दिवसीय दौऱ्यात मोदी तीन तीर्थस्थळांना भेटी देणार आहेत. मोदी त्यांच्या दौऱ्यात एका प्रकल्पाचे भूमिपूजनही करणार असून दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करारही होतील. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निमंत्रणावरुन मोदी नेपाळला गेले आहेत.
- भारतासाठी नेपाळ अत्यंत महत्वाचा देश आहे. चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नेपाळच्या दौऱ्यावर गेले आहेत त्यातून ही गोष्ट लक्षात येते. नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारताकडून प्रथमच हा उच्च स्तरीय दौरा होत आहे. मोदींच्या या दौऱ्यातून शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देण्याच्या धोरणाबद्दल असलेली कटिबद्धता दिसून येते.
महाथीर मोहम्मदची पुन्हा मलेशियाचे पंतप्रधानपदी निवड :
- क्वालालंपूर निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर जगातील सर्वात वयोवृद्ध नेते महाथीर मोहम्मद (92) यांनी 10 मे रोजी मलेशियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
- राजे सुलतान मोहम्मद पाचवे यांनी महाथीर मोहम्मद यांना पंतप्रधानपदाची अधिकृतपणे शपथ दिली. यापूर्वी महाथीर यांनी जवळपास 22 वर्षे मलेशियाचे पंतप्रधानपद भूषविले होते. महाथीर यांनी शपथ घेताच क्वालालंपूरमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दणाणून गेला होता.
दिनविशेष :
- पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात 12 मे सन 1364 रोजी झाली.
- तसेच अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात 12 मे 1551 मध्ये झाली.
- 12 मे 1952 रोजी प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
- एस.एच. कपाडीया यांनी 12 मे 2010 रोजी भारताचे 38वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा