चालू घडामोडी (12 ऑक्टोबर 2017)
सरकारकडून सातवा वेतन आयोग लागू :
- केंद्र सरकारने 11 ऑक्टोबर रोजी देशभरातील अनुदानित विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिवाळी भेट दिली आहे.
- प्राध्यापकांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ते दिल्ली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
- तसेच यावेळी त्यांनी जानेवारी 2016 पासून प्राध्यापकांसाठी सातवा वेतन लागू करण्यात आल्याचे सांगितले.
- देशभरातील 7 लाख 58 हजार प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये 329 राज्य विद्यापीठे आणि 12192 महाविद्यालयांतील सहायक आणि सहयोगी प्राध्यापकांचा समावेश असेल.
लव्ह जिहादची प्रकरणे तपासासाठी एनआयएकडे :
- केरळमधील ‘लव्ह जिहाद’च्या सुमारे 90 प्रकरणांची यादी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) चौकशीसाठी आली आहेत. यामध्ये महिलांचे बळजबरीने धर्मांतरण करण्यात आले आहे.
- केरळ सरकारचा याप्रकरणी एनआयएच्या चौकशीस सुरूवातीपासूनच विरोध आहे. एनआयएकडे सोवण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये रिलेशनशिप आणि लग्नाचाही समावेश आहे.
- ही प्रकरणी एनआयएकडे लव्ह जिहादशी संबंधित तपास करण्यासाठी सोपवण्यात आली आहेत. एनआयएने आपला तपास पुढे नेत पलक्कडच्या अथिरा नांबियार आणि बेकल येथील अथिरा नावाच्याच हिंदू मुलींची चौकशी केली. त्यांच्या मुस्लिम मित्रांनी लग्नाचे आमिष दाखवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले का हा प्रश्न चौकशी दरम्यान विचारण्यात आला.
- भारतातील कट्टरपंथी मुस्लिम संघटना फ्रंट ऑफ इंडिया आणि त्यांची राजकीय संघटना सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांचा या प्रकरणांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
- तसेच या दोन्ही संघटना या दोन मुलींशिवाय इतर एक मुलगी अखिला अशोकन उर्फ हादिया हिला फसवून धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडल्यास संशय आहे.
भालचंद्र देशमुख यांना मरणोत्तर उत्तम प्रशासक पुरस्कार :
- भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने पॉल एच.एप्ली यांच्या नावाने दिला जाणारा उत्तम प्रशासकाचा सन्माननीय पुरस्कार माजी कॅबिनेट सचिव भालचंद्र गोपाळ देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
- महाराष्ट्राचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रीय यांनी 11 ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हस्ते हा पुरस्कार दिवंगत भालचंद्र देशमुख यांच्या वतीने स्वीकारला.
- दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर या तीन पंतप्रधानांसोबत महत्त्वाची कामगिरी बजावलेले सनदी अधिकारी दिवंगत भालचंद्र देशमुखांनी कॅबिनेट सचिव या सर्वोच्च पदावर काम करण्यापूर्वी मुंबई महापालिकेचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव या पदांसह केंद्र सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले. प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवीत लोक प्रशासनात अनेक आदर्श पायंडे देशमुखांनी पाडले.
- भारतीय राजकारणातल्या अद्वितिय घटनांची साक्ष देणारे व भारताच्या अलौकिक ग्रंथसंपदेत मोलाची भर घालणारे ‘पुना टू प्राइम मिनिस्टर्स ऑफिस’, ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी थिंक्स अ लाऊ ड’, ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स अराउंड’, ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक’यासह अनेक ग्रंथ भालचंद्र देशमुखांनी लिहिले.
मुरंबा येथे विजय भटकरांचा गौरव सोहळा :
- मुरंबासारख्या खेडेगावात जन्म घेऊन संपूर्ण जगामध्ये संगणक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या जन्मगावी दोन वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शोध विज्ञान तंत्रज्ञान विषयावर विविध स्पर्धा आयोजित केले जाते.
- दयार्पूर येथील गाडगेबाबा मंडळाच्यावतीने विजय भटकर यांच्या वाढदिवशी राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेचे आयोजन, भटकर यांचा गौरव सोहळा व त्यांनी लिहिलेल्या संत गाडगेबाबा या इंग्रजी व मराठी भाषेत अनुवादित ग्रंथांचा लोकार्पण सोहळा आदी विविध कार्यक्रम 11 ऑक्टोबर रोजी थाटात पार पडले.
- मुलांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान रुजावे, नवनवीन प्रयोग संशोधनाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, या दृष्टींने 11 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय विज्ञान स्पर्धा घेण्यात आली.
- तसेच त्यात देशभरातील 300 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या निमित्ताने भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना अनेक प्रयोग बघायला मिळाले.
‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियुक्ती :
- बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 11 ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली. गजेंद्र चौहान यांची या पदावरील नियुक्ती वादग्रस्त ठरली होती.
- अनुपम खेर यांनी चरित्र अभिनेते म्हणून बॉलीवूडमध्ये दीर्घकाळ आपली छाप पाडली आहे. त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून ‘कर्मा’, ‘चायना गेट’, ‘दिलवाले दुल्हनियॉं ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहे.
- चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने खेर यांना 2004 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. खेर यांनी याआधी सेन्सॉर बोर्ड आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्षपदही भूषवले आहे.
- तसेच यापूर्वी एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान होते. मात्र, सुरुवातीपासूनच ते वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या नियुक्तीला विरोध करत विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. तरीही चौहान पदावर कायम होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपल्यावर मुदतवाढ नाकारण्यात आली. चौहान यांनी अनुपम खेर यांना नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा