चालू घडामोडी (13 डिसेंबर 2017)
पंतप्रधान मोदींना सचिनचे पत्र :
- आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा (सीजीएचएस) लाभ मिळावा, अशी विनंती माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
- सचिनने 24 ऑक्टोबरला मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अव्वल क्रीडापटूंना उतारवयात भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्येवर प्रकाश टाकताना औषधोपचाराच्या अतिरिक्त खर्चाचा ताण त्यांच्यावर पडतो, असे म्हटले आहे. आपल्या पत्रात त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघांमध्ये समाविष्ट असलेल्या मोहम्मद शाहीद यांचे उदाहरण दिले आहे. एकापेक्षा जास्त अवयव निकामी झाल्याने जुलै महिन्यात शाहीद यांचा मृत्यू झाला होता. बेताची आर्थिक स्थिती असल्याने त्यांना वेळेवर आणि मोठय़ा रुग्णालयात उपचार घेता आले नाहीत.
- पंतप्रधान मोदी यांना विनंती करण्यापूर्वी क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळण्याबाबत क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्याचे सचिनने त्याच्या पत्रात म्हटले आहे.
अॅथलेटिक्स स्पर्धेत संजीवनीला सुवर्णपदक :
- भविष्यात लांब पल्याच्या शर्यतीत भारताचे आशास्थान असलेल्या संजीवनी जाधवने महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेतील निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
- आचार्य नागार्जूना विद्यापीठाच्या यजमानात्वाखाली ही स्पर्धा सुरू आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिकच्या संजीवनीचे हे पाच हजार मीटर शर्यतीतील हे सलग चौथे सुवर्णपदक आहे.
- आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या संजीवनीने प्रतिस्पर्ध्याना संधी न देता 15 मिनिटे 51.58 सेकंदात शर्यत जिंकली. अल फलाह विद्यापीठाच्या वर्षा देवीला 16 मिनीटे 50.23 सेकंदात रौप्य तर दीनदयाल उपाध्याय विद्यापीठ च्या डिम्पल सिंगला 16 मिनीटे 56.88 सेकंदात ब्राँझ पदक जिंकले.
- पुरूषांच्या शर्यतीत पंजाबच्या रणजीत कुमारने किसन तडवीला मागे टाकून 14 मिनिटे 39.19 सेकंदात सुवर्णपदक जिंकले. किसनला 14 मिनिटे 39.56 सेकंदात रौप्य मिळाले. गतवर्षी किसनने सुवर्णपदक जिंकले होते.
नेत्यांवरील खटल्यांसाठी विशेष न्यायालये :
- गुन्हे दाखल असलेल्या खासदार आणि आमदारांसाठी केंद्र सरकारने 12 विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात ही माहिती देण्यात आली असून, यासाठी 7.8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष न्यायालयात लोकप्रतिनिधींविरोधातील प्रलंबित खटले तातडीने मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
- सरकारी आकडेवारीनुसार 2014 पर्यंत भारतातील एकूण 1,581 खासदार आणि आमदारांविरोधात 13,500 खटले सुरु आहेत. हे प्रमाण आता वाढलेही असेल. न्यायालयातील संथप्रक्रियेमुळे हे खटले प्रलंबित राहतात आणि लोकप्रतिनिधींची फावते. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत.
- राजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत, यासाठी केंद्र सरकारने विशेष न्यायालये स्थापन करावीत, असे आदेश सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर महिन्यात दिले होते. हा विषय राज्यांच्या अखत्यारित असल्याचा पवित्रा घेत केंद्राने हात झटकू नयेत. तर न्यायालयांच्या स्थापनेसाठी राज्यांना कशाप्रकारे साह्य करता येईल, याचा विचार करून केंद्राने ठोस योजना आखावी, असे कोर्टाने बजावले होते. यासाठी कोर्टाने 8 आठवड्यांची मुदतही दिली होती.
नॉर्वेमध्ये इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक :
- भारतामध्ये सध्या 2जी, 3जी आणि 4जी सारखा इंटरनेट स्पीड दिला जात आहे. आपल्याला हा स्पीड जास्त वाटतोही मात्र, भारत जगाच्या इंटरनेट स्पीडच्या तुलनेत ‘स्लो’ असल्याची माहिती समोर आली आहे. जगातील पहिल्या 100 देशांच्या यादीतही भारताला स्थान मिळालेले नाही.
- ‘ओक्ला’ या संस्थेने मोबाईल इंटरनेट स्पीडबाबत सर्वेक्षण केले होते. यामध्ये ही बाब पुढे आली आहे. इंटरनेटच्या स्पीडमध्ये सध्या भारत जगात 109 व्या स्थानावर आहे. तर ब्राँडबँड स्पीडमध्ये 76 व्या स्थानी आहे. या वर्षाच्या सुरवातीला भारतातील मोबाईल डाऊनलोडिंगचा सरासरी स्पीड 7.65 एमबीपीएस इतका होता. वर्षभरात या स्पीडमध्ये वाढ झाली आहे.
- नोव्हेंबरमध्ये इंटरनेटचा स्पीड 8.80 एमबीपीएस इतका होता. आताच्या आणि सुरवातीच्या इंटरनेट स्पीड लक्षात घेता इंटरनेटच्या स्पीडमध्ये 15 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. मात्र, इतर देशांत इंटरनेटचा स्पीड चांगलाच ‘हाय’ आहे.
- नॉर्वेमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक म्हणजे 62.66 एमबीपीएस आणि नेदरलँडमध्ये 53.01 एमबीपीएस आहे. तर आईसलँडमध्ये 52.78 एमबीपीएस इतका आहे.
गृहमंत्रालयाकडून राज्यांच्या सीमा विकासासाठी निधी :
- इतर देशांशी सीमा जोडलेल्या सहा राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 174 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सीमांच्या विकासासाठी हा निधी देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत (BADP) हा निधी देण्यात आला आहे.
- तसेच या BADP कार्यक्रमांतर्गत नुकताच आंतरराष्ट्रीय सीमेवरील 0 ते 10 किमी परिघातील सर्व गावांच्या विकासासाठी निधी देण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत स्वच्छ भारत अभियान, स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम, खेळांचा प्रसार, ग्रामीण पर्यटनाचा प्रसार, सीमा पर्यटन आणि वारसास्थळांचे संरक्षण यांचाही समावेश आहे.
- डोंगराळ भागातील दुर्गम भागात हेलिपॅड उभारणे, रस्त्याचे जाळे नसलेल्या ठिकाणी रस्ते बनवणे, आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देणे त्याचबरोबर जैविक शेती करणे या सर्वांचा BADP कार्यक्रमात समावेश होतो.
- आसामची बांगलादेशसोबत आंतरराष्ट्रीय सीमा जोडण्यात आली आहे. पश्चिम बंगालची नेपाळ आणि भूतानसोबत आंतरराष्ट्रीय सीमा जोडण्यात आली आहे. गुजरातची पाकिस्तानसोबत, मणिपूरची म्यानमारसोबत, उत्तर प्रदेशची नेपाळसोबत तर हिमाचल प्रदेशची चीन आणि नेपाळसोबत आंतरराष्ट्रीय सीमा जोडण्यात आली आहे.
दिनविशेष :
- सीमेन्सचे संस्थापक ‘वर्नेर व्हॅन सीमेन्स’ यांचा जन्म 13 डिसेंबर 1816 मध्ये झाला होता.
- 13 डिसेंबर 1955 हा दिवस गोव्याचे मुख्यमंत्री ‘मनोहर पर्रीकर’ यांचा जन्मदिन आहे.
- 13 डिसेंबर 2002 मध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक ‘यश चोप्रा’ यांना 2001चा फाळके पुरस्कार जाहीर झाला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ
{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/GSYEYw65KsQ?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}