चालू घडामोडी (13 जून 2018)
आरटीओचे पहिले सेवा केंद्र शिक्रापुरात :
- प्रादेशिक परिवहन विभाग व राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राज्यातील पहिले आरटीओ सेवा केंद्र शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सुरू करण्यात आले आहे.
- शिरूर तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणात एक अशी चौदा आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक अशी चौदा आरटीओ सेवा केंद्र येत्या वर्षभरात सुरू करण्याची घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी केली.
- प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) सेवा या पुणे व निगडी कार्यालयातच मिळण्याची सुविधा होती. मात्र या सर्व सेवा ऑनलाइन करून त्या एकाच केंद्राद्वारे कार्यान्वित करण्याचा प्रकल्प सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत राज्य सरकार पातळीवर हाती घेण्यात आला होता. ही सेंटर्स नेमण्यासाठी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सीएससीचा (कॉमन सर्व्हीस सेंटर) पर्याय प्रादेशिक परिवहन विभागाला दिला.
- तसेच यानुसार राज्यातील पहिल्या आरटीओ सेवा केंद्राची सुरवात शिक्रापुरात झाली असून या केंद्राचे औपचारिक उद्घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते व प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
- दरम्यान आरटीओच्या सर्व कर, प्रमाणपत्र, मालकी, वाहन परवाना, फॅन्सी नंबर, वाहन विमा आदींसह सर्व सेवा या केंद्राद्वारे सरकारने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे दिल्या जाणार असल्याची माहिती आजरी यांनी दिली.
विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे मुख्यालय नागपुर मध्येच :
- महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार बघता प्रादेशिक विकासाची घडी निट बसविण्यासाठी वैधानिक विकास मंडळांची स्थापना झाली.
- 1 जानेवारी 1994 मध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन झाल्यापासून मंडळाचे मुख्यालय नागपुरात आणि अध्यक्षपद मात्र अमरावती विभागाला मिळाले आहे. प्रा. राम मेघे यांच्या नियुक्तीपासून सुरू झालेली ही परंपरा आमदार चैनसुख संचेती यांच्या नियुक्तीने कायम राखल्या केली.
- पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भ मागासलेला राहिला. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी स्वतंत्र मंडळांची स्थापना करण्याची मागणी पुढे आली. त्यानुसार 1994 मध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली.
- पहिले अध्यक्ष होण्याचा मान अमरावतीचे प्रा. राम मेघे यांना मिळाला. त्यांच्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात 1995 मध्ये अमरावतीचेच भाजपचे नेते अरूणभाऊ अडसड यांना अध्यक्षपद मिळाले.
- युतीचे सरकार जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर अमरावतीचेच हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे 1999 मध्ये अध्यक्षपद आले. त्यांच्यानंतर कुणाचीही नियुक्ती न झाल्याने 2004 मध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आला.
- नागपूर विभागाचे तत्कालीन आयुक्त शैलेकुमार शर्मा यांच्याकडे प्रभार आला. त्यापाठोपाठ आनंद लिमये यांची नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ 2006 पर्यंत होता.
राज्याच्या कृषी क्षेत्राला कॅनडाचा सहकार्य :
- कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर वाढविण्यासोबतच त्यासाठी कॅनडातील क्युबेक प्रांताचे अधिकाधिक सहकार्य मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने 12 जून रोजी महत्त्वपूर्ण यश मिळवले.
- आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या आयव्हीएडीओ, नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटी संस्थांचे सहकार्य महाराष्ट्राला लाभणार असून, राज्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार आहे.
- कॅनडामधील मॉन्ट्रिएल येथे क्युबेकच्या उपपंतप्रधान श्रीमती डॉमनिक अँग्लेड आणि मुख्यमंत्री यांच्यात ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांत वापर करण्याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात घेतलेल्या भरारीची श्रीमती अँग्लेड यांनी प्रशंसाही केली.
- क्युबेक सरकारचा निसर्ग तंत्रज्ञानविषयक उपक्रम असलेली ‘एफआरक्यूएनटी‘ संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात क्युबेक सिटी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराप्रमाणे कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आहे.
- तसेच या क्षेत्रातील नेक्स्ट एआय संस्थेसोबतच्या सामंजस्य करारावरदेखील स्वाक्षरी करण्यात आली. राज्यातील 50 स्टार्टअपना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत ‘नेक्स्ट एआय’ काम करणार आहे.
विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार प्रदान :
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) दिला जाणारा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार अर्थात पॉली उम्रीगर पुरस्कार 12 जून रोजी विराट कोहलीला प्रदान करण्यात आला.
- कोहलीला 2016-17 आणि 2017-18 या दोन्ही वर्षांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पुरस्कार मिळाला असून विराटला एकूण 30 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
- बीसीसीआयने गेल्या आठवड्यात 2016-17 आणि 2017-18 वर्षांसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली होती. यात विराट कोहलीला दोन्ही मोसमांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
- तर महिलांमध्ये हरमनप्रीत कौरला 2016-17 साठी आणि स्मृती मंधानाला 2017-18 या मोसमातील कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. 12 जून रोजी बेंगळुरु येथील कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विराट कोहलीला रवी शास्त्री यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
नाशिकमध्ये होणार ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ :
- संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून कोईमतूरपाठोपाठ नाशिकमध्ये ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ होईल, असे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.
- राज्यात ‘डिफेन्स हब‘ची क्षमता असलेल्या नाशिकमध्ये संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधीबद्दल 15 जून रोजी चर्चासत्र होत आहे. त्यासंबंधीची माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते.
- सार्वजनिक उद्योग, स्टार्टअप, वैयक्तिक इनोव्हेटर्स, संशोधन आणि विकास संस्थांसाठी संरक्षण इनोव्हेशन हबच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होईल. संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्राशी निगडित उद्योगांमधून 40 ते 50 टक्क्यांपर्यंत उत्पादन होते.
- उरलेले ‘आउटसोर्स‘ करण्यात येते. त्यादृष्टीने छोटे उद्योजक तयार व्हायला हवेत म्हणून संरक्षण ‘इको सिस्टीम’चे राबवण्यात येते. इनोव्हेशन हबसाठी सरकारतर्फे निधी उपलब्ध करून दिला जातो. जेणेकरून संशोधन आणि विकासातून पुढे येणाऱ्या बाबी भारतीय संरक्षण आणि हवाई क्षेत्रातील उत्पादनासाठी उपयुक्त ठरतील.
- ‘इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स‘ योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. योजनेसाठी ‘डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन‘चा निधी दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.
दिनविशेष :
- प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म 13 जून 1831 मध्ये झाला होता.
- कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म 13 जून 1879 मध्ये झाला.
- सन 1983 मध्ये पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा