चालू घडामोडी (14 एप्रिल 2016)
आरोग्य विभागाचे नवे संचालक डॉ. मोहन जाधव :
- सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या निलंबनानंतर संचालकपदाचा पदभार (दि.13) डॉ. मोहन जाधव यांच्याकडे देण्यात आला.
- मॅटपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक टप्प्यावर लढाई जिंकलेल्या डॉ. जाधव यांना अखेर मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून दिला.
- निलंबित संचालक डॉ. सतीश पवार यांनी केवळ औषध खरेदीत मनमानी केली नाही, पण संचालकपदापर्यंत पोहोचण्यासाठी आपणच पात्र ठरले पाहिजे, अशा प्रकारे निवडीचे निकष आयत्या वेळी बदलल्याचे स्पष्ट निष्कर्ष सर्वच न्यायालयांनी काढले होते.
- लोकमतने औषध खरेदीचा भांडाफोड केल्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला आणि त्यात डॉ. पवार यांना निलंबित करण्यात आले.
- आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सेवा ज्येष्ठतेनुसार यादी तयार करून मुख्यमंत्र्यांकडे फाइल पाठवली.
- विभागाच्या यादीत कोठेही नाव नसलेल्या डॉ. मोहन जाधव यांच्या लढ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली आणि त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर जाधव यांच्याकडे पदभार द्यावा, असा निर्णय दिला.
पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर :
- पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 250 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
- तसेच यामध्ये मुंबई, पुणे, उस्मानाबाद, औरंगाबादच्या सहा महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
- पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर येत्या 1 मे रोजी त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.
- राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त भारती कुऱ्हाडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल तर, पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना विलास रासम यांना सेवेत सतत 15 वर्षे उत्तम सेवा बजाविल्याबद्दल महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
- पुणे शहराच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा गजानन बांबे यांना बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविल्याबद्दल गौरवण्यात येईल.
- उत्तम कामगिरी केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा सुभाष काळे आणि उस्मानाबादच्या पोलीस निरीक्षक अश्विनी एस. भोसले यांचा सन्मानचिन्हाने सत्कार करण्यात येणार आहे.
- क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल औरंगाबाद ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिया राजाराम थोरात यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
- स्पोर्ट्स व पोलीस कल्याण कलीनाचे पोलीस उपायुक्त शांतीलाल अर्जुन भामरे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त प्रदीप रोहीदास सोनावणे सन्मानचिन्हाचे मानकरी ठरले आहेत.
आयपीएलचे काही सामने महाराष्ट्राबाहेर होणार :
- राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेता सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेचे मे महिन्यांत होणारे सामने महाराष्ट्रात न खेळविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (दि.13) दिला.
- सरकारने जरी बघ्याची भूमिका घेतली असली, तरी राज्यातील पाणीटंचाईकडे आम्ही डोळेझाक करू शकत नाही, अशी चपराक राज्य सरकारला हाणत, न्या. विद्यासागर कानडे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला.
- न्यायालयाला हरप्रकारे समजवू पाहणाऱ्या बीसीसीआय, एमसीए आणि आयोजकांना यामुळे मोठा दणका बसला आहे.
- सहभागी संघांनी केलेली मोठी गुंतवणूक व ऐनवेळी सामने अन्यत्र भरविण्यातील व्यवहार्य अडचणींची दखल घेऊन न्यायालयाने आयोजकांना पर्यायी जागी तयारी करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला व 30 एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर नेण्याचा आदेश दिला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वयोमर्यादेमध्ये वाढ :
- राज्य सरकारने एमपीएससीसाठी तयारी करणाऱ्या व खुल्या प्रवर्गातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्यामर्यादा वाढविली आहे.
- राजपत्रित अधिकाऱ्यांची वर्यामर्यादा 33 वरुन 38 वर्ष करण्यात आली आहे.
- तसेच पोलिस शिपाई पदाची वयोमर्यादा 25 वरुन 28 वर्ष करण्यात आली आहे.
- तर पीएसआयची वर्यामर्यादा 28 वरुन 33 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लंडनमध्ये पहिली महाराष्ट्रीयन व्यावसायिक संस्था स्थापन :
- यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन पहिली महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था नुकतीच लंडनमध्ये स्थापन केली आहे.
- परदेशात राहून काम करताना या व्यावसायिकांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
- ओएमपीईजीचा (OMPEG) उदघाटन सोहळा 10 एप्रिल 2016 रोजी लंडन येथील सडबरी गोल्फ क्लबमध्ये पार पडला.
- तसेच कार्यक्रमाला ब्रेन्ट शहराच्या महापौर श्रीमती लेस्ली जोन्स तसेच साऊथहॉलचे श्री विरेंद्र शर्मा (ब्रिटीश पार्लमेंटचे खासदार), डॉ ओंकार साहोटा (लंडन असेंब्ली मेंबर), श्री उदय ढोलकीया (चेयरमन NABA, यु.के.) हे विषेश अतिथी म्हणून उपस्थित होते.
- या कार्यक्रमात OMPEG च्या संकेतस्थळाचे (www.ompeg.org.uk) उदघाटन तसेच “महाराष्ट्रीयन उद्योजकता” या विषयावर एक चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते.
- तसेच या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांबरोबरच स्थानिक व्यवसायिक व उद्योजक – डॉ महादेव भिडे (आय. व्ही.एफ स्पेशलीस्ट), मनोज वसईकर (फाईन डायनिंग शेफ) यांनीही भाग घेतला.
दिनविशेष :
- 1891 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार यांचा जन्म.
- 1912 : आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून दुर्घटना घडली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा