चालू घडामोडी (14 जुलै 2017)
बैजू पाटील यांना ‘नेचर बेस्ट एशिया’ पुरस्कार जाहीर :
- वन्यजीव छायाचित्रणात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जपानचा ‘नेचर बेस्ट एशिया’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
- जपानमधील टोकियो येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या एका सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येईल.
- बैजू पाटील यांनी गोव्यातील महावीर अभयारण्यात काढलेल्या ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ची आशियातील 8,500 छायाचित्रांतून ‘हायली ऑनर्ड’ प्रकारात निवड झाली. या बेडकाचा रंग पूर्णपणे हिरवा असून एखादा कोळी (स्पायडर) झाडांच्या पानांवर जसा फिरतो त्याप्रमाणेच हा बेडूक फिरत असतो.
आशियाई देशच ठरवतील तेल व्यवहार्य किमती :
- अतिरिक्त पुरवठ्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या जागतिक तेल बाजारात आगामी काळातील मागणी भारतासारख्या आशियाई देशांवरच अवलंबून राहील. त्यामुळे तेल पुरवठादार देशांनी भारतासारख्या देशांना व्यवहार्य किमतीत तेल पुरवठा करावा, असा आग्रह भारताचे पेट्रोलिएम राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) धर्मेंद्र प्रधान यांनी तेल उत्पादक देशांपुढे धरला.
- इस्तंबूल येथे आयोजित करण्यात आलेल्या 22 व्या जागतिक पेट्रोलिएम काँग्रेसमध्ये भारताच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांनी सहभाग घेतला. यानिमित्ताने प्रधान यांनी ‘भारतीय तेलव गॅस क्षेत्रातील विद्यमान धोरणे’ या विषयावरील मंत्री परिषदेचे नेतृत्व केले.
- तसेच त्यांच्याच अध्यक्षतेखाली ‘तेल, गॅस आणि उत्पादनांसमोरील पुरवठा व मागणीविषयक आव्हाने’ या विषयावर एक महापरिषदही झाली. या महापरिषदेत बोलताना प्रधान यांनी वरील विधान केले.
भारतीय लष्करालाच थेट शस्त्रखरेदीचे अधिकार प्राप्त :
- केंद्र सरकारकडून लष्कराला आपत्कालीन स्थितीत ठरलेल्या शस्त्रांची थेट खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
- सीमेवर होणाऱ्या चकमकींच्या वेळी सैन्याला शस्त्रसज्ज ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सैन्याची शस्त्रखरेदी नोकरशाहीच्या लालफितीमध्ये आणि फायलींमध्ये अडकणार नाही.
- शस्त्रखरेदीच्या प्रक्रियेला अनेकदा बराच काळ लागतो. त्याचा परिणाम कोणत्याही कारवाईवर होऊ नये, अशी संरक्षण मंत्रालय व एकूणच केंद्र सरकारची इच्छा आहे. म्हणून लष्कराला ठरलेली शस्त्रखरेदी थेट करण्याचे केंद्राकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
- शस्त्रखरेदीचे अधिकार लष्कराला देण्यास ही पार्श्वभूमी आहे. मात्र नवी शस्त्रखरेदी लष्कराला परस्पर करता येणार नाही.
नोबेलविजेते ल्यू शाबो यांचे निधन :
- चीनमधील सरकारी दमनशाहीविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने तुरुंगवासाची शिक्षा झालेले आणि कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही योग्य उपचार न मिळालेले नोबेल पुरस्कारविजेते ज्येष्ठ लेखक ल्यू शाबो यांचे 13 जुलै रोजी वयाच्या 61व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चीनमधील लोकशाहीचा आवाज हरपला आहे.
- चीनमधील मानवी हक्कांची जपणूक व राजकीय रचनेत सुधारणा या मागण्यांसाठी सन 2008 मध्ये एक याचिका तयार करण्यात आली होती. तिच्या लेखनात ल्यू शाबो यांचा सहभाग होता. त्यासाठी त्यांना अटक झाली होती.
- तसेच पुढे 2009 मध्ये राष्ट्राच्या अधिकारांना आव्हान दिल्याचा ठपका ठेवून त्यांना 11 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. तुरुंगात असतानाच त्यांना शांततेचे नोबेल जाहीर झाले.
- मात्र ओस्लो येथे सन 2010 मध्ये झालेल्या नोबेल सोहळ्यात त्यांना सहभागी होता आले नव्हते. त्या सोहळ्यात ल्यू शाबो यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.
दिनविशेष :
- समाजसुधारक ‘गोपाळ गणेश आगरकर’ यांचा जन्म 14 जुलै 1856 मध्ये झाला.
- 14 जुलै 1920 मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री ‘शंकरराव चव्हाण’ यांचा जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा