चालू घडामोडी (14 नोव्हेंबर 2017)
इलेक्ट्रिक बस मुंबईला प्रदूषणमुक्त करणार :
- कर्णकर्कश आवाज आणि धूर सोडत जाणारी अलीकडे तयार झालेली बेस्ट बसची प्रतिमा आता बदलणार आहे.
- बेस्टला प्रदूषणमुक्त करणारी इलेक्ट्रिक बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या बसचे लोकार्पण वडाळा बेस्ट बस आगारात नुकतेच झाले. प्रदूषणमुक्त आणि आरामदायी प्रवास असलेली ही राज्यातील पहिलीच हायटेक बस ठरणार आहे.
- तसेच या बसगाडीसाठी सन 2015च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात 10 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार, बॅटरीवर चालणार्या सहा बस खरेदी करण्यात आल्या आहेत.
- प्राथमिक स्वरूपात फोर्ट परिसरात या बस फेर्या चालविण्यात येणार आहेत. येत्या काळात असे उपक्रम राबविण्यास केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी 20 कोटी देण्याचे आश्वासन दिल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.
- डिझेल बससाठी प्रति किमी 20 तर सीएनजीसाठी 15 रुपये लागतात. इलेक्ट्रिक बससाठी प्रति किमी फक्त 8 रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक होणार असून, आर्थिक फायदाही होणार आहे.
भारतनेटच्या दुस-या टप्प्यासाठी महाराष्ट्राला निधी मंजूर :
- केंद्र सरकारच्या ‘भारतनेट’ या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्राला 2,179 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 148 तालुके इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत.
- केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान तसेच दूरसंचार मंत्रालयातर्फे दिल्लीतील विज्ञान भवनात ‘भारतनेट’च्या दुसऱ्या टप्प्यातील ब्रॉडबँड नेटवर्कच्या विस्ताराविषयी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. या परिषदेत राज्याचे माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते.
- तसेच भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात देशातील एक लाखापेक्षा अधिक ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकूण 7451 गावामध्ये ब्रॉडबँड नेटवर्क सेवा पोहोचवण्यात आली. राज्यातील पहिल्या डिजिटल जिल्ह्याचा मान नागपूर जिल्ह्याला मिळाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पूर्णत: ब्रॉडबॅंडशी जोडण्यात आल्या आहेत.
भारताकडून फिलिपिन्सला दोन नवीन प्रजातींचे बियाणे :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलिपिन्स दौऱ्याच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रास (आयआरआरआय) भेट देऊन भाताच्या दोन नवीन प्रजातींचे बियाणे संस्थेच्या जनुक पेढीस दिले. भाताच्या या दोन्ही प्रजाती भारतीय आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, की दारिद्रय़ व भूक या दोन समस्यांवर मात करण्यासाठी भाताचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे.
- लॉस बॅनॉस येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेला मोदी यांनी भेट दिली. ही संस्था मनिलापासून 65 कि.मी. अंतरावर आहे. मोदी यांच्या नावाने त्या संस्थेत भात संशोधन प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. तिचे उद्घाटन मोदी यांनी केले. ‘श्री. नरेंद्र मोदी रिसालियंट राइस फील्ड लॅबोरेटरी’च्या नामफलकाचे अनावरण त्यांनी केले.
- पंतप्रधानांनी तेथील जनुक पेढीला भाताच्या दोन भारतीय प्रजातींचे बियाणे दिले. त्यांनी पूरप्रवण भागात उगवणाऱ्या भाताच्या पिकासाठी शेतात कुदळ मारून लागवडीचा शुभारंभ केला. या संस्थेने महिला शेतकरी सहकारी संस्थांच्या सहभागातून केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. या संस्थेला भेट हा समृद्ध करणारा अनुभव होता, या संस्थेचे काम असाधारण असून त्यातून दारिद्रय़ व भूक या प्रश्नांवर मात करता येऊ शकेल, असे ते म्हणाले.
- भारत सरकारने वाराणसीत आयआरआरआय या संस्थेचे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. या संस्थेची 17 देशांत कार्यालये असून 1960च्या हरित क्रांतीनंतर भाताच्या नवीन प्रजाती विकसित करण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे.
भारतीय लष्कर लढाऊ विमानाची निर्मिती थांबवणार :
- लष्कराकडून लाईट कॉम्बॅट विमान तेजस आणि अर्जुन रणगाड्याची निर्मिती थांबवण्याची तयारी सुरु आहे. तेजस आणि अर्जुनच्या सुधारित श्रेणीची निर्मिती थांबवण्याबद्दलचा प्रस्ताव लष्कराकडून देण्यात आला आहे. मेक इन इंडिया आणि सामरिक भागीदारीच्या धोरणांतर्गत परदेशी कंपन्यांकडून सिंगल इंजिन फायटर जेट्स आणि रणगाडे खरेदी करण्याचा प्रस्ताव लष्कराकडून देण्यात आला आहे.
- गेल्याच आठवड्यात लष्कराने 1,770 रणगाड्यांसाठी प्राथमिक स्तरावरील निविदा मागवली आहे. या रणगाड्यांना फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेईकल्सदेखील म्हटले जाते. युद्धजन्य परिस्थितीत शत्रू सैन्यावर वरचढ ठरण्यासाठी या रणगाड्यांचा उपयोग होऊ शकतो. यासोबतच भारतीय हवाई दलाकडून लवकरच 114 सिंगल फायटर जेट्स विमानांसाठी निविदा मागवल्या जाऊ शकतात.
- तसेच संरक्षण क्षेत्रातील अनुभवाची कमतरता दूर करण्यासाठी सामरिक भागिदारीवर जोर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. नव्या धोरणांतर्गत शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणाऱ्या भारतातील खासगी कंपन्या आणि जगातील मातब्बर कंपन्या संयुक्तपणे उत्पादन करतील. यामध्ये तंत्रज्ञानाचे हस्तांतरणदेखील केले जाईल.
दिनविशेष :
- 14 नोव्हेंबर हा दिवस भारतात “बालदिन” म्हणून साजरा केला जातो.
- 14 नोव्हेंबर 1889 हा प्रथम भारतीय पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ यांचा जन्मदिन आहे.
- सन 1922 मध्ये 14 नोव्हेंबर रोजी बी.बी.सी.चे रेडियो प्रसारण सुरू झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा