चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2015)
राष्ट्रपती पोलिस पदक घोषित :
- राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विवेक फणसळकर, हिंगोलीचे उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांना उल्लेखनीय सेवेसाठी तर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक जय जाधव यांच्यासह 35 अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक घोषित झाले आहे.
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली.
- गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक घोषित झालेल्या मुंबई परिसरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – चंद्रकांत गुंडगे (पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणे ग्रामीण), मनोहर धनावडे (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई), शिवाजी घुगे (पोलिस उपनिरीक्षक, मंत्रालय सुरक्षा), विष्णू मालगावकर (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, मुंबई), रामचंद्र सावंत (पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, मुंबई), दीपक सावंत (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, गुप्तवार्ता विभाग), बाबासाहेब गवळी (सहायक उपनिरीक्षक, अंधेरी), तानाजी लावंड(सहायक उपनिरीक्षक, सशस्त्र पोलिस, नायगाव), रवींद्र दळवी (हवालदार, मोटर वाहतूक विभाग, मुंबई), अनिल सालियन (हवालदार, सीआयडी, मुंबई), अरुण वास्के (हवालदार, अंधेरी पोलिस ठाणे), सदाशिव नाथे (हवालदार, विशेष शाखा, ठाणे), शांताराम डुंबरे (हवालदार, सशस्त्र पोलिस, नायगाव), तानाजी जाधव (हवालदार, वाहतूक शाखा, मुंबई), विजय महाडिक (हवालदार, गुन्हे शाखा, मुंबई).
अजिंक्य रहाणेने नोंदवला जागतिक विक्रम :
- श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेली पहिली कसोटी भारताच्या अजिंक्य रहाणेमुळे चांगलीच गाजली़ ती त्याच्या फलंदाजीमुळे नाही तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे रहाणेने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून तब्बल 8 झेल घेताना जागतिक विक्रम नोंदवला.
- यापूर्वी एका कसोटी सामन्यात सर्वाधिक 7 झेल घेण्याचा विक्रम संयुक्तपणे ग्रेग चॅपल (ऑस्टे्लिया), यजुर्विंद्र सिंग (भारत), हसन तिलकरत्ने (श्रीलंका), स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) आणि मॅथ्यू हेडन (ऑस्टे्रलिया) यांच्या नावांवर होता.
नेस्ले कंपनीकडून सरकारने मागितली 640 कोटी रुपये भरपाई :
- मॅगी नूडल्समध्ये जास्त प्रमाणात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट सापडल्याच्या प्रकरणी अयोग्य व्यापार पद्धती, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती या कारणास्तव स्वित्र्झलडच्या नेस्ले कंपनीकडून सरकारने 640 कोटी रुपये भरपाई मागितली आहे.
- सरकारने नेस्ले कंपनीवर आर्थिक दंडाशिवाय इतर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला असून लवकरच ग्राहक कामकाज मंत्रालय कंपनीच्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे.
- देशातील ग्राहकांच्या हितासाठी केंद्र किंवा राज्य सरकार राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर तक्रार दाखल करू शकतं.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 (ड) मध्ये तशी तरतूद आहे.
- परंतु, आतापर्यंत कोणत्याही कंपनीविरुद्ध तसा खटला दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे मॅगीवर केंद्र सरकारने दावा ठोकल्यास तो देशातील अशा प्रकारचा पहिलाच खटला ठरेल.
- जूनमध्ये एफएसएसएआय या संस्थेने मॅगी नूडल्सवर बंदी घातली होती व नेस्ले कंपनीने मॅगीच्या पाकिटांवरील माहितीतही नियमांचे उल्लंघन केले होते असे एफएसएसएआयने (भारतीय अन्नसुरक्षा व प्राधिकरण) म्हटले असून, त्यात चववर्धक मोनो सोडियम ग्लुटामेट व शिसे जास्त असल्याचा आक्षेप घेतला होता.
व्हेन्चर कॅपिटल इंडस्ट्री निर्माण करण्याचा निर्णय :
- सामाजिक उपक्रमांना आर्थिक मदत मिळावी यासाठी व्हेन्चर कॅपिटल इंडस्ट्री निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे.
- सामाजिक उपक्रमांसाठी देशांतर्गत स्तरावर व्हेन्चर कॅपिटल इंडस्ट्री निर्माण करताना यातून इम्पॅक्ट फंडाला अर्थपुरवठा नियमित व्हावा असाही प्रयत्न होणार आहे.
- प्रत्येक कंपनीने आपल्या नफ्यातील 2 टक्के रक्कम अशा सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतवल्यास मोठा निधी यातून उभारला जाईल, असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला.
- सामाजिक किंवा पर्यावरणीय परिणाम करणारे परंतु फायदेशीर असणारे उपक्रम करण्यासाठी एखाद्या संस्थेने गुंतवणूक केल्यास अशी गुंतवणूक इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून ओळखली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय :
- गुजरातमध्ये इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत अभ्यासाला असलेले ‘राष्ट्रीय महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक आता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- या पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
- डॉ. आंबेडकरांच्या 125 व्या जयंती सोहळ्यानिमित्त हे पुस्तक छापण्यात आले होते. प्रख्यात विचारवंत पी.ए. परमार यांनी गुजराती भाषेत लिहिलेले हे पुस्तक राज्याच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याने अभ्यासक्रमात लागू करून ते राज्यभरातील सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरितही केले होते.
- तथापि, या पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्यामुळे हे पुस्तक आता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे.
दिनविशेष :
- भारत, कॉँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया स्वातंत्र्य दिन
- लिच्टेन्स्टेन लिच्टेस्टाईन दिन
- पोलंड सेना दिन
- 1948 : दक्षिण कोरियाची निर्मिती.
- 1960 : कॉँगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- 1971 : बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा