चालू घडामोडी (15 फेब्रुवारी 2018)
भारतीय रेल्वेमध्ये महाभरती :
- रेल्वेतील नोकरी म्हणजे सुरक्षित आणि चांगली असा समज असतो. याचा फायदा घेण्याची संधी नुकतीच चालून आली आहे.
- भारतीय रेल्वेने आपल्याकडील नोकऱ्यांची माहिती जाहीर केली असून तरुणांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
- भारतीय रेल्वेमध्ये 90 हजार नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती रेल्वेने नुकतीच दिली आहे.
- याबाबतची विस्तृत माहितीही रेल्वेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. यामध्ये 62,907 नोकऱ्या केवळ 10वी पास झालेल्यांसाठी उपलब्ध आहेत.
- ट्रॅक मेंटेनर, गेटमन, पॉईंटसमन, पोर्टर, हेल्पर यांसारख्या पदांसाठी या जागा आहेत. यासाठी वयाची अट 18 ते 31 वर्षे असून इतर मागासवर्गियांसाठी 3 वर्षांची अधिक तर अनुसूचित जातीच्या अर्जदारांसाठी ही सूट 5 वर्षापर्यंत आहे. यासाठी अर्जदाराने 10वी किंवा आयटीआय किंवा एनसीटीव्हीचा कोर्स करणे आवश्यक आहे.
- लोको पायलट आणि टेक्निशियन पदासाठी 26 हजार जागा भरायच्या आहेत. indianrailways.gov.in या वेबसाईटवर याबद्दलची विस्तृत माहिती मिळेल.
कोल्हापूर जिल्हा परिषद यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार :
- जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार यंदा उत्तूर (ता. आजरा) व खडकेवाडा (ता. कागल) या ग्रामपंचायतींना विभागून प्रथम क्रमांक जाहीर झाला. गेल्यावर्षीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीला जाहीर झाला.
- पुरस्कार वितरण 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12ला मार्केट यार्ड येथील शाहु सांस्कृतिक मंदिरात होणार आहे. ही माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव यांनी दिली.
- तसेच गेल्यावर्षीचे आणि या वर्षीचे यशवंत ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसेवकांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे.
देशात हृदयरोगावरील उपचार स्वस्त होणार :
- आजारपण आणि त्यासाठी येणारा खर्च ऐकला की सामान्यांच्या तोंडचे पाणीच पळते. हृदयरोग ही आता अतिशय सामान्य समस्या झाली आहे.
- हृदयरोग झाल्यावर हृदयात घालण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किंमती आवाक्याबाहेरच्या असल्याने अनेकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो. पण आता या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
- हृदयात घालण्यात येणाऱ्या स्टेंटची किंमत कमी करण्यात आली असून त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे.
- मागील वर्षी वाढविण्यात आलेल्या या स्टेंटच्या किंमतीत कपात करण्यात आल्याने देशातील नागरिकांचा आरोग्यसेवेवरील खर्च काही प्रमाणात का होईना कमी होण्याची शक्यता आहे.
- केंद्र सरकारकडून ही किंमत कमी करण्यात आली असून त्याबाबतचा अधिकृत नियम जाहीर करण्यात आला आहे.
अतिदुर्गम भागात सौरऊर्जेतून वीजपुरवठा :
- सौभाग्य योजनेअंतर्गत राज्यात 11 लाख 64 हजार 135 लाभार्थींना वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे. यापैकी सात लाख 67 हजार 939 लाभार्थींना पारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून, तर 21 हजार 56 लाभार्थींना अपारंपरिक स्त्रोतातून वीजपुरवठा करण्यात येईल.
- दारिद्य्ररेषेखालील घरे आणि सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडित दीनदयाल ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील तीन लाख 96 हजार 196 घरांना वीजपुरवठ्याचे काम सुरू आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना घरातील अंतर्गत वाहिन्यांसह एक चार्जिंग पॉईंट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात येणार आहे.
- तसेच अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात येणार आहे.
- पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजनेसह इतर योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांनाही मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे.
आता जिओफोनवरही फेसबुक वापरता येणार :
- फेसबुक हे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आता ‘जिओफोन’ वर वापरणे शक्य होणार आहे.
- ‘न्यू व्हर्जन ऑफ फेसबुक अॅप’ हे जिओच्या KaiOs या वेब बेस ऑपरेटींग सिस्टिमवर आधारित आहे.
- जिओफोनसाठी हे विशेष अॅप या ऑपरेटींग सिस्टिमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- नव्या फेसबुक अॅपच्या माध्यमातून अनेक फिचर फोन वापरकर्त्यांना फेसबुक वापरणे सहज शक्य होईल.
- तसेच या अॅपच्या माध्यमातून पुश नोटीफिकेशन, व्हिडिओ, वेब बेस ऑपरेटींग सिस्टिम यासाठी एक्सटरनल सपोर्ट मिळतो.
- अॅपमध्ये कर्सरचा पर्यायही देण्यात आला आहे. त्यामुळे फेसबुकवरील न्यूजफीड आणि फोटो अशा प्रसिद्ध फिचरच्या वापरासाठी त्याचा उपयोग होईल.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा