Current Affairs of 15 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 जानेवारी 2018)
इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे भारतात आगमन :
- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. 14 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिल्ली विमानतळावर ते पोहोचले.
- यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी आणि नेतन्याहू विमानतळाहून तीन मूर्ती मार्गावरून पुढे रवाना झाले.
- या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, पाणी संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात इस्रायलच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
- भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
- भारतातील आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान ते दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना भेटी देणार आहेत. त्यांच्याबरोबर एक कार्यकारी शिष्टमंडळही भारतात येत आहे.
Must Read (नक्की वाचा):
26 जानेवारीला देशातील प्रमुख शहरांत हाय अलर्ट :
- 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात गुप्तचर खात्याने हाय अलर्ट जाहीर केला आहे.
- दिल्लीतील जामा मशिद परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यामुळे हा हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याबरोबरच देशातील इतर प्रमुख शहरातही हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
- दिल्ली पोलिसांनी 26 जानेवारीच्या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपाखाली बिलाल अहमद कावा याला 12 जानेवारी रोजी अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्वाचा मानला जात आहे.
- प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था असते. परंतु, दिल्लीतील जामा मशिद परिसरात तीन संशयित दहशतवादी लपले असून ते प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली असल्याने हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
रेल्वेच्या लॉकर्स सेवेचे दर वाढणार :
- रेल्वे प्रवाशांना स्टेशनवर सामान ठेवण्यासाठीची असलेली खोली व लॉकर्स यांचे भाडे आता वाढवण्यात येणार आहे.
- रेल्वे मंडळाने विभागीय व्यवस्थापकांना स्थानकावरील सामानखोली व लॉकर्सचे भाडे वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
- तसेच या सेवेचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी लिलाव पद्धत वापरण्यात येणार आहे.
- दर वर्षांला या सेवेचे भाडे वाढवण्यात येणार आहे. थोडक्यात लॉकर्स व सामानखोलीच्या सेवेचे आऊटसोर्सिग करण्यात येणार आहे.
जागतिक उत्पादन निर्देशांकात भारत तिसाव्या क्रमांकावर :
- जागतिक उत्पादन निर्देशांकात जागतिक आर्थिक मंचाने भारताला तिसावे स्थान दिले आहे.
- चीन पाचव्या क्रमांकावर आहे. ब्राझील, रशिया व दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स देश तुलनेने खाली आहेत.
- जपानचा पहिला क्रमांक असून जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रथमच उत्पादन सज्जता अहवाल जाहीर केला असून त्यात दक्षिण कोरिया, जर्मनी, स्वित्र्झलड, चीन, झेक प्रजासत्ताक, अमेरिका, स्वीडन, ऑस्ट्रिया, आर्यलड हे देश पहिल्या दहात आहेत.
- ब्रिक्स देशांमध्ये रशिया 35, ब्राझील 41, दक्षिण आफ्रिका 45 व्या क्रमांकावर आहे. तर भारताचा तिसावा क्रमांक लागला आहे.
- तसेच या अहवालातील स्थान ठरवताना औद्योगिक धोरण, सामूहिक कृती हे निकष लावले असून शंभर देशांचे चार गटात वर्गीकरण केले आहे.
लेखिका महाश्वेतादेवींना गुगलचे डुडलद्वारे अभिवादन :
- साहित्यक्षेत्रात आपल्या लेखनशैलीचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या लेखिका म्हणजे महाश्वेतादेवी. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगल या सर्च इंजिनने डुडलद्वारे महाश्वेतादेवींना अभिवादन केले आहे.
- 14 जानेवारी 1926 रोजी महाश्वेतादेवींचा जन्म आता बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव धरित्री देवी आणि वडिलांचे नाव मनिष घटक असे होते. हे दोघेही साहित्यिक होते. त्यांच्याकडूनच महाश्वेतादेवींना लेखनाचे धडे मिळले.
- भारताची फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंब पश्चिम बंगालमध्ये आले. महाश्वेता देवी यांनी विश्वभारती विद्यापीठ आणि शांतीनिकेतन मधून इंग्रजी विषय घेऊन बी.ए. केले. तर कोलकाता विद्यापीठातून एम.ए. केले. शिक्षिका आणि पत्रकार म्हणून महाश्वेतादेवींनी दीर्घकाळ काम केले.
- महाश्वेता देवी यांचे पहिले पुस्तक 1956 मध्ये प्रकाशित झाले. ‘झांसी की रानी’ असे या पुस्तकाचे नाव होते. रुदाली, हजार चौरासी की माँ, माटी माई या त्यांच्या पुस्तकांवर सिनेमांचीही निर्मिती करण्यात आली.
प्रजासत्ताकदिनी संविधान बचाव अभियान :
- केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांचे ऐक्य होत असताना आता 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी ‘संविधान बचाव अभियान’ची सुरवात होणार आहे.
- विविध पक्षांचे प्रमुख नेते, बिगर राजकीय संस्थाचे प्रतिनिधी, साहित्यिक, विचारवंत एकत्र येऊन मंत्रालयाच्या शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मार्च काढत ‘संविधान बचाव’चे देशव्यापी अभियान सुरू करण्यात येणार आहे.
- खासदार राजू शेट्टी यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, डाव्या पक्षाचे सीताराम येचुरी, तुषार गांधी, फारुख अब्दुल्ला, शरद यादव यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंत सहभागी होणार आहेत.
दिनविशेष :
- महाराष्ट्राचे 9वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म सन 1921 मध्ये 15 जानेवारी रोजी झाला.
- भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 मध्ये झाला.
- 15 जानेवारी 1973 रोजी जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे 9वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
- सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर 15 जानेवारी 2001 मध्ये प्रथमच उपलब्ध झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा