चालू घडामोडी (15 नोव्हेंबर 2017)
भारताकडून ‘आसिआन’ देशांना सहकार्य :
- दक्षिण चीन समुद्रात आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित संरक्षण संरचना उभी करण्यासाठी भारत ‘आसिआन’ संघटनेच्या सदस्य देशांना मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
- फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या आसिआन-भारत शिखर परिषदेला संबोधित करताना मोदींनी ही ग्वाही दिली.
- तसेच दहशतवाद व कट्टरतावाद ही सध्या या प्रदेशासमोरील सर्वात मोठी आव्हाने असून त्यांचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरजही मोदींनी या वेळी व्यक्त केली.
- मनिला येथे 12 ते 14 नोव्हेंबरदरम्यान ‘आसिआन’ आणि ‘ईस्ट एशिया’ या शिखर परिषदा पार पडल्या. ‘आसिआन’ परिषदेत व्यापार व गुंतवणूक या विषयांना प्राधान्य होते, तर ईस्ट एशिया समिटमध्ये सागरी सुरक्षा, दहशतवाद, शस्त्रास्त्र प्रसारबंदी आणि स्थलांतर आदी विषयही चर्चेला आले.
- भारताचा भर या प्रदेशातील व्यापारी व सामरिक संबंध सुधारण्यावर होता. दक्षिण चीन समुद्रातील चीनची अरेरावी आणि उत्तर कोरियाची अण्वस्त्रलालसा यांना पायबंद घालण्याबाबतही परिषदेत विचार झाला.
सुखोई विमानातून डागले जाणार ब्राह्मोस :
- शत्रू सैन्याच्या सीमेत घुसून लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी आता सुखोई या लढाऊ विमानातून घेतली जाणार आहे.
- आवाजाच्या तिप्पट वेगाने मारा करण्यात सक्षम असणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी याआधी कधीही लढाऊ विमानातून करण्यात आलेली नाही. मात्र या आठवड्यात ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई-30 एमकेआय विमानातून केली जाणार आहे. यामुळे भारताच्या युद्ध सज्जतेत वाढ होणार आहे. बंगालच्या उपसागरात दोन इंजिन असलेल्या सुखोई विमानाच्या Sukhoi Fighter मदतीने 2.4 टन किलो वजनाच्या ब्राह्मोसची चाचणी घेण्यात येईल.
- लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात येत असल्याने मारक क्षमतेत दुपटीने वाढ होणार आहे. हवेतून जमिनीवर मारा करण्यात सक्षम असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र शत्रू राष्ट्रात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीखालील अण्वस्त्रांचे बंकर्स, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स आणि समुद्रावरुन उडणारी विमाने यांना लक्ष्य करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्रावर वचक ठेवण्यात ब्राह्मोस महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. लष्कराने गेल्या दशकात 290 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा समावेश स्वत:च्या ताफ्यात केला आहे.
- तसेच याशिवाय ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी 27 हजार 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लष्करासह, नौदल आणि हवाई दलानेदेखील ब्राह्मोस क्षेपणास्त्र आपल्या ताफ्यात दाखल करण्यात रस दाखवला आहे.
रेल्वेमंत्र्यांकडून बुलेट ट्रेनचे समर्थन :
- भारतात बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्याच्या निर्णयाचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी समर्थन केले असून तो विकास योजनांचा भाग असल्याचे म्हटले आहे. बुलेट ट्रेनची व्यवहार्यता व इतर मुद्दय़ांवरून या प्रकल्पावर टीका झाली होती.
- ‘कोरा’ या संकेतस्थळाने त्यांच्या वाचकांसाठी प्रश्न विचारण्याची व त्यावर ऑनलाइन समुदायाकडून उत्तरे मागवण्याची योजना सुरू केली आहे. त्यात भारताला खरोखर बुलेट ट्रेनची गरज आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्या गोयल यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे 884 शब्दांत समर्थन केले. त्यांनी यात काही ग्राफिक्स व पंतप्रधान हा मुद्दा पटवून देतानाची छायाचित्रे टाकली आहेत.
- भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून त्यासाठी भारताच्या विकास योजनेत रेल्वे जाळ्याचे आधुनिकीकरण हा प्रमुख भाग आहे. त्याचबरोबर अतिवेगवान बुलेट ट्रेनही या विकास योजनेचाच भाग आहे.
- मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वे प्रकल्प हा एनडीए सरकारच्या दूरदृष्टीच्या प्रकल्पांचा एक नमुना आहे. त्यातून सुरक्षा, वेग व सेवा यात लोकांना मोठी सुधारणा दिसून येईल शिवाय भारतीय रेल्वे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात वेग व कौशल्ये यात आघाडीवर जाईल. कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाला नेहमीच विरोध होत असतो. पण जसे बदल होत जातात तसा हा विरोध मावळतो. नवीन तंत्रज्ञानाला विरोध होतो हे इतिहासानेच सिद्ध केले आहे पण हे तंत्रज्ञान देशाच्या फायद्याचे असेल यात शंका नाही, असे गोयल यांनी सांगितले. बुलेट ट्रेन हा कमी खर्चाचा प्रकल्प आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल गोयल यांनी दिला असून त्यामुळे मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेला बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात धार्मिक स्थळांची नोंदणी अनिवार्य :
- धार्मिक स्थळांमध्ये जमा होणारी देणगी आणि संपत्तीचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यांच्याकडील मालमत्तेची नोंदणी करण्याचे आदेश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत.
- राज्यातील सर्व धर्मादाय सहआयुक्त, उपायुक्त आणि सहायक धर्मादाय आयुक्तांना आपापल्या क्षेत्रातील धार्मिक स्थळांची माहिती मागविण्यात आली आहे. गावांचे सरपंच, ग्रामसेवक किंवा तहसीलदारांकडून धार्मिक स्थळांची माहिती मागवून त्यांची नोंदणी करून घ्यावी. अनेक देवस्थाने व धार्मिक स्थळांकडे जमिनी आहेत. दिवाबत्तीसाठी राजे-महाराजांनी देवस्थानला या जमिनी इनाम दिल्या होत्या. अशा इनाम जमिनींची नोंद देवस्थानच्या परिशिष्टावर करून घ्यावी. शिवाय, धर्मादाय आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय देवस्थान जमिनींची विक्री झाली असल्यास चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाईचे आदेशही आयुक्त डिगे यांनी दिले आहेत.
- विश्वस्तपदावरील पुजार्यांना हटवा –
- अनेक पुजारी आणि विश्वस्त देवस्थानांचे उत्पन्न स्वत:कडे वळवतात. काही ठिकाणी पुजारीच विश्वस्त आहेत. देवस्थानांचे लाभार्थी देवस्थानांचे विश्वस्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या लाभार्थ्यांना विश्वस्तपदावरून हटविण्याचे निर्देशही धर्मादाय आयुक्त डिगे यांनी दिले आहेत.
- देवस्थानांच्या रचनेत योग्य ते बदल करण्याच्या सूचना –
- राज्यात सुमारे 65 हजार सर्वधर्मीय धार्मिक स्थळे असून, त्यापैकी अनेक देवस्थानांकडे देणगी, हुंडीच्या माध्यमातून भाविक मोठ्या प्रमाणावर संपत्ती अर्पण करतात. भक्तांच्या या समर्पणाचे नेमके काय होते, याचा कोणताच लेखाजोखा नसतो. देवस्थानांकडे जमा होणार्या निधीवर मोठ्या प्रमाणात पुजारीच डल्ला मारतात. त्यामुळे पुजारी गब्बर आणि देवस्थान गरीब अशी अवस्था अनेक ठिकाणी आहे.
- देवस्थानाकडे जमा होणारा निधी देवस्थान आणि त्या माध्यमातून समाजासाठीच खर्चिला गेला पाहिजे. यासाठी देवस्थानांच्या रचनेत योग्य ते बदल करण्याच्या सूचनाही परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
दिनविशेष :
- 15 नोव्हेंबर 1982 हा दिवस ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी नेते “आचार्य विनोबा भावे” यांचा स्मृतीदिन आहे.
- भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा