चालू घडामोडी (16 एप्रिल 2018)
BHIM अॅपची कॅशबॅक ऑफर घोषणा:
- भीम (BHIM)अॅपकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. भीम अॅपला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही ऑफर देण्यात आली आहे.
- गेल्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. ही कॅशबॅक ऑफर, ग्राहक आणि व्यापारी दोघांसाठी आहे. ऑफरअंतर्गत एकूण 1 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
- भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरअंतर्गत ग्राहकांना एका महिन्यात 750 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल, तर व्यापा-यांना 1 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
- नव्या युजर्सला पहिल्या ट्रांजेक्शनवर 51 रुपये कॅशबॅक मिळेल. पण, पहिलं ट्रांजेक्शन किमान किती रुपयांचं असावं याबाबत माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे ग्राहक 1 रुपयांचं ट्रांजेक्शनही करुन 51 रुपये कॅशबॅक मिळवू शकतात असं बोललं जात आहे.
- भारत शासनाचे भीम अॅप्लिकेशन हे यूपीआय-आधारित असे एक अॅप आहे. केवळ दोन एमबीचं हे अॅप ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’द्वारे हे अॅप चालवलं जातं आहे.
इंडियन एक्स्प्रेस समूहाकडून ieBangla.com वेबसाइट लाँच:
- ieMalayalam आणि ieTamil च्या यशस्वी लाँचिंगनंतर इंडियन एक्स्प्रेस समूहाने आता प्रादेशिक भाषेत आणखी एक पाऊल टाकले आहे. वर्ष 2017 मध्ये या वेबसाइट लाँच करण्यात आल्या होत्या.
- एक्स्प्रेस समूहाने आता ieBangla.com वेबसाइटद्वारे बंगाली भाषेत पर्दापण केले आहे. पोइला बैसाख म्हणजे बंगाली नववर्षाच्या मुहूर्तावर ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे.
- नवीन वेबसाइट ieBangla.com ही वेबसाइट फक्त राजकीय विचारांचे विश्लेषण करणार नाही तर विचारशील बंगाली वाचकांना तंत्रज्ञान, मनोरंजन आणि क्रीडा जगताशी निगडीत वेगळ्या आणि माहितीपूर्ण बातम्या देणार आहे.
- या वेबसाइटवर असा आशय पाहायला मिळेल जो आतापर्यंत बंगाली भाषेत पाहायला मिळाला नसेल. ही वेबसाइट कोलकाता येथून कार्यरत राहील आणि यामध्ये जगभरातील लेखकांचे योगदान असेल.
- तसेच ieBangla.com चे डिझाईन अत्यंत सुटसुटीत असेल आणि सुरूवातीला कोणत्याही प्रकारच्या जाहिराती त्यावर नसतील.
भारताच्या टेबल टेनिसपटूंचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक नावावर :
- भारताच्या टेबल टेनिसपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक धडाका कायम राखताना अखेरच्या दिवशी दोन कांस्यपदक नावावर केली आहे.
- या स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू ठरलेल्या मनिकाने आपल्या खात्यात आणखी एक पदक जमा केले.
- तिने मिश्र दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जी. साथियनसह बाजी मारली. बत्रा व साथियन या जोडीने भारताच्याच अचंता शरथ कमल व मौमा दास या जोडीचा 11-6, 11-2, 11-4 असा पराभव केला.
- राष्ट्रकुल स्पर्धेतील बत्राचे हे चौथे पदक ठरले. यापूर्वी तिने महिला एकेरीच्या ऐतिहासिक सुवर्णपदकासह महिला सांघिक गटात बाजी मारली होती. तसेच महिला दुहेरीत मौमा दासच्या साथीने रौप्यपदकाची कमाई केली आहे.
- दरम्यान शरथ कमलने पुरुष एकेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडच्या सॅम्युएल वॉल्करचा 11-7, 11-9, 9-11, 11-6, 12-10 असा पराभव केला आहे. त्याचेही या स्पर्धेतील हे तिसरे पदक ठरले आहे. त्याने पुरुष सांघिक गटात सुवर्ण आणि साथियनसह पुरुष दुहेरी गटात रौप्यपदक जिंकले आहे.
- दहा सदस्यीय टेबल टेनिस संघाने एकूण 8 पदकांची कमाई केली. त्यात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.
मनिका बत्राचा ‘गोल्डन स्मॅश’, दिवसातील सातवं सुवर्णपदक :
- राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या टेबल टेनिसपटू मनिका बत्रानं ‘गोल्डन स्मॅश’ लगावला आहे.
- त्याशिवाय, भारताच्या शिलेदारांनी आत्तापर्यंत 14 रौप्य आणि 17 कांस्यपदकांची कमाई केली आहे.
- ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा आजचा दहावा दिवस भारतासाठी ‘सोनियाचा दिनु’ ठरला आहे.
- राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच देशाचं प्रतिनिधित्व करणारी विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम हिनं ‘सोनेरी’ ठोसा लगावला. त्यानंतर, पुरुषांच्या 52 किलो वजनी गटात गौरव सोळंकीनंही सोनेरी यश मिळवलं आहे.
- नेमबाजीत संजीव राजपूतनं आणि भालाफेकीत नीरज चोप्रानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. कुस्तीतील सोनेरी कामगिरीची मालिका सुमित मलिकने पुढे सुरू ठेवली. तर, विनेश फोगाटनंही सुवर्णपदक पटकावलं.
- या सुवर्ण षटकारानंतर, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा भारताला ‘सातवे आसमां पर’ घेऊन गेली. पहिल्या गेममध्ये 1-6 अशी पिछाडीवर पडलेल्या मनिकानं झुंजार पुनरागमन केलं आणि हा गेम 11-7 नं जिंकला आहे.
- त्यानंतर तिचा आत्मविश्वास इतका उंचावला की, इंग्लंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला संधीच तिने दिली नाही. पुढचे तीनही गेम खिशात टाकत तिनं सुवर्णपदक जिंकलं.
देवकी राजपूत हिने पटकावला ”महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब” :
- हैदराबाद मधील एल.बी स्टेडियम येथे 11 ते 13 एप्रिल दरम्यान झालेल्या इंडियन रेसलिंग स्टाइल इंटरस्टेट रेसलिंग टूर्नामेंट (महिला कुस्ती) स्पर्धेत ठाण्याच्या देवकी देवीसिंग राजपूत यांनी ‘महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब’ पटकावला आहे.
- सहा महिला प्रतिस्पर्धाकांना मातीत लोलुन गदा जिंकत, ठाणे जिल्ह्याच्या ठाणे शहर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
- महाराष्ट्र-तेलंगाना केसरी ही मातीतिल (पुरुष व महिला) कुस्ती स्पर्धा पहिल्यांदाच खेळवण्यात आल्या. त्यामध्ये 55-65 या वजनी गटात खेलताना ठाणे शहर पोलीस दलाच्या देवकी यांनी सहा कुस्तीपट्टू यांच्याशी दोन हात करुन महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब जिंकत ठाण्यातील मुलीही खेलात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. या अजिंक्य पदामुळे ठाण्याला बहुदा पहिली,-वहीली गदा जिंकता आली आहे.
- विजेत्यांना गदा, पदक, प्रमाणपत्र, आणि रोख रक्कम देत गौरवण्यात आले आहे.
ड्रोनद्वारे पहिल्यांदाच औषध, रक्ताची डिलिव्हरी :
- जगातील अनेक ई-कॉमर्स कंपन्या तसेच फूड चेनमधील उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.
- परंतु रवांडात ड्रोनच्या माध्यमातून गरजूंपर्यंत औषधी आणि रक्त पोहोचवण्याची सेवा पहिल्यांदाच सुरू करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियातील व्यावसायिक ड्रोनची निर्मिती करणाऱ्या जिपलाइन या कंपनीद्वारे जगातील सर्वात वेगवान ड्रोन डिलिव्हरी सेवेची सुरुवात करण्यात आली.
- रवांडात 2016 पासून ही कंपनी काम करत आहे. ड्रोन डिलिव्हरी प्रणालीद्वारे मागील 15 महिन्यांत 4 हजारे उड्डाणे घेण्यात आली आणि जवळपास 1 लाख लिटर रक्त रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे.
- रक्त पुरवठा किंवा औषध मागवण्यासाठी या ड्रोन सेवेचा उपयोग घ्यायचा असेल तर डॉक्टर किंवा रुग्णालयाने मध्यवर्ती वितरण प्रणालीला एक संदेश पाठवणे गरजेचे असते. यानंतर केवळ 20 मिनिटांच्या आत मदत पोहोचवली जाते.
- रक्ताची पिशवी ड्रोनच्या पेलोडमध्ये ठेवली जाते. ड्रोनमध्ये सेट केलेल्या लोकेशनवर पॅराशूटद्वारे ड्रोन लँड न करता औषधी, रक्ताची पिशवी टाकली जाते. कंपनीने नुकतीच वेगवान ड्रोनची निर्मिती केली आहे.
- 128 किलोमीटर प्रतितास वेगाने हे ड्रोन चालते. एका वेळेस ड्रोन 160 किलोमीटरचे अंतर पार करते. यात 1.75 किलोपर्यंत वजन ठेवता येते.
जगात प्रथमच भारतामध्ये तयार झाले डेंग्यूवर औषध :
- जगात प्रथमच भारतीय वैज्ञानिकांनी डेंग्यूच्या आजारावरील औषध विकसित केले आहे. त्याच्या प्राथमिक चाचण्या पूर्णपणे यशस्वी ठरल्या आहेत.
- हे औषध बाजारात आणण्यापूर्वी जागतिक निकषांनुरूप त्याच्या मोठ्या प्रमाणात क्लिनिकल ट्रायल घेतल्या जात आहेत. 2019 पर्यंत हे औषध बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची आशा आहे.
- आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदच्या (सीसीआरएएस) वैज्ञानिकांनी सात प्रकारच्या औषधीय रोपट्यांपासून हे औषध तयार केले आहे. यात 12 पेक्षा जास्त वैद्यांना (विशेषज्ञ) दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.
- औषधाची उंदीर आणि सशांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. यानंतर पथदर्शी अभ्यास म्हणून गुरगावच्या मेदांता हॉस्पिटल, कर्नाटकच्या बेळगाव व कोलार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल डेंग्यूच्या 30-30 रुग्णांना औषध देण्यात आले आहे.
- औषध सेवनानंतर रुग्णांच्या रक्तात प्लेटलेट्सचे प्रमाण गरजेनुसार वाढल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिनविशेष :
- 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन म्हणून साजरा केला जातो.
- 16 एप्रिल रेल्वे दिन म्हणून साजरा केला जातो.
- 1853 मध्ये भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.
- 1922 मध्ये मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
- 1948 मध्ये राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा