चालू घडामोडी (16 फेब्रुवारी 2018)
नेपाळच्या पंतप्रधानपदी के.पी. शर्मा ओली :
- के.पी. शर्मा ओली यांनी 15 फेब्रुवारी रोजी नेपाळचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली.
- सीपीएन माओवादी पक्षासोबतच्या ओली यांच्या डाव्या आघाडीने संसदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर या देशात राजकीय स्थैर्य प्रस्थापित होईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.
- महाराजगंज येथील राष्ट्रपतींच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी 65 वर्षांचे ओली यांच्यासह सीपीएन-यूएमएलच्या दोन इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच के.पी. शर्मा ओली हे नेपाळचे 41 वे पंतप्रधान आहेत.
जर्मनीत सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत उपलब्ध होणार :
- जगातील बऱ्याच देशांनी वायू प्रदुषणाकडे कानाडोळा करत इंधनाचा वापर कमी करण्यास नकार दिला असतानाच जर्मनीने मात्र एका अनोख्या योजनेच्या माध्यमातून देशातील वायू प्रदूषण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज देशांपैकी एक असणाऱ्या जर्मनीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खाजगी चारचाकी गाड्यांचा वापर करतात. त्यामुळे देशासमोर वायू प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- श्वसनाशी संबंधीत आजारांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे. म्हणूनच आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोफत उपलब्ध करून गाड्यांचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याचे जर्मनीमधील सरकारने ठरवले आहे.
- युरोपियन महासंघाच्या वायू प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उंल्लघन करत असल्याने बर्लिनला मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे. असे झाल्यास जर्मनीमधील ट्रेन, बस, ट्रामचा प्रवास मोफत करता येणार आहे.
एका अॅपव्दारे करता येणार मतदार नोंदणी :
- घरबसल्या एका क्लिकवर आता तुम्हाला तुमचे नाव एका अॅप्लिकेशनद्वारे मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे.
- ERONET (Electoral Rolls Services NeT) असे या अॅप्लिकेशनचे नाव असेल. निवडणूकीच्या प्रक्रियेमध्ये डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.
- तसेच यावर मतदार कार्डाच्या नोंदणीची, पत्ता आणि नाव बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदारांना या कामांसाठी मतदार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही.
- आतापर्यंत 22 राज्ये या अॅप्लिकेशनशी जोडण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूकांमध्येही हे अॅप्लिकेशन लागू करण्यात आले नव्हते. येत्या काळात जून महिन्यापर्यंत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये जोडले जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली.
शिवजयंती सोहळ्यास राष्ट्रपती प्रमुख पाहुणे :
- अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दिल्ली येथे होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना सोहळ्यासाठी आमंत्रित केले.
- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीत थाटामाटात साजरी करण्यात येत आहे.
- देशभरातून हजारो शिवभक्तांची दिल्लीत उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यासाठी संभाजीराजे यांनी श्री. कोविंद यांची भेट घेऊन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. हे आमंत्रण श्री. कोविंद यांनी स्वीकारले आहे.
- तसेच याबरोबर लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, नौसेनाप्रमुख ॲडमिरल सुनील लांबा, जनरल पनू, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज विशेष उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागात सुरक्षित प्रसूतीसाठी खासगी विशेषज्ञ :
- ग्रामीण भागात विशेषविशेषज्ञांअभावी प्रसूतीदरम्यान होणारे माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आता खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात सुरवात झाली आहे.
- राज्यातील सुमारे 25 जिल्ह्यांतील 101 आरोग्य संस्थांमध्ये 128 खासगी विशेषज्ञ डॉक्टरांची कंत्राटी, अर्धवेळ व ‘ऑन कॉल’ या पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञांचा समावेश आहे.
- दोन महिन्यांत सुमारे बाराशेहून अधिक प्रसूती शस्त्रक्रिया या खासगी विशेषज्ञांच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
- माता व बालमृत्यू दर रोखण्यासाठी करीत असलेल्या विविध उपाययोजनांबरोबरच हा एक महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेण्यात आला आहे.
दिनविशेष :
- सन 1222 मध्ये 16 फेब्रुवारी रोजी जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म झाला.
- सन 1659 मध्ये 16 फेब्रुवारी रोजी पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.
- औरंगजेबाने 16 फेब्रुवारी 1704 रोजी राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.
- 16 फेब्रुवारी 1944 हा दिवस भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा