चालू घडामोडी (16 जानेवारी 2018)
बेळगावात होणार आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव :
- 20 जानेवारीपासून बेळगावात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव होणार आहे. यासाठी 12 देशांमधील 22 जण, तर भारतातील सतरा पतंग उडवणारे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत, अशी माहिती माजी आमदार अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- तसेच सावगाव रोडवरील अंगडी इन्स्टिट्यूटच्या परिसरात 20 ते 23 जानेवारी अखेर हा महोत्सव होणार आहे.
- पतंग महोत्सवाचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी प्रमाणेच यंदाही मुलांसाठी, मोठ्यांसाठी विविध कार्यक्रम होणार आहेत.
- 18 जानेवारीला मिडि सेंटरचे उद्घाटन होणार आहे. 20 जानेवारीला पतंग महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, 21 जानेवारीला खास तरुणाईसाठी उमंगचे आयोजन करण्यात आले आहे.
आधार पडताळणीसाठी आता चेहरा ओळख :
- आधारच्या पडताळणीसाठी बोटांचे ठसे आणि बुबुळांप्रमाणे आता चेहरा ओळखण्याच्या पर्यायाचाही (फेस रेकग्निशन) समावेश करण्यात येणार असून 1 जुलैपासून नवी सुविधा कार्यान्वित होणार असल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) प्रसिद्ध केले आहे.
- वयोवृद्ध व्यक्तींमध्ये अनेकदा बोटांचे ठसे अस्पष्ट होतात वा बुबुळांच्या साह्य़ाने पडताळणी करणे शक्य होत नाही. अशा वेळी आधारची पडताळणी करण्यात अडचणी येतात. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच आधारच्या पडताळणीसाठी ठसे आणि बुबुळांचा वापर पुरेसा नसल्याचे मत व्यक्त केले होते.
- केंद्र सरकारच्या धोरणानुसार आर्थिक व्यवहार करताना पॅन क्रमांकाच्या बरोबरीने आधार क्रमांक देणेही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकासाठी आधारची पडताळणी गरजेची ठरते.
- चेहऱ्याचा पर्यायही उपलब्ध होत असल्याने लोकांसाठी अतिरिक्त सुविधा मिळणार आहे. गेल्याच आठवडय़ात यूआयडीएआयने 16 आकडी आभासी क्रमांकाचा पर्यायही उपलब्ध करून दिला होता.
वीस लाखांपर्यंतची ग्रॅच्युइटी आता टॅक्स फ्री :
- मोदी सरकारकडून नोकरदारांना दिलासा देण्यात आला आहे. कारण निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा लवकरच आता 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात येणार आहे.
- कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र होण्यासाठी एका कंपनीत किमान पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागतो. त्यानंतर तो कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र ठरतो.
- वर्ष 2017 मध्ये ग्रॅच्युइटीची 10 लाखांची मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिवाय सातव्या वेतन आयोगानुसार 10 लाखांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवरील करमाफीची मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- आतापर्यंत फक्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाच हा फायदा देण्यात येत होता. आता मात्र सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनाही ही करमाफी मिळू शकणार आहे.
पुणे शहरात मंदिरांना वार्षिक दिवाबत्ती अनुदान :
- पुणे शहरातील विविध मंदिरांना श्री देवदेवेश्वर संस्थानतर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक दिवाबत्ती अनुदानात वाढ करण्यात आली आहे.
- मंदिरांमध्ये नित्यपूजेसाठी दिले जाणारे अनुदान अगदीच तुटपुंजे होते. संस्थानने गेल्या दोन वर्षांपासून मंदिरांना वार्षिक एक हजार रुपयांचे दिवाबत्ती अनुदान केले आहे.
- शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये असलेली मंदिरे ही जुन्या पुण्याची ओळख. या मंदिरांना पेशवाईमध्ये पेशव्यांकडून समईतील तेलवात आणि अगरबत्ती लावून पूजाअर्चा करण्यासाठी म्हणून दिवाबत्ती अनुदान दिले जात होते.
- तसेच पेशवाईचा अस्त झाल्यानंतरही ही प्रथा सुरूच राहिली. शहराच्या मध्यवर्ती भागातील विविध 35 मंदिरांना अशा स्वरूपाचे दिवाबत्ती अनुदान दिले जाते.
शिल्पा शिंदे ठरली बिग बॉस सीझन-11ची विजेती :
- नेहमीच वादांच्या भोवऱ्यात राहिलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो ची दरवर्षी चर्चा असते.
- ‘बिग बॉस’च्या अकराव्या पर्वाचे विजेतेपद शिल्पा शिंदेने पटकावले.
- टीव्ही जगताची लाडकी बहु हिना खान आणि लाडकी भाभी शिल्पा शिंदे यांच्यात झालेली या पर्वातील टक्कर चांगलीच गाजली.
महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यात स्वच्छता अभियान यशस्वी :
- पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानात देशातील तीन लाख नऊ हजार 161 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत.
- देशातील 303 जिल्हे हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यात नागपूर, कोल्हापूर, नगर व पुण्यासह महाराष्ट्रातील 16 जिल्हे व 34 हजार गावांचा समावेश आहे.
- केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
- दोन ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालेल्या स्वच्छ भारत मोहिमेचा लेखाजोखा यात मांडला गेला आहे.
- देशात गेल्या सव्वातीन वर्षांत पाच कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत.
दिनविशेष :
- सन 1681मध्ये 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.
- पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते 16 जानेवारी 1955 रोजी उद्घाटन झाले.
- आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे 16 जानेवारी 1995 मध्ये जलावतरण झाले.
- टाटा मोटर्सतर्फे 16 जानेवारी 2008 रोजी ‘नॅनो’ या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा