चालू घडामोडी (16 जून 2018)
एसटी महामंडळाकडून 18 टक्के भाडेवाढ :
- एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेच्या प्रवासी भाड्यात शनिवारपासून (15 जूनच्या मध्यरात्रीपासून) 18 टक्के वाढ करण्यात येत असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सुट्या पैशांवरून होणारे वाद लक्षात घेता यापुढे भाडेआकारणी ही पाच रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णयही एसटीने घेतला आहे.
- डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांना नुकतीच देण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही भाडेवाढ करण्यात येत असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
- यापुढे तिकिटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारले जातील. आठ रुपये तिकीट असल्यास 10 रुपये भाडे आकारले जाईल. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटून प्रवासी-वाहकांतील वादावादी थांबेल, असे महामंडळाचे म्हणणे आहे.
- मोटार वाहन कायदा 1988 नुसार शासनाला भाडेदर ठरवण्याचा अधिकार आहे. शासन निर्णय क्रमांक एचटीसी 1099/451/प्र. क्र 21 परिपत्रक 1 ता. 16 एप्रिल 1999 अन्वये भाडेवाढीचे सूत्र शासनाने मान्य केले आहे. या सुत्रानुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार महामंडळाला देण्यात आले आहेत. यापूर्वी 31 जुलै व 22 ऑगस्ट 2014 ला दोन टप्प्यांत मिळून एसटीची 13 ते 15 टक्के भाडेवाढ झाली होती.
नाशिक दिल्ली दरम्यान विमानसेवा सुरू :
- होणार… होणार… होणार… अशा केवळ चर्चेत असलेल्या नाशिक-दिल्ली हवाई सेवेला 15 जून पासून अखेर सुरवात झाली. दुपारी अडीच वाजता दिल्लीहून ओझर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या विमानाने नाशिककरांची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली. पहिल्याच दिवशी दिल्लीहून 126, तर नाशिकहून दिल्लीला 120 प्रवासी पोचले.
- विशेष म्हणजे जेटच्या कार्गोसेवेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना तीन टन केसरी आंबे लंडन, तर एक टन हिरवी मिरची दुबईच्या बाजारपेठेकडे रवाना झाली.
- हवाई सेवेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी पायाभूत सुविधा पुरविण्याचे तर जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी निरंतर सेवा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. केंद्र सरकारने उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जेट एअरवेजतर्फे ही दिल्ली-नाशिक हवाई सेवा सुरू केली आहे.
- जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन म्हणाले, की विमानेसेवेमुळे उत्तर महाराष्ट्राला राजधानी दिल्लीत तत्काळ पोचण्याची सुविधा निर्माण झाली आहे. विमानतळावर कॅफेटोरिया, मनोरंजन, रिफ्रेशमेंट, प्रिपेड टॅक्सी आदी सेवा पुरविल्या जातील.
देशभरात आज रमजान ईदचा उत्साह :
- महिनाभर रोजे अर्थात उपवास केल्यानंतर शनिवारी म्हणजेच 16 जून रोजी देशभरात रमजान ईद साजरी होते आहे. पहाटेच्या नमाज अदा करण्यापासून रमजान ईदचा उत्साह दिसू लागला आहे.
- 16 जून रोजी मुस्लिम बांधव एकमेकांच्या घरी जाऊन गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देतात. 17 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी चंद्र दिसल्याने शाही इमामांनी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमजान ईद असल्याने देशभरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभाव आणि प्रेम वाढीला लागावे यासाठी प्रार्थनाही केली आहे.
- रमजानचा महिना हा जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी पवित्र महिना मानला जातो. रमजान हा इस्लाम दिनदर्शिकेतला नववा महिना आहे. ही दिनदर्शिका चंद्राच्या कला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
- जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले तेव्हापासून इसवी सन पूर्व 622 मध्ये हिजरी दिनदर्शिका सुरु करण्यात आली. शिरकुर्मा हा खास गोड पदार्थ रमजानच्या निमित्ताने तयार केला जातो.
- तसेच बिर्याणी, मटण यांसह विविध लज्जतदार पदार्थ तयार केले जातात. अत्यंत आनंदात आणि उत्साहात रमजान ईद साजरी केली जाते.
रंगभूमीचा इतिहास सांगणारे कलादालन उभारणार :
- आपल्या धकाधकीच्या आयुष्यात कलेच्या माध्यमातून आनंदाचे क्षण निर्माण करणाऱ्या मराठी रंगभूमीचा पावणेदोनशे वर्षांचा इतिहास चितारणारे कलादालन मुंबईत महापालिकेतर्फे उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 98व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केली.
- गेले तीन दिवस रसिकांच्या उदंड प्रतिसादात रंगलेल्या या नाटय़संमेलनाचा औपचारिक समारोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. 60 तास अखंड चालणाऱ्या या संमेलनातील उर्वरित कार्यक्रम त्यानंतरही सुरूच राहिले.
- तसेच संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात बाहेरगावच्या रंगकर्मीना मुंबईत आश्रयस्थान मिळावे अशी जी मागणी केली होती त्याचा संदर्भ घेऊन ठाकरे यांनी अंधेरीतील शहाजीराजे क्रीडासंकुलात ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे ठोस आश्वासनही यावेळी दिले.
दिनविशेष :
- सन 1903 मध्ये फोर्ड मोटर कंपनीची सुरवात झाली.
- न्यूयॉर्क येथे 16 जून 1911 मध्ये कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग (आय.बी.एम.) कंपनीची स्थापना झाली.
- प्रख्यात भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी झाला.
- सन 2010 मध्ये तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा