Current Affairs of 16 March 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 मार्च 2017)
शशांक मनोहर यांचा आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी वैयक्तिक कारणामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- शशांक मनोहर 2016 मध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते. मे 2016 मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशांक मनोहर यांची आयसीसीचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
- 2016 मध्ये आयसीसीने बदललेल्या नियमानुसार कोणत्याही देशाच्या क्रिकेट नियामक मंडळाशी संबंधीत नसलेली व्यक्तीच आयसीसीचे अध्यक्ष बनू शकत होती. त्यामुळे शशांक मनोहर यांनी त्यावेळी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
- मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की मी माझ्यावतीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. सर्व सदस्यांना एकत्र घेऊन काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
पुण्याच्या महापौरपदी मुक्ता टिळक यांची नियुक्ती :
- पुण्याच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळविला. महापौरपदी मुक्ता टिळक आणि उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांची निवड झाली.
- 15 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत असल्याने दोन्ही पदांच्या निवडीची औपचारिकता पार पडणार होती.
- मुक्ता टिळक यांना 98 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नंदा लोणकर यांना 52 मते मिळाली. लोणकर यांचा 46 मतांनी पराभव झाला. शिवसेनेने या निवडणुकीतून माघार घेतली होती.
- उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नवनाथ कांबळे यांची निवड झाली. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवडणूक झाली. जिल्हाधिकारी सौरभ राव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
- महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला 162 पैकी तब्बल 98 जागा मिळाल्या आहेत. महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपकडे राहतील.
मणिपूरचे नवे मुख्यमंत्री बीरेन सिंह :
- भाजपाच्या नेतृत्वाखालील मणिपूरमध्ये पहिल्यांदाच स्थापन झालेल्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एन. बीरेन सिंह यांचा शपथविधी पार पडला. राजभवनात आयोजित शपथविधी समारंभात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी शपथ दिली.
- मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यासोबत भाजपा आणि आघाडीच्या 8 सदस्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
- नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार वाय. जॉयकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.
- शपथविधी समारंभाला भाजपाचे सरचिटणीस राम माधव, आसामचे मंत्री हिमंत बिस्वा सरमासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री ईबोबी हेही उपस्थित होते.
बाबूल सुप्रियो फिफा वर्ल्डकप आयोजन समितीचे उपाध्यक्ष :
- केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना फिफा अंडर 17 वर्ल्डकप आयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आणि स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले.
दिनविशेष :
- 16 मार्च 1992 रोजी सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक प्रदान करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा