चालू घडामोडी (16 नोव्हेंबर 2017)
अमिताभ बच्चन ठरले पर्सनॅलिटी ऑफ द इयर :
- बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना या वर्षीच्या गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
- माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. 20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव होणार आहे. अमिताभ यांच्या पाच दशकांच्या बॉलीवूडमधील यशस्वी कारकिर्दीसाठी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
- 75 वर्षांच्या अमिताभ यांनी आतापर्यंत 190 चित्रपटांत काम केले. अनेक वेळा अपयश येऊनही त्यांनी सगळ्यांवर मात करीत यशाची पायरी गाठली आहे.
1 डिसेंबरपासून घरबसल्या करा आधारकार्ड जोडणी :
- तुमच्या मोबाइल फोनची आधार कार्डसोबत जोडणी करण्यात आली आहे का? जोडणीसाठी तुम्हाला स्टोअरमध्ये जाण्याचा कंटाळा येतोय? तर मग तुमची ही कटकट लवकरच मिटणार आहे.
- 1 डिसेंबरपासून मोबाइल फोनधारकांना आधार कार्ड आधारित सिम कार्ड पुन्हा पडताळण्यासाठी टेलिकॉम कंपनीच्या स्टोअरपर्यंत जाण्याची गरज नाही. कारण आता ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्याही करू शकणार आहात.
- युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) टेलिकॉम कंपन्यांकडून सादर करण्यात आलेले मॉडेल स्वीकारले आहे. यामध्ये आधारद्वारे जारी करण्यात आलेल्या सिम कार्डची पुन्हा पडताळणी करण्यासाठी ओटीपीसारख्या पर्यांयांचा समावेश करण्यात आला आहे.
- इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, UIDAIचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले आहे की, ”याद्वारे लोकांना टेलिकॉम स्टोअरमध्ये न जाता घरबसल्या आपला मोबाइल फोन आधार कार्डसोबत जोडणी करण्यासाठी व पडताळणीसाठी मदत मिळणार आहे”.
पुणे विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. एन.एस. उमराणी :
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. एन.एस. उमराणी यांची राज्यपालांनी नियुक्ती केली आहे. डॉ. उमराणी हे गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.
- गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी कुणाचीही नियुक्ती झालेली नव्हती. नव्या विद्यापीठ कायदंयात हे पद भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाला नवे कुलगुरु मिळाल्यानंतर प्र कुलगुरुपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती.
- कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दोन महिन्यांपूर्वी काही प्राध्यापकांची नावे राज्यपाल कार्यालयाकडे पाठविली होती. त्या पदासाठी डॉ. उमराणी यांचे नाव निश्चित झाले. या स्पर्धेत विद्यापीठातील विधी विद्याशाखेतील प्राध्यापक डॉ. दिलीप उके, नाशिक येथील डॉ. गजानन खराटे यांची नावे होती.
आता नवीन वाहन सीएनजीवरच चालणार :
- हरियाना आणि दिल्लीत आता जुन्या वाहनांची नोंदणी होणार नसून, नवीन वाहन केवळ सीएनजीवरच चालवण्यास परवानगी देण्याचा निर्णय हरियाना आणि दिल्ली सरकारने घेतला.
- दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि शेतातील पालापाचोळा जाळण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दोन्ही राज्यांनी आपापले मुद्दे मांडले आणि या समस्येवर मात करण्यासंदर्भात उपाययोजनांची चर्चा केली. दोन्ही राज्ये एकत्र येऊन प्रदूषणाचा सामना करणार आहेत.
- बैठकीनंतर मनोहरलाल खट्टर आणि अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. बैठकीत धुक्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी आठ मुद्द्यांवर सहमती झाली. यानुसार आता हरियाना आणि दिल्लीत जुन्या वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. शेतात शिल्लक राहिलेला पालापाचोळा, कचरा न जाळण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येईल, तसेच कचऱ्याचे विघटनीकरण करणाऱ्या उपकरणांवर सबसिडी वाढवण्यावर एकमत झाले.
- तसेच प्रदूषण रोखण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले जाणार आहेत. केजरीवाल म्हणाले, की हवेवर कोणाचेच नियंत्रण नाही. यासाठी उत्तर भारतातील ही समस्या सोडवण्यासाठी सर्व राज्यांची संयुक्त जबाबदारी आहे.
- प्रदूषण उत्तर भारताची समस्या आहे. केवळ कचरा जाळणे हेच कारण नाही, तर वाहतूक आणि हवेतूनही प्रदूषण होत आहे. आठ मुद्द्यांवर आम्ही या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कृती योजना तयार केली आहे.
18 वर्षांनी कर्मचारी केडीएमटीच्या स्थायी सेवेत रुजू :
- कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या 4 कर्मचाऱ्यांना तब्बल 18 वर्षांनी स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती पत्र दिल्याने 15 नोव्हेंबर रोजी महापालिका कर्मचारी संघटनेने जल्लोष साजरी केला. यावेळी नगरसेवक आणि संघटना अध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम सन 1999 मध्ये सुरू झाला. या उपक्रमात सध्या 500 हून अधिक कर्मचारी अधिकारी काम करत आहेत. शेकडो वाहक चालकांना सेवेत घेतल्यावर स्थायी कर्मचारी नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनामधील अधिकारी आणि संघटनेमधील अंतर्गत वादामुळे ह्या नियुक्त्या न झाल्याने शेकडो कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत.
- वाहक चालकांना परिवहन उपक्रमात स्थायी कर्मचारी म्हणून नेमणूक करावी म्हणून मागील वर्षापासून महापालिका कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि नगरसेवक महेश पाटील, कार्याध्यक्ष अनिल पंडित, सुधीर पंडित, सुनिल शितकर आदींनी केडीएमटी प्रशासन सोबत मिटींग आणि पाठपुरावा केला, त्याला यश आले, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी कमलाकर गोसावी (वाहक) सहीत 3 कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्त पत्र दिल्याने संघटना पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरी केला.
- तसेच यावेळी अध्यक्ष आणि नगरसेवक महेश पाटील, कार्याध्यक्ष अनिल पंडीत, परिवहन समिती सदस्य संजय राणे यांच्या उपस्थित स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले तर कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून एकमेकांचे अभिनंदन केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा