चालू घडामोडी (17 फेब्रुवारी 2016)
महानिर्मितीचा सामंजस्य करार :
- ऊर्जानिर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत महानिर्मितीने मुंबईत सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात ऊर्जानिर्मिती क्षेत्रात तब्बल 1.46 लाख कोटींचे गुंतवणूक संदर्भातील सामंजस्य करार केले.
- सौर, औष्णिक ऊर्जा क्षेत्रांबरोबरच कोळसा खाणी, वॉशरीज, सांडपाणी पुनर्वापर आदी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक होणार आहे.
- राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महानिर्मितीने 64 गुंतवणूकदार कंपन्यांशी 1.46 लाख कोटींचे करार केले.
- औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये सी. एम. ई. सी चायना (डायना ईपीएल), टेलर पॉवर, टोरंट पॉवर, डेल्टा मेकॉन्स इंडिया, तोशिबा- जी. एस. डब्ल्यू. या कंपन्यांशी करार करण्यात आले.
- अदानी ग्रीन एनर्जी, राजलक्ष्मी पॉवर, हिंदुस्थान मेगापॉवर, सस्टेनेबल बिल्डिंग सिस्टिम, वारी एनर्जी, लॅन्को, विंध्यवासिनी मेगास्ट्रक्चर, अथा सोलर, एन.एच.पी.सी. या कंपन्या सौरऊर्जा निर्मितीक्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत.
सौरऊर्जा निर्मितीत मेगावॉटची वाढ :
- देशातील सौरऊर्जेची निर्मितिक्षमता वाढत असून यंदा त्यात आणखी तीन हजार 790 मेगावॉट क्षमतेने वाढ होणार आहे.
- मार्चअखेर ही क्षमता नऊ हजार 38 मेगावॉट होणार आहे, अशी माहिती केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोत (अपारंपरिक ऊर्जा स्रोत) मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.
- पुढील आर्थिक वर्षापर्यंत देशातील सौरऊर्जा निर्मिती 20 हजार मेगावॉटपर्यंत पोचेल.
- तसेच सध्या भारतात पाच हजार 248 मेगावॉट सौरऊर्जा तयार केली जाते.
- 15 हजार 177 मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांना मान्यता दिली असून 2016-17 मध्ये 12 हजार 161 मेगावॉटच्या प्रकल्पांची त्यात भर पडणार आहे.
- सरकारच्या राष्ट्रीय सौरऊर्जा मोहिमेचे लक्ष्य 2020 पर्यंत 20 हजार वरून एक लाख मेगावॉटवर पोचणार आहे.
- उद्योग, घरे, संस्था, व्यावसायिक व अन्य इमारतींवरील सौर पॅनेलद्वारे तयार केली जाणाऱ्या सौर ऊर्जा इमारतीमधील रहिवाशांसाठी वापरली जाईल.
पॉप गायिका टेलर स्विफ्ट यांना ग्रॅमी पुरस्कार :
- पॉप गायिका टेलर स्विफ्ट यांना अल्बम ऑफ द ईअरचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे, तर गायनाच्या श्रेणीत केंड्रिक लॅमर यांनी पुरस्कार मिळविला आहे.
- दोन अन्य महत्त्वाच्या पुरस्कारांत सर्वश्रेष्ठ गीत आणि रेकॉर्ड हे अनुक्रमे थिंकिंग आऊट लाऊड (एड शीरन) आणि अपटाऊन फंक (ब्रूनो मार्स, मार्क रॉनसन) यांना मिळाले.
- लॅमरला 11 श्रेणीत नामांकन मिळाले होते; पण सर्वश्रेष्ठ अल्बम टू पिम्प अ बटरफ्लायच्या पुरस्काराशिवाय अन्य श्रेणीत पुरस्कार मिळविण्यात ते अपयशी ठरले.
- भारतीय ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडिया आपली डॉक्युमेंट्री ‘एमी’साठी सर्वश्रेष्ठ संगीत चित्रपटाच्या श्रेणीत विजयी ठरले, अनुष्का यांना त्यांच्या होम या अल्बमसाठी नामांकन मिळाले होते.
स्वदेशनिर्मित पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची चाचणी :
- स्वदेशनिर्मित पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची चाचणी (दि.16) यशस्वीरीत्या पार पडली.
- लष्कराच्यावतीने चांदीपूर येथे ही चाचणी पार पाडण्यात आल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
- जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या तसेच 350 कि.मी. वरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो मुखास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे.
- सकाळी 10 वाजता चांदीपूरच्या एकात्म चाचणी क्षेत्रातील (आयटीआर) संकुल 3 मधील मोबाईल लाँचरवरून या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
- तसेच या क्षेपणास्त्राला दुहेरी इंजिन असून ते द्रवरूप इंधनावर चालते, त्याला अत्याधुनिक एकात्म मार्गदर्शक यंत्रणा जोडलेली असून ते शिताफीने क्षेपणास्त्र पथ बदलवत लक्ष्याचा वेध घेऊ शकते.
- लष्कराने खास स्थापन केलेल्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) शास्त्रज्ञांच्या निगराणीत पार पाडलेल्या चाचणीच्या डाट्याचे विश्लेषण केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
बुलडाण्यात देशातील सर्वांत मोठा सीड हब :
- पेप्सिको इंडिया ही नामवंत कंपनी महाराष्ट्रात फळ प्रक्रिया उद्योग सुरू करणार असून त्यासाठीच्या सामंजस्य करारावर (दि.16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला.
- अमेरिकेची जगप्रसिद्ध मोन्सेन्टो कंपनी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे देशातील सर्वात मोठे सीड हब उभारेल अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.
- अमेरिकेतील 30 नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळाने मेक इन इंडिया सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
- तसेच यावेळी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन व पेप्सिको इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. शिवकुमार यांनी महाराष्ट्रात फळप्रक्रि या उद्योग सुरु करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला.
12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपदाचा मान :
- यजमान भारताने दक्षिण आशियाई विभागात खेळातील वर्चस्व कायम राखताना विक्रमी 308 पदकांसह (दि.16) संपलेल्या 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला.
- महिला बॉक्सर्सनी तिन्ही सुवर्णपदके पटकावली, तर ज्यूदोपटूंनी अखेरच्या दिवशी दोन सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली.
- भारताने एकूण 188 सुवर्ण, 99 रौप्य व 30 कांस्यपदके पटकावली.
- तसेच यापूर्वी 2010 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने 90 सुवर्णपदकांसह एकूण 175 पदके पटकावली होती.
- श्रीलंका एकूण 186 पदकांसह (25 सुवर्ण, 63 रौप्य, 98 कांस्य) दुसऱ्या स्थानी राहिला.
- पाकिस्तानला 106 पदकांसह (12 सुवर्ण, 37 रौप्य, 57 कांस्य) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
- अफगाणिस्तानने सात सुवर्णपदकांसह एकूण 35 पदके पटकावताना चौथे स्थान मिळवले.
- बांगलादेशने चार सुवर्णपदकांसह एकूण 75 पदके पटकावत पाचवे, तर नेपाळने तीन सुवर्णपदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करताना सहावे स्थान पटकावले.
दिनविशेष :
- 1945 : जावेद अख्तर यांचा जन्म. (हिंदी व उर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक).
- 1981 : नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा