देशात बृहन्मुंबई सर्वांत स्वच्छ राजधानी :
- केंद्र सरकारतर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षण स्पर्धेत बृहन्मुंबई महापालिकेला देशातील सर्वांत स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मिळाला.
- नागपूर, परभणी व सासवडसह राज्यातील आठ शहरांनी विविध गटांत पारितोषिके पटकाविली. राष्ट्रीय पातळीवर हागणदारीमुक्ती व कचरा व्यवस्थापनात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या राज्यांत महाराष्ट्राने झारखंड पाठोपाठ व छत्तीसगडला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकाविला.
- राष्ट्रीय पातळीवरील अव्वल तीन स्वच्छ शहरांत इंदूर व भोपाळ या मध्य प्रदेशातील दोन शहरांनी पहिले दोन क्रमांक पटकाविले, तर चंडीगड तिसऱ्या क्रमांकावर आले.
- गोव्याची राजधानी पणजीलाही स्वच्छ राजधानी गटात पारितोषिक मिळाले आहे. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या इंदूरने तर सलग दुसऱ्या वर्षी देशातील सर्वांत स्वच्छ महानगराचा मान मिळविला आहे.
- तसेच एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांत पश्चिम विभागांत अंकलेश्वर वगळता चारपैकी पाचगणी, सासवड व शेंदूरजनाघाट (जि. अमरावती) ही राज्यातील तीन शहरे विजेती ठरली आहेत. केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप पुरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण-2018 स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या 52 शहरांची नावे जाहीर केली.
परदेशी हिंदू अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व :
- पाकिस्तान व बांगलादेशातून भारतात आलेल्या आठ हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेले व आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
- 2016 मध्ये घेतलेल्या या निर्णयानुसार अशा लोकांना भारताच्या नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले होते. या निर्णयानुसार जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांत वास्तव्यास असलेल्या या नागरिकांना आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
- गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात राहिलेल्या व आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी होत होती. ही मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. असे गृह राज्यमंत्री (शहरे) ‘रणजित पाटील’ यांनी सांगितले.
राधानगरीत 19 मे पासून पर्यटन महोत्सव :
- जिल्ह्यासह राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळक असलेल्या राधानगरी व दाजीपूर परिसराकडे पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी येथील वैशिष्ट्यांना घेऊन 19 ते 20 मे रोजी येथे राधानगरी पर्यटन महोत्सव होत आहे. दोन दिवसाच्या महोत्वसात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सिने अभिनेते, अभिनेत्री यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती व काजवा महोत्सवही यात असेल.
- सकाळी पर्यटकांचे स्वागत व महोत्सवाचे उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व अभिनेते हार्दीक जोशी (राणा) व अक्षया देवधर (अंजली) यांच्या हस्ते होईल.
- शोभायात्रा, गजनृत्य, लेझीम, झांजपथक, ढोल, हालगी यांचा बाज असेल. यानंतर राधानगरी छायाचित्र प्रदर्शन व चित्रफितीचे उद्घाटन त्यानंतर पर्यटन निवास इमारतीची लोकार्पण सोहळा पाहुण्यांच्या हस्ते होईल. खाद्य जत्रेमध्ये ग्रामीण पध्दतीचे शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचा स्वाद घेता येईल. दुपारी कृषीतज्ञ संजीव माने यांचे कृषी मार्गदर्शन होईल. सायंकाळी सहा वाजता काजवा महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते काळम्मावाडी रोडवरील कार्यक्रमस्थळी होईल. याच ठिकाणी “निसर्गगाणी” हा कार्यक्रम असेल.
कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे मुस्लिम महिलांनाही संरक्षण :
- कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे संरक्षण मुस्लिम महिलांनाही आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच मुस्लिम कायद्यानुसार पतीने दिलेल्या तलाकची मेहेरही न्यायालयाने अमान्य केली आहे.
- मुस्लिमधर्मीय असल्यामुळे पत्नीला दिलेला तलाक आणि मेहेरची रक्कम कायदेशीर ठरते. तसेच कायद्यानुसार तलाक असल्यामुळे कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार पत्नीला पुन्हा संरक्षण मिळू शकत नाही, असा दावा करणारी याचिका मुस्लिम पतीने न्यायालयात केली होती. त्याने 1997 मध्ये निकाह केला होता आणि त्यांना दोन मुले आहेत; मात्र पतीकडून क्रूर छळ केला जातो असे कारण सांगून पत्नीने तीन वर्षांपूर्वी कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्यापूर्वी पतीने पत्नीला तलाक देऊन मेहेरची (पोटगीची एकत्रित रक्कम) रक्कम 60 हजार दिली होती; मात्र ही रक्कम पत्नीने अमान्य केली आणि ती तिने परतही केली. तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा आधार घेऊन कुटुंब न्यायालयात घटस्फोट आणि पोटगीसाठी दावा दाखल केला होता.
- मला आणि दोन्ही मुलांसाठी निर्वाहभत्ता आणि राहण्यासाठी घराची व्यवस्था पतीने करावी, अशी मागणी तिने दाव्यामध्ये केली होती. ही मागणी कुटुंब न्यायालयाने मंजूर करून पतीने पत्नीला घरभाडे म्हणून 40 हजार आणि निर्वाह भत्ता 60 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.
येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ :
- सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर 17 मे रोजी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- राजभवनात सकाळी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यांना आता येत्या 15 दिवसांत बहुमत सिद्ध करायचे आहे.
- तसेच शपथविधीला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी सकाळी विविध मंदिरांमध्ये जाऊन देव दर्शन घेतले होते.
दिल्ली ते अमेरिका विमान प्रवास स्वत होणार :
- तुम्हालाही सर्वात स्वस्त भारत-अमेरिका प्रवास विमानानं करायचा आहे? तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण आइसलँडच्या ‘वॉव एअर’ या विमानसेवा कंपनीने सर्वात स्वस्त विमान प्रवासाची घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच आता प्रवाशांना फक्त साडेतेरा हजारांत दिल्ली ते अमेरिका असा प्रवास करता येणार आहे.
- दिल्ली-अमेरिका-दिल्ली अशा राऊंड ट्रिपसाठी साडेतेरा हजार या हिशोबानं 27 हजार रुपये एवढी रक्कम मोजावी लागणार आहे. हे प्रवास भाडं सध्याच्या विमान प्रवासापेक्षा तुलनेनं खूपच कमी आहे.
- वॉव एअरने 15 मे रोजी या सेवेची घोषणा केली. भारतातील त्यांची सेवा डिसेंबरपासून सुरूहोणार असून पहिले उड्डाण 7 डिसेंबरला होणार आहे. दिल्ली विमानतळावरून सुटणारं विमान आईसलँडची राजधानी रेकजॅविकमार्गे न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को किंवा लॉस एंजेलिस येथे उतरेल.
- ‘जर तुम्ही पाहिलं तर भारत ते पूर्व अमेरिकेला जोडणारा सर्वात लहान मार्ग हा आईसलँडवरून जातो. सहाजिकच पल्ला जितका लहान तितकीच इंधनाची बचत होईल त्यामुळे आपसुकच प्रवासाचा खर्चही कमी होईल’ अशी माहिती या विमानसेवेचे संस्थापक स्कली मॉगेनसन यांनी दिली.
दिनविशेष :
- 17 मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन/जागतिक माहिती संस्था दिन आहे.
- देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा जन्म 17 मे 1749 रोजी झाला.
- 17 मे 1792 मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली.
- मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म 17 मे 1865 रोजी झाला.
- भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय 17 मे 1949 रोजी झाला.