चालू घडामोडी (17 नोव्हेंबर 2016)
वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय महिला संघाचे मालिका विजय :
- वेदा कृष्णमूर्तीचे अर्धशतक आणि फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडच्या 4 बळींच्या जोरावर भारतीय महिलांनी तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजचा 15 धावांनी पराभव करत ही मालिका 3-0 ने जिंकली.
- भारतीय महिला संघाने 6 बाद 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ 49.1 षटकांत 184 धावांत बाद झाला.
- तसेच ही मालिका महिला चॅम्पियनशिपचा भाग आहे आणि मालिका 3-0 जिंकल्यामुळे भारताला दोन गुण मिळाले.
दहशतवादाविरोधात भारत-चीनचे लष्कर एकत्र :
- दहशतवादाला विरोध करण्यासाठी भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एकत्र आल्याचा संदेश 16 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगाला मिळाला.
- दक्षिण आशियातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यासाठी हे दोन बलाढ्य विकसनशील देश लष्कराच्या संयुक्त सरावासाठी एकत्र आल्याचा विश्वास दोन्ही लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
- भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातील “हॅंड इन हॅंड” या सहाव्या संयुक्त सरावाला पुण्यात सुरवात झाली.
- तसेच हा संयुक्त लष्करी सराव सुरू झाल्याचे पीपल्स लिबरेशन आर्मीचे मेजर जनरल वांग हायजिआंग यांनी सांगितले.
- भारतीय लष्कराचे मेजर जनरल योगेशकुमार जोशी या वेळी उपस्थित होते.
- निमशहरी भागात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संयुक्त नियोजन करणे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा या संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश आहे.
ब्रिजेश सिंह आता राज्य शासनाचे प्रवक्ते :
- राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह हे आता राज्य शासनाचे प्रवक्ते असतील.
- असे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश काढला.
- आयपीएस अधिकारी असलेले ब्रिजेश सिंह यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालकपदाची धुरा सोपविली. नंतर त्यांच्याकडे विभागाचे सचिवपदही देण्यात आले.
- तसेच त्यांच्यावर आता शासकीय प्रवक्तेपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ते राज्य शासनाचे विविध विभाग, त्यांच्या लोकाभिमुख योजना किंवा महत्त्वपूर्ण घडामोडींबाबत वेळोवेळी शासनाची अधिकृतपणे बाजू मांडतील.
अंधांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर :
- अंधांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाइंड इन इंडियाने (कॅबी) जाहीर केले.
- 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2017 दरम्यान भारतात होणाऱ्या या स्पर्धेत 10 संघ विजेतेपदासाठी लढतील.
- भारताचे माजी कर्णधार आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते यावेळी स्पर्धेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले.
- तसेच या स्पर्धेसाठी एमसीए सर्व सामन्यांचे आयोजन करण्यास तयार आहे. या विश्वचषक स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसेडर राहुल द्रविड आहे.
दिनविशेष :
- कॉंग्रेसने बहिष्कार घातलेल्या तिसर्या गोलमेज परुषदेची सुरुवात 17 नोव्हेंबर 1932 रोजी करण्यात आली.
- 17 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतात.
- भारतीय राजकारणी व लेखक लाला लजपतराय 17 नोव्हेंबर 1928 हा स्मृतीदिन आहे.
- 17 नोव्हेंबर 2012 हा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा